Monday, 15 August 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 15.08.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

                                                          आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१५ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

शहात्तराव्या स्वातंत्र्यदिनाचा देशभर उत्साह आणि जल्लोष पहायला मिळत आहे. नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. भारत लोकशाहीची जननी आहे, विविधता ही त्याची ताकद असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी केलेल्या भाषणात नमूद केलं.२०४७ पर्यंत स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी पाच प्रतिज्ञा घेऊन वाटचाल करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. विकसित भारत, गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाकणं, आपल्या वारशाचा अभिमान बाळगणं, एकता आणि नागरीकांची कर्तव्ये, हे पाच संकल्प त्यांनी सांगितले. देशाच्या विकासासाठी पुढील २५ वर्षे आपलं जीवन समर्पित करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी युवकांना यावेळी केलं.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत वर्षा या शासकीय निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण केलं. त्यानंतर त्यांनी मंत्रालयातही ध्वजारोहण केलं. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात रोजगार हमी योजना तसंच फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते, जालना इथं कृषीमंत्री अब्दुल सत्तार, तर नांदेड इथं जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या हस्ते, ध्वजारोहण झालं. 

****

प्रख्यात शेअर बाजार गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं काल मुंबईत, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे निधन झालं, ते ६२ वर्षांचे होते. हवाई वाहतूक  कंपनी आकाशा एअरलाईन्सचे ते मालक आहेत. भारताचे वॉरेन बुफेट अशी ओळख असलेले झुनझुनवाला यांची संपत्ती ५ अरब ८० कोटी रुपये आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ५ हजार रुपये गुंतवून त्यांनी शेअर बाजाराच्या व्यवसायाला सुरुवात केली होती.

****

मधुमेह असणाऱ्या लहान मुलांना वेळेत इन्सूलिन मिळणं गरजेचं आहे, यासाठी शासन प्रयत्न करेल अशी ग्वाही राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली. "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा"निमित्त बाल मधुमेहींसाठी उडान फाउंडेशन तर्फे काल औरंगाबाद इथं सोनेरी महल परिसरात ट्रेक घेण्यात आला.ट्रेकला जाणाऱ्या मुलांना मंत्री सावे यांनी यावेळी हवेत फुगे सोडून शुभेच्छा दिल्या.या ट्रेकमध्ये विविध राज्यातून १००मुलं सहभागी झाले होते.

//********//

 

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 18 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...