Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 August 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५
ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा.
****
देशाच्या अमृतपर्वात, दृढ संकल्प, परंपरांचा
अभिमान, एकता, कर्तव्यांच पालन आणि गुलामगिरीच्या
मानसिकतेतून मुक्तता, या पंचंसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशाच्या शहात्तराव्या
स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर, ते बोलत
होते. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुताम्यांना
अभिवादन करत त्यांनी, देशवासीयांना स्वातंत्र्य
दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधानांनी 'जय जवान,
जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान', असा नवा नारा दिला.
भारत लोकशाहीची जननी असून, विविधता ही त्याची ताकद असल्याचं
त्यांनी नमूद केलं. अमृतकाळातली पहिली सकाळ म्हणजे आकांक्षी समाजाच्या
आकांक्षा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी असून, आपल्या देशाचं
मोठं सामर्थ्य एका तिरंगा ध्वजाने दाखवलं असल्याचं ते म्हणाले.
महिलांप्रती आदर हा भारताच्या विकासाचा प्रमुख आधारस्तंभ असून, आपण आपल्या नारीशक्तीला पाठबळ देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ज्यांनी भारताला मुक्त करण्याचं स्वप्न पाहिलं त्या स्वातंत्र्य सेनानींचा संकल्प आणि निर्धार यांच्यापासून आपण प्रेरणा
घेतली पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले.
आयुर्वेद, योग यासारख्या आपल्या समृद्ध परंपरा,
आत्मनिर्भर भारताचा संकल्प यांचा उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला. भ्रष्टाचार आणि घराणेशाही कुठल्याही देशासाठी चांगली नाही, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराविरोधातल्या लढाईसाठी आपल्याला
देशातल्या जनतेची साथ हवी असल्याचं ते म्हणाले.
आत्मनिर्भर भारत, हा सरकारचा अजेंडा किंवा सरकारी कार्यक्रम नाही, हे जनआंदोलन आहे, जे आपल्याला पुढे घेऊन जायचं
असल्याचं ते म्हणाले.
देशाच्या विकासासाठी पुढील २५ वर्षे आपलं जीवन समर्पित करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी युवकांना यावेळी केलं.
आपण संपूर्ण मानवतेच्या विकासासाठी देखील काम केलं पाहिजे, हेच भारताचं सामर्थ्य
असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत वर्षा या शासकीय निवासस्थानाच्या प्रांगणात ध्वजारोहण केलं. त्यानंतर त्यांनी मंत्रालयातही ध्वजारोहण केलं. महाराष्ट्राला देशात एक अग्रेसर
राज्य बनवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली असून, आपण सर्वजण मिळून देश तसंच राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया,
असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
नागपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
औरंगाबाद
इथं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात रोजगार हमी योजना तसंच फलोत्पादन
मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. औरंगाबाद
जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
जालना
इथं कृषी मंत्री अब्दुल सत्तार, परभणी इथं
सहकार मंत्री अतुल सावे, उस्मानाबाद
इथं सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर
तानाजी सावंत, नांदेड
इथं जिल्हाधिकारी विपीन इटनकर, तर बीड इथं जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते
ध्वजारोहण झालं.
****
नक्षलग्रस्त भागात पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी भारत बटालियन - फोर ची स्थापना करण्याची घोषणा वनमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांनी केली. स्वातंत्र्य दिनानिमित्त चंद्रपूर इथं ध्वजारोहण केल्यानंतर
ते बोलत होते. भारत बटालियन-फोर साठी एक हजार सात
पदांना मंजुरीही देण्यात आली असून, ही बटालियन चंद्रपूर,
गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी कार्यरत असेल, असं
त्यांनी सांगितलं. जेव्हा पोलिसांना तातडीच्या मदतीची गरज असेल,
तेव्हा ही बटालियन तातडीने त्या ठिकाणी जाऊन पोलिसांना सहकार्य करेल,
या बटालियनच्या मुख्यालयासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोर्टी मक्ता इथं जागा मंजूर करण्यात आली असून,
लवकरच पुढील प्रक्रिया राबवली जाणार असल्याचं मुनगंटीवार यांनी
सांगितलं.
****
राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटपावरून कोणतीही नाराजी नाही, असं
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बोलत होते. जिल्ह्यांचे पालकमंत्री येत्या दोन- तीन दिवसात जाहीर होतील,
असं त्यांनी सांगितलं. राज्य शासनात काम करण्यासाठी
कोणतंही खातं दुय्यम नाही, कोणाची काही नाराजी असेल तर पुढील मंत्रिमंडळ विस्तारात ती दूर होईल, असंही महाजन म्हणाले.
****
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांच्या
पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचं पार्थिव बीड इथल्या शिवसंग्राम भवनात ठेवण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या सह मंत्रिमंडळातले अनेक मंत्री मेटे यांच्या
अंत्यदर्शनासाठी बीड इथं जाणार आहेत. दरम्यान, मेटे यांना अभिवादन करण्यासाठी
आज बीड जिल्ह्यात संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
//*********//
No comments:
Post a Comment