Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 17 August 2022
Time
7.10 AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.
****
·
राज्य विधीमंडळाचं आजपासून पावसाळी अधिवेशन, विविध सहा अध्यादेश आणि नऊ विधेयकं
सदनाच्या पटलावर मांडली जाणार
·
विरोधी पक्षांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार,
·
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ, वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळांच्या बसेस मधून मोफत प्रवास
·
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरील हक्कासंदभार्भात केंद्रीय निवडणूक आयोगापूर्वी सर्वोच्च न्यायालया आपलं निरीक्षण नोंदवणार
·
स्वराज्य महोत्सवाअंतर्गत आज सकाळी ११ वाजता राज्यभर समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम
·
राज्यात कोविड संसर्गाचे नवे ८३६ रुग्ण, मराठवाड्यात ४९ बाधित
आणि
·
पैठणच्या जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे तीन फूट उघडल्याने गगोदावरी
नदीला पूर
****
राज्य विधीमंडळाचं पावसाळी
अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होणार आहे. २५ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार
आहे. या अधिवेशनात विविध सहा अध्यादेश
आणि नऊ विधेयकं सदनाच्या पटलावर मांडली जाणार आहेत. अधिवेशन काळात १९, २०, २१ ऑगस्ट या सार्वजनिक
सुट्या आहेत, तर २४ ऑगस्टला विधिमंडळ
कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे.
****
राज्याच्या इतिहासात यावर्षी
एकाही तालुक्यात दुष्काळाची स्थिती नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी सांगितलं आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या ४० दिवसात
नव्या सरकारनं सुमारे साडेसातशे निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. जुन्या सरकारनं घाई
गडबडीत घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेऊन, त्यापैकी जनतेच्या हिताचे निर्णय कायम
ठेवू, मात्र अनावश्यक कामांचा
आढावा घेऊन त्याबाबत योग्य निर्णय घेऊ, असं ते म्हणाले. हे सरकार विश्वासघात करून सत्तेवर
आल्याच्या विरोधकांच्या आरोपाचं खंडन करत, हे बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आहे,
जनतेच्या मनातलं सरकार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. आमचं सरकार आल्याबद्दल
अजित पवार यांना वाईट वाटणं साहजिक आहे, कारण आधीचं सरकार तेच चालवत होते, असंही मुख्यमंत्री
म्हणाले.
आमचं सरकार सत्तेत
आल्यापासून लोकांना फरक दिसत असून, विरोधी पक्षांनी सरकारपेक्षा स्वत:च्या एकजूटीवर लक्ष द्यावं, असा उपरोधिक सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.
दरम्यान, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत पावसाळी आधिवेशन संपताच थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाईल, अशी ग्वाही
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. ते काल चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर क्रांती हुतात्मा सन्मान सोहळ्यात बोलत होते.
****
विश्वासघाताच्या
पायावर स्थापन झालेलं सरकार विधीमान्य नसल्याचं सांगत विरोधी पक्षांनी काल सरकारच्या
चहापानावर बहिष्कार टाकला. याबाबतचं पत्र विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांना दिलं आहे. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित
पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संयुक्त पत्रकार
परिषद घेत, विरोधी पक्षांची भूमिका मांडली. अंबादास दानवे यांनी कायदा आणि
सुव्यवस्थेबाबत सरकारची भूमिका बेपर्वाईची असल्याचं सांगत, टीईटी घोटाळ्यात
नातेवाईकांना नोकरी देणाऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याबद्दल सरकारवर टीका
केली. ते म्हणाले....
‘‘जी घटना भंडारा
आणि गोंदियामध्ये घडलेली आहे. त्याला जोडूनच महाराष्ट्रात या काळात अनेक घटना घडलेल्या
या चाळीस पन्नास दिवसात आणि याच्याविषयी सरकारची भूमीका बेपर्वाईची आहे. सगळ्यात महत्वाचं
टीईटी सारखा गैरप्रकार करुन स्वत:च्या नातेवाईकांना नोकरी देण्याचा प्रकार घडलेला असताना
अशा प्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान देणे हा सुद्धा प्रकार या सगळ्या याच्यात घडलेला
आहे. बुलेट ट्रेनसाठी इमिजिएट निधी या सरकारने दिलेला आहे. परंतू शेतकऱ्यांसाठी निधी
मिळत नाही. या अधिवेशनात हे विषय सुद्धा आम्ही सगळे मिळून घेणार आहोत.’’
अजित पवार
यांनी आमदारांच्या आक्षेपार्ह वर्तनाचा मुद्दा उपस्थित करत, त्यांच्यावर कठोर
कारवाईची मागणी केली. राज्यात पूरस्थितीमुळे झालेलं नुकसान, अतिवृष्टीमुळे झालेली
जीवीत हानी, तसंच अन्य घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं चहापान टाळून फक्त चर्चा करणं संयुक्तिक ठरलं असतं, असं सांगत, सरकारनं किमान
संवेदनशीलता दाखवायला हवी होती, असं मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीग्रस्तांना भरघोस मदती द्यावी यासह विविध मागण्या मांडत पवार यांनी,
चहापानावर बहिष्कार टाकल्याचं सांगितलं. ते म्हणाले...
‘‘ओला दुष्काळ
जाहीर करा. पंच्याहत्तर हजार रुपये हेक्टरी मदत करा. फळबागांना हेक्टरी दीड लाख रुपये
मदत जाहीर करा. मजूरांना एकरकमी अनुदान दिलं गेलं पाहिजे तसंच अतिवृष्टीग्रस्त भागातील
विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क देखील माफ करा आणि यंदा विधेयक पण बरीचशी आहेत, तीपण
चर्चा करुनच शासकीय विधेयक मंजूर केली गेली पाहिजे. या सगळ्या कारणांमुळे आम्ही विरोधी
पक्षांनी आज चहापानावर बहिष्कार घालायचा निर्णय घेतलेला आहे.’’
****
विधान परिषदेचं सदस्यत्व
सोडू नये यासाठी उद्धव ठाकरे यांना विनंती करणार असल्याचं, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर
उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला होता. मात्र चुकून त्यांनी
आमदारकीचा राजीनामा विधान परिषदेच्या सभापतींऐवजी राज्यपालांकडे दिला असावा, असं पवार म्हणाले.
****
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या
महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. चालू महिन्यापासून ही वाढ देण्यात येईल. यामुळे राज्य
शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ वरुन ३४ टक्के होणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी दिली.
वयाची ७५ वर्ष
पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल. स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवानिमित्त हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दहीहंडी गोविंदा पथकातल्या गोविंदांना
१० लाखाचं विमा संरक्षण देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. या विमा
संरक्षणाचं प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
भारतरत्न दिवंगत लता
मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू केलं जाणारं आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय, लतादीदींच्या जयंती दिनी, येत्या २८ सप्टेंबरला सुरू करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री शिंदे यांनी
दिले आहे. काल यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जागेअभावी संगीत महाविद्यालय
सुरू करण्यास वेळ लागू नये, यासाठी तात्पुरती
जागा उपलब्ध करून तातडीने यावर्षी किमान प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करावा. त्यानंतर टप्याटप्यानं पदविका आणि पदवी अभ्यासक्रम
सुरू करावेत, असं त्यांनी सांगितलं.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च आणि तंत्र शिक्षण
विभागाची जागा असून, त्याच जागेत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत
महाविद्यालय उभारलं जाणार आहे. यावर्षी
पु.ल.देशपांडे कला अकादमीमध्ये तात्पुरतं महाविद्यालय सुरू करण्याबाबत चर्चा झाली.
****
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि
एकनाथ शिंदे गटापैकी धनुष्यबाण चिन्ह कोणाचं, यावर निवडणूक आयोग निर्णय देण्यापूर्वी
सर्वोच्च न्यायालया आपलं निरीक्षण नोंदवणार आहे. निवडणूक चिन्हाबाबत न्यायालयाचा निर्णय
येण्यापूर्वी निवडणूक आयोग निर्णय देईल, अशी शक्यता असल्यानं, उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च
न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर काल झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय पहिले
आपलं निरीक्षण नोंदेल, असं सांगण्यात आलं.
****
शेतकऱ्यांच्या
आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना कृषीसंबंधी
माहिती द्यावी, असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. काल
मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. चांगल्या वाणांची बियाणं, पीक विमा, कीटकनाशकं, खतं, शासनाच्या कृषी योजना, नवनवीन कृषी संशोधन यासंबंधीची
माहिती शेतकऱ्यांना द्यावी, म्हणजे योग्य मार्गदर्शन मिळून शेतकरी
आत्महत्येचं प्रमाण कमी होईल, असं सत्तार म्हणाले. ग्रामसभा आणि कार्यशाळेच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी कृषीसहायकांना
आराखडा आखून देण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पीक
नुकसानीच्या त्वरित पंचनामे करुन त्यासंबंधीचे प्रस्ताव विमा
कंपन्यांकडे पाठविण्याचे निर्देश सत्तार यांनी संबंधित
अधिकाऱ्यांना दिले आहे.
****
राज्यातल्या गृहरक्षक दल- होमगार्ड
सैनिकांना, शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय आदी ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात
यावं, असा आदेश शासनाने पारित करावा, यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. गृहरक्षक दलाचे
अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ही माहिती दिली. सुरक्षा रक्षक
म्हणून होमगार्ड सैनिकांची नेमणूक करण्यात आली तर सुरक्षा कामात आणखी तत्परता येईल
असं त्यांनी नमूद केलं.
****
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री
डॉ.भारती पवार यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पालकत्व ॲपचं लोकार्पण केलं.
बालकांसाठी जन्मापासून पहिले एक हजार दिवस महत्त्वाचे असून, या दरम्यान बालकांची शारिरिक,
बौद्धिक वाढ होत असते. या ॲपच्या माध्यमातून पालकांना यासंबंधी माहिती उपलब्ध होणार
आहे.
दरम्यान, देशात बालमृत्यू दर
कमी करण्यात वेगानं पावलं उचलली जात आहेत. २०१४ पासून ते २०१९ पर्यंत बाल मृत्यू दर
हा दर हजारी ३५ एवढा कमी झाला असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं.
****
देशात सर्वत्र
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या अंतर्गत नऊ ऑगस्ट
ते १७ ऑगस्ट या कालावधीत, राज्यात स्वराज्य महोत्सवाचं आयोजन
करण्यात आलं असून, या अंतर्गत आज सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीत
गायन हा उपक्रम घेण्यात येत आहे. या उपक्रमात सर्व
नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यातल्या आबालवृद्धांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवा विक्रम
स्थापित करावा, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या उपक्रमात
औरंगाबाद जिल्ह्यातली सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं,
सहकारी तसंच खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठानं,
संस्था यांना सामुहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
लातूर जिल्हा क्रीडा संकुलात
७५ या अंकाची प्रतिकृती करून सामूहिक राष्ट्रगीत होणार असून, जिल्ह्यात विविध शाळा,
महाविद्यालयात, सामाजिक संस्था, नागरिकांनी सामूहिक राष्ट्रगीत गायनात सहभाग घ्यावा,
असं आवाहन, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केलं आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं
औचित्य साधून केंद्र सरकारनं, कोविड प्रतिबंधक खबरदारीची लस मात्रा ७५ दिवस मोफत देण्याची
मोहीम १५ जुलैपासून सुरु केली आहे. ही लसमात्रा घेतलेल्या जालना जिल्ह्यातल्या लाभार्थी उषा
तिकांडे यांनी आकाशवाणीशी बोलताना बूस्टर डोस घेणं आवश्यक असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या...
‘‘मी कोविड काळामध्ये कोरोना
लस पूर्ण केलेली आहे. व तिसरा पण बुस्टरचा डोस घेतलेला आहे. तरी आपण सर्वांनी काळजीपूर्वक
तिसरा बुस्टरचा डोस घेणे. आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. सर्वांनी काळजीपूर्वक आपल्या
सुरक्षेसाठी तिसरा बुस्टरचा डोस घेणे जरुरी आहे.’’
****
राज्यात काल
कोविड संसर्ग झालेले नवे ८३६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण
संख्या, ८० लाख ७४ हजार ३६५ झाली आहे. काल या संसर्गानं दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तर एक हजार २२४ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख १४ हजार ४३३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून,
कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य एक शतांश टक्के झाला आहे.
राज्यात सध्या ११ हजार ७५८ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल ४९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या १७, औरंगाबाद १६, बीड सात, लातूर सहा, तर परभणी जिल्ह्यातल्या तीन रुग्णांचा
समावेश आहे.
****
जालना रेल्वे स्थानकावर उभारण्यात
आलेल्या १०० फूट उंच ध्वजस्तंभावर काल रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते
राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. शंभर फूट उंचीवर फडकणारा हा राष्ट्रध्वज ३० फूट लांब आणि
२० फूट रूंद आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या
जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्यानं आज सकाळी धरणाचे १८ दरवाजे तीन फुटानं उघडण्यात
आले असून, ५६ हजार ५९२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. परिणामी
नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार
सुरू असल्यानं, धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. जिल्ह्यातल्या दारणा तसंच गंगापूर
धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून
सुमारे ३२ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी पात्रात सोडलं जात आहे. पावसाचं
प्रमाण पाहता, या विसर्गात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
****
अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात
होत असलेल्या पावसामुळे भंडारादरा धरण पूर्ण भरलं आहे. सध्या धरणातून ११ हजार ३२५ घनफूट
प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्यातलं निळवंडे धरणही ९० टक्के भरले
असून, त्यामधून विसर्ग सुरु असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीला
पूर आल्याने, अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. नदीची पातळी धोक्याच्या
खुणेपेक्षा तीन मीटरने वाढली आहे. यामुळे भंडारा-तुमसर राज्यमार्ग काल बंद झाला होता. भंडारा शहरातही अनेक भागात पुराचं
पाणी शिरलं आहे.
****
धुळे शहरासह जिल्ह्यात काल सलग
दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरु होती. धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातल्या
अनेक गावात पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं, पिकांचं नुकसान होत आहे. अक्कलपाडा धरणातून
पाण्याचा विसर्ग केला जात असल्यानं शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर आला आहे.
****
No comments:
Post a Comment