Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 August 2022
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.
****
·
देशाच्या अमृत पर्वात, दृढ संकल्प,
परंपरांचा अभिमान, एकता, कर्तव्यांच पालन आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्तता, या पंचंसूत्रीचं पालन करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन
·
राज्याला देशातलं अग्रेसर राज्य बनवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
·
मराठवाड्यात सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साह आणि जल्लोषात साजरा
·
राज्य विधीमंडळाचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन, आज सर्वपक्षीय सदस्यांसाठी चहापानाचा कार्यक्रम
·
शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी 'एक दिवस शेतकऱ्यांसोबत' उपक्रम संपूर्ण
राज्यभर राबवण्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश
·
राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार
१८९ रुग्ण, मराठवाड्यात ५६ बाधित
आणि
·
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांच्या पार्थिवावर शासकीय
इतमामात अंत्यसंस्कार
****
देशाच्या
अमृत पर्वात, दृढ संकल्प, परंपरांचा अभिमान, एकता, कर्तव्यांच पालन आणि गुलामगिरीच्या
मानसिकतेतून मुक्तता, या पंचंसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. शहात्तराव्या
स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर, देशाला
संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले:
‘‘जब मै पंचप्रण की बात करता हूँ, पहला प्रण अब देश बडे संकल्प लेकर के ही चलेगा.
और वो बडा संकल्प है विकसित भारत. और उससे कुछ कम नही होना चाहिये. बडा संकल्प, दुसरा
प्रण, किसी भी कोने मे हमारे मन के भीतर, हमारे आदतों के भीतर गुलामी का एक भी अंश
अगर अभी भी है, तो उसको किसी भी हालत मे बचने नही देना. तिसरी प्रण शक्ती हमे हमारी
विरासत पर गर्व होना चाहीये, जिसने कभी भारत को स्वर्णिम काल दिया था. और यही विरासत
है. चौथा प्रण, एकता और एकजुटता. एक सौ तीस करोड देशवासियोंमे एकता, न कोई अपना, न
कोई पराया, एकता की ताकद, एक भारत श्रेष्ठ भारत के सपनोंके लिये हमारा चौथा प्रण है.
पाँचवा प्रण है नागरीकोंका कर्तव्य.’’
देशाला
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुताम्यांना अभिवादन करत त्यांनी,
देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधानांनी 'जय जवान, जवान किसान, जय
विज्ञान, जय अनुसंधान', असा नवा नारा
दिला.
भारत
लोकशाहीची जननी असून, विविधता ही त्याची ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलं. महिलांप्रती आदर हा भारताच्या विकासाचा प्रमुख आधारस्तंभ असून, आपण आपल्या नारीशक्तीला पाठबळ देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
आयुर्वेद, योग
यासारख्या आपल्या समृद्ध परंपरा, आत्मनिर्भर भारताचा संकल्प,
नवीन शैक्षणिक धोरण यांचा उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला.
भ्रष्टाचार आणि घराणेशाही कुठल्याही देशासाठी चांगली नाही, घराणेशाही
आणि भ्रष्टाचाराविरोधातल्या लढाईसाठी आपल्याला देशातल्या जनतेची साथ हवी असल्याचं ते
म्हणाले. देशाच्या विकासासाठी पुढील २५ वर्षे आपलं जीवन समर्पित करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी
युवकांना यावेळी केलं. आपण संपूर्ण मानवतेच्या विकासासाठी
देखील काम केलं पाहिजे, हेच भारताचं सामर्थ्य असल्याचं त्यांनी
नमूद केलं.
****
मुंबईत
मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं. महाराष्ट्राला
देशातलं अग्रेसर राज्य बनवण्याच्या दिशेनं आपण वाटचाल सुरु केली असल्याचं त्यांनी
नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणात सांगितलं. आपण सर्वजण मिळून देशाला आणि
राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया असं आवाहनही त्यांनी केलं. भविष्यातलं
नियोजन, कृषी क्षेत्राच्या विकासासाठीचं नियोजन याविषयीचा त्यांनी
आपल्या भाषणात आढावा त्यांनी घेतला. समाजातल्या वंचित घटकांना
आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असल्याचं सांगत, यादृष्टीनं सुरु असलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली. राज्यात नव्या
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करायचा मनोदय व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी नव्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.
****
मराठवाड्यात सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा
उत्साह दिसून आला. हर घर तिरंगा मोहिमेमुळे
हा उत्साह द्विगुणित झाला. औरंगाबाद इथं मुख्य
शासकीय ध्वजारोहण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या
प्रांगणात रोजगार हमी योजना तसंच फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते झालं.
औरंगाबाद जिल्हा आज अनेक क्षेत्रात
अग्रेसर असल्याचं भुमरे यांनी नमूद केलं. ते म्हणाले…
‘‘प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत उद्दीष्टाच्या ११५ टक्के काम पूर्ण
करुन सन २०२१-२२ मध्ये आपल्या जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. मतदार
यादी पुनरीक्षणात आपला जिल्हा विभागात प्रथम क्रमांकावर आहे. आपला जिल्हा महाआवास ग्रामीण
अभियानामध्ये विभागात प्रथम आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये
आपलं राज्य देशात, तर आपला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. ८५ लाख झाडे लाऊन
त्यांचं संगोपन केले, १२७ टक्के उद्दीष्ट साध्य करण्यात आपला जिल्हा यशस्वी झाला आहे.’’
जालना इथं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. जालना जिल्ह्यातले शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची
प्रगती तसंच जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सरकार कटीबध्द असल्याचं, अब्दुल सत्तार
यांनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितलं.
परभणी इथं सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मागील ७५ वर्षांचा इतिहास आपल्यासाठी आश्वासक असला तरी आपल्या जिल्ह्यासमोर, राज्यासमोर, देशासमोर अनेक समस्या आजही आहेत. आपण सर्व मिळून सांघिक भावनेनं या समस्यांचं
निराकरण करू, नवभारताचं स्वप्न साकारण्यासाठी भारतमातेची एकजुटीने सेवा करु, असं आवाहन सावे यांनी केलं.
उस्मानाबाद इथं सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत
यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी हुतात्मा
स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं. यावेळी केलेल्या भाषणात सावंत यांनी, जिल्ह्यात
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला
दिल्याचं सांगितलं. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाला गती देणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
नांदेड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या हस्ते, बीड इथं जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते, लातूर इथं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते, तर हिंगोली इथं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते मुख्य
ध्वजारोहण झालं.
****
विविध शैक्षणिक संस्था, सरकारी
निमसरकारी कार्यालयं, विविध पक्ष संघटना तसंच खासगी आस्थापनांमधूनही ध्वजारोहणाचा उत्साह
दिसून आला. औरंगाबाद शहरात विविध ढोल पथकं मंडळांच्या वतीनं तिरंगा पदयात्रा काढण्यात
आल्या. या सर्व पदयात्रा क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुताळा
आणि स्वातंत्र्य संग्राम स्मारक परिसरात विसर्जित झाल्या. ढोल ताशांच्या आवाजासह देशभक्तीपर
गीतं आणि घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता.
****
उस्मानाबाद इथं स्वातंत्र्यदिनानिमित्त
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं देशातली सर्वात मोठी तिरंगा ध्वज पदयात्रा काढण्यात
आली. सात हजार ५७५ फुट लांबीच्या या ध्वज यात्रेत संस्थेच्या विविध शाखेतले दहा हजार
विद्यार्थी आणि एक हजार शिक्षक कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुधीर
पाटील यांनी दिली.
****
हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत
आतापर्यंत पाच कोटीहून अधिक नागरिकांनी घरावरच्या तिरंग्यासह आपलं छायाचित्र संकेतस्थळावर
अपलोड केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
प्रत्येक घरात झेंडा लावून हर घर तिरंगा या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं.
पाच कोटी नागरिकांचं झेंड्यासोबतचं छायाचित्र हे देशाप्रती असलेली एकनिष्ठता दर्शवत
असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे.
****
राज्य
शासनाच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटपावरून कोणतीही नाराजी नाही, असं वैद्यकीय
शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक
इथं बोलत होते. जिल्ह्यांचे पालकमंत्री येत्या
दोन- तीन दिवसात जाहीर होतील, असं
त्यांनी सांगितलं. राज्य शासनात काम करण्यासाठी कोणतंही खातं दुय्यम नाही, कोणाची
काही नाराजी असेल तर पुढील मंत्रिमंडळ विस्तारात ती दूर होईल, असंही महाजन म्हणाले.
****
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. त्या
पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी सरकारनं सर्वपक्षीय सदस्यांसाठी
चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. २५ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन
चालणार आहे.
****
राज्यात काल
कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार १८९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ७३ हजार ५२९ झाली आहे. काल या संसर्गानं
एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर एक
हजार १४२ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९
लाख तेरा हजार २०९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड
मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य एक शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १२ हजार १४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल ५६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या
१९, उस्मानाबाद १७, औरंगाबाद नऊ, लातूर पाच, बीड चार, तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या
प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
****
राज्यातल्या तरुणांमध्ये नवसंकल्पनांना
चालना देण्यासाठी, राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत,
महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
काल शुभारंभ करण्यात आला. मुंबईत मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्र्यांनी
या यात्रेचा शुभारंभ केला. युवकांमधल्या कौशल्य विकासाला शासन प्राधान्य देणार असून,
त्याद्वारेही रोजगार वृद्धीचा प्रयत्न केला जाणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. स्टार्टअप
यात्रेद्वारे राज्यातल्या सहा विभागांमध्ये, स्टार्टअप, उद्योजकता, नाविन्यता, युनिकॉर्न
याविषयक जनजागृती केली जाणार आहे. नवसंकल्पना घेऊन येणाऱ्या युवक-युवतींना प्रशिक्षण
तसंच त्यांच्या संकल्पनांचं सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर उत्तम संकल्पना
सादर करणाऱ्या १३४ युवकांना १० हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंतची पारितोषिकंही
दिली जाणार आहेत.
****
नक्षलग्रस्त
भागात पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी भारत बटालियन-फोर ची
स्थापना करण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. काल स्वातंत्र्यदिनी
चंद्रपूर इथं ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. भारत बटालियन-फोर
साठी एक हजार सात पदांना मंजुरीही देण्यात आली असून, ही बटालियन चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या तीन
जिल्ह्यांसाठी कार्यरत असेल, असं त्यांनी सांगितलं. पोलिसांना
तातडीच्या मदतीची गरज असेल, तेव्हा ही बटालियन तातडीने त्या
ठिकाणी जाऊन पोलिसांना सहकार्य करेल, या बटालियनच्या
मुख्यालयासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोर्टी मक्ता इथं जागा मंजूर करण्यात आली असून, लवकरच पुढील
प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
****
शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी
'एक दिवस शेतकऱ्यांसोबत' हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवण्याचे निर्देश, कृषी मंत्री
अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. कृषी मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच
त्यांनी काल जालना इथून मराठवाड्यातल्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या
माध्यमातून संवाद साधला. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना भरपाई
मिळावी यासाठी नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश मंत्री सत्तार यांनी
यावेळी दिले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे
नुकसान झालेल्या पिकांची येत्या ४८ तासांत पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश, सार्वजनिक
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत. ते काल उस्मानाबाद
इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यातली पीक परिस्थती, पावसाचं प्रमाण,
धरणांचं, रस्त्यांचं बांधकाम, आणि नागरिक-शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगानं त्यांनी
संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. तसंच प्रधानमंत्री आवास योजनेच्या
लाभार्थ्यांना जलद गतीने न्याय द्यावा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
****
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष,
माजी आमदार विनायक मेटे यांच्या पार्थिव देहावर काल बीड इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
करण्यात आले. रविवारी पहाटे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एका भीषण अपघातात मेटे
यांचं निधन झालं. अंत्यसंस्कारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मंत्री पंकजा मुंडे
यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी मेटे यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र
अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. तसंच मेटे यांच्या मातोश्री आणि कुटुंबीयांचं सांत्वन
केलं.
मेटे यांना श्रद्धांजली अर्पण
करताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी, मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी दिलेलं बलिदान वाया
जाऊ देणार नाही, असं आश्वासन दिलं.. ते म्हणाले...
‘‘मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी, आरक्षणासाठी मेटे साहेबांनी जो लढा
दिला, संघर्ष केला, तो आम्ही कधीही वाया जाऊ देणार नाही. एवढाच याठिकाणी मी आपल्याला
शब्द देऊ इच्छितो. आणि जे जे काही करावं लागेल, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या
उन्नतीसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी आमचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही एवढं याप्रसंगी
मी आपल्याला सांगतो.’’
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातले अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रासह समाजाच्या सर्वच स्तरातल्या नागरिकांनी
मेटे यांचं अंत्यदर्शन घेऊन, आपल्या लाडक्या नेत्याला साश्रु नयनांनी अखेरचा निरोप
दिला.
****
नांदेड
जिल्हाधिकारी कार्यालयातलं सेतू सुविधा केंद्र, सेजल, या तृतीयपंथी व्यक्तीकडे काल हस्तांतरीत करण्यात आलं. तृतीथपंथीयांना
विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं हा निर्णय
घेण्यात आल्याचं, जिल्हाधिकारी बिपीन ईटनकर यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment