Tuesday, 16 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 16.08.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 August 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतिदिन. धोरण, सिद्धांत, विचार आणि व्यवहार यांचा आदर्श प्रस्थापित करणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी यांचं आज संपूर्ण देशभरात स्मरण केलं जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह इतर वरीष्ठ नेत्यांनी, राजधानी दिल्लीत सदैव अटल, या अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं. 

****

पारसी नववर्ष आज साजरं होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पारसी समुदायाला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पारसी समुदायानं आपली मेहनत, समर्पणाच्या बळावर देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिलं, हे नववर्ष सुख, शांती, सद्भावना घेऊन येईल आणि बंधुत्वाला चालना देईल, अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली.

****

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी सरकारनं सर्वपक्षीय सदस्यांसाठी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून, त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. २५ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.

****

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काल स्वातंत्र्यदिनी अंतराळात तिरंगा ध्वज डौलानं फडकवण्यात आला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था -स्रोनं स्पेस कीड्झ इंडिया या संस्थेच्या सहकार्यानं ही अभिमानास्पद कामगिरी केली.

****

कोविड विरुद्ध अधिक सक्षमपणे लढण्यासाठी संपूर्ण स्वदेशी आणि भारतातली पहिली नाकाद्वारे स्प्रे स्वरूपात घेता येणारी लस भारत बायोटेकनं विकसित केली आहे. बी बी व्ही वन फाईव्ह फोर नावाच्या या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातली वैद्यकीय चाचणी यशस्वी झाल्याची माहिती, भारत बायोटेकनं दिली आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल सहा लाख दहा हजार ८६३ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०८ कोटी ३१ लाख २४ हजार ६९४ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या आठ हजार ८१३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १हजार ४० रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख ११ हजार २५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. पुढचं वर्षभर २०२३ च्या स्वातंत्र्यदिनापर्यंत सुरु राहणाऱ्या या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या पातळीवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. नऊ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत, राज्यात स्वराज्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. याअंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम उद्या सकाळी ११ वाजता राबवायचा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातली सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, सहकारी तसंच खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठानं, संस्था यांना उद्या सामुहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथल्या महात्मा फुले कृषि विद्यापीठात अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेल्या बेकरी पदार्थ विक्री केंद्राचं उद्घाटन आज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते झालं. या आयुर्वेदिक कुकीजमध्ये प्रामुख्याने फुले जांभूळ कुकीज, फुले त्रिफळा कुकीज, फुले तुलसी कुकीज, फुले कडीपत्ता कुकीज, फुले जिंजर कुकीज आणि फुले मशरूम कुकीज यांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या या अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाने पौष्टिक आणि आयुर्वेदिक खाद्यपदार्थांची निर्मिती शास्त्रशुद्ध पद्धतीने केली आहे.

****

पंडित नाथराव नेरळकर यांच्या जयंतीदिनी, येत्या गुरुवारी नाथस्वर जयंती समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं होणाऱ्या मैफलीत प्रसिद्ध गायक दिनेश संन्यासी यांच्या शिष्या अंजली काजळकर, पंडित नेरळकर यांचे शिष्य डॉ. अमोघ जोशी, तसंच पंडित शुभदा पराडकर यांची शिष्या युगंधरा केचे यांचं गायन होणार आहे. औरंगाबाद इथं नेरळकर यांच्या निवासस्थानी परवा गुरुवारी सायंकाळी सात वाजता ही मैफल होणार असून, संगीतप्रेमींनी या मैफलीचा लाभ घ्यावा, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

****

भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असून, वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. गोसीखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून १५ हजार १८० घनमीटर प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भंडारा शहरालगत असलेल्या टाकली- खमाटा इथं पुराचं पाणी आल्यानं भंडारा-तुमसर राज्यमार्ग बंद झाला आहे. भंडारा, तुमसर, मोहाडी तालुक्यातल्या दीडशे कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  

//*********//

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 18 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...