आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१६ ऑगस्ट २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त
आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप
धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, माजी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह इतर वरीष्ठ नेत्यांनी
राजधानी दिल्लीत सदैव अटल या अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन
अभिवादन केलं.
****
पारसी नववर्ष पतेती आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांनी पारसी समुदायाला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पारसी समुदायानं आपली
मेहनत, समर्पणाच्या बळावर देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. हे नववर्ष
सुख, शांती, सद्भावना घेऊन येईल आणि बंधुत्वाला चालना देईल, अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी
व्यक्त केली.
****
हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत
पाच कोटीहून अधिक नागरिकांनी घरावरच्या तिरंग्यासह आपलं छायाचित्र संकेतस्थळावर अपलोड
केलं आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरात झेंडा लावून हर घर तिरंगा या अभियानात सहभागी होण्याचं
आवाहन केलं होतं. पाच कोटी नागरिकांचं झेंड्यासोबतचं छायाचित्र
हे देशाप्रती असलेली एकनिष्ठता दर्शवत असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी.
किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे.
****
नक्षलग्रस्त भागात पोलीस दल अधिक सक्षम
करण्यासाठी भारत बटालियन-फोर ची स्थापना
करण्याचा निर्णय झाला असून, यासाठी एक हजार सात पदांना मंजुरीही
देण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ही बटालियन चंद्रपूर,
गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी कार्यरत असेल.
****
नांदेड आकाशवाणी केंद्राचे प्रासंगिक निवेदक
गौतम पठ्ठेबहादूर यांचं काल
निधन झालं, ते ५१ वर्षांचे होते. नांदेड आकाशवाणी केंद्रात ते १९९४ पासून प्रासंगिक उद्घोषक म्हणून कार्यरत होते. तरंग आणि सप्तरंग रेडिओ
ॲपचे ते संचालक होते.
****
मराठवाड्यात काल ५६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये
नांदेड जिल्ह्यातल्या १९, उस्मानाबाद १७, औरंगाबाद नऊ, लातूर पाच, बीड चार,
तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
//********//
No comments:
Post a Comment