आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१७ ऑगस्ट २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात स्वराज्य महोत्सवाअंतर्गत आज समूह राष्ट्रगीत
गायन करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत १७ ऑगस्ट पर्यंत स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
****
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून
मुंबईत सुरू होत आहे. २५ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात विविध सहा अध्यादेश आणि नऊ विधेयकं सदनाच्या पटलावर मांडली जाणार आहेत.
****
स्वदेशी बनावटीची साधनं आणि प्रणाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
यांनी काल लष्कराकडे सुपुर्द केली. भारतीय लष्कराच्या पायाभूत गरजा
काळानुरूप सातत्यानं बदलत असून, भविष्यातल्या आव्हानांकरता
लष्कराला सज्ज राहता यावं यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित पायाभूत विकासाची
गरज राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली.
****
शालेय अभ्यासक्रमाचा नवीन आराखडा तयार करण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय
अभ्यासक्रम आराखड्याच्या सर्वेक्षणात सहभागी व्हावं असं आवाहन केंद्रीय
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शी सुसंगत ठरणारा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा
विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यात महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यात अनेक गावांना काल रात्री भूकंपाचे सौम्य धक्के बसले. नाशिकपासून १५
ते २० किलोमीटर
अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. तीन पूर्णांक चार, दोन पूर्णांक एक आणि
एक पूर्णांक नऊ रिश्टर स्केलचे हे भूकंप दिंडोरी शहर, मडकीजांब, हातनोरे, निळवंडी,
जांबुटके, उमराळे, तळेगाव,
वनारवाडी, पाडे या
परिसरात जाणवल्याचं प्रशासनानं सांगितलं.
****
नाशिक जिल्ह्यातल्या अंकाई किल्ल्यावर
पर्यटनासाठी आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथल्या दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला. मिलिंद
जाधव आणि रोहित राठोड हे पर्यटक काल दुपारच्या सुमारास तळ्यात पोहण्यासाठी उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न
आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्यानं आज सकाळी धरणाच्या १८
दरवाजातून ५६ हजार ५९२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
//********//
No comments:
Post a Comment