Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 August 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२
ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा.
****
कोविड काळात
दोन्ही पालक गामवलेल्या, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या
विद्यार्थ्यांचं शुल्क, सरकार भरणार असल्याची घोषणा, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत
पाटील यांनी आज विधानसभेत केली.
****
मुंबई -
पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झाल्यानंतर थेट लोकेशन मिळणं सोपं होईल अशी यंत्रणा
उभी करण्यावर भर देणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं.
सदस्य वर्षा गायकवाड यांनी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांच्या
अपघाती निधनाबद्दल लक्षवेधी मांडली होती, त्यावर फडणवीस बोलत होते. लेन सोडून जाणाऱ्या
ट्रेलरची माहिती मिळाल्यास थेट कारवाई करता येईल, अशी यंत्रणा उभी करणं गरजेचं असून,
त्यावर आम्ही अत्याधुनिक टेक्नोलॉजीचा वापर करणार आहोत, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
मुंबई-पुणे
महामार्गावर सध्या सर्वात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या मार्गावर आठ लेन करण्यात याव्यात,
म्हणजे अवजड वाहतुकीला जागा मिळेल, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
****
बीड जिल्ह्यात
टँकरद्वारे पाणी पुरवठ्यामध्ये अनियमितता होत असल्याचा मुद्दा आमदार संदीप क्षीरसागर
यांनी उपस्थित केला. वतन ट्रान्सपोर्ट या कंत्राटदार कंपनीने कामात हलगर्जीपणा केलेला
असतानाही या कंपनीला कंत्राट दिल्याबद्दल संबंधीत अधिकार्यांवर कारवाई करणार का, दोषींवर
कारवाई करणार का, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार का, असे प्रश्न आमदार धनंजय मुंडे
यांनी उपस्थित केले.
यासंबंधी
पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक महिन्याच्या आत चौकशी करण्याचे निर्देश
विभागीय आयुक्तांना दिले असून, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करण्याचं
आश्वासन दिलं.
****
मराठवाड्यातल्या
अनेक जिल्ह्यात गोगलगायींमुळे पीकांचं नुकसान होत असल्याबद्दल अभिमन्यू पवार यांनी
लक्षवेधी उपस्थित केली. शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन कृषी मंत्री अब्दुल
सत्तार यांनी दिलं.
****
जालना जिल्ह्यात
समर्थ रामदास यांचं जन्मगाव जांब समर्थ इथल्या राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला
गेल्याचा मुद्दा विधानसभेत माजी मंत्री राजेश टोपे यांनी उपस्थित केला. याप्रकरणी चौकशीचे
आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
****
इतर मागासवर्गीय-
ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून, पाच आठवडे स्थिती
जैसे थे ठेवण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या संदर्भात सुनावणीसाठी विशेष खंडपीठ
गठीत केलं जाणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं. निवडणूक प्रक्रिया सुरु असलेल्या ९२
नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं न्यायालयात पुर्नर्विचार
याचिका दाखल केली आहे.
****
पत्राचाळ
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पाच सप्टेंबर
पर्यंत वाढ करण्यात आली आहे. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना मुंबई
सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. सक्तवसुली संचालनालय - ईडीनं राऊत यांना ३१ जुलै
रोजी अटक केली होती.
****
मराठा समाजाला
न्यायिक कसोटीवर टिकणारं आरक्षण मिळावं, याकरता राज्य मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन करून
मराठा समाजाचं सर्वेक्षण करावं, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं
आहे. शासकीय सेवेत निवड होऊनही नियुक्ती न मिळालेल्या सरसकट सर्व मराठा उमेदवारांना
मानवतेच्या दृष्टीकोनातून अधिसंख्य जागा निर्माण करून त्यांची ज्या पदांवर निवड झाली
आहे, त्याच पदांवर नियुक्ती देण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करू, असं आश्वासन
सरकारनं दिलं होतं, त्याची तात्काळ पूर्तता करावी, अशी मागणीही संभाजीराजे यांनी या
पत्रात केली आहे.
****
कृषिमंत्री
अब्दुल सत्तार यांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा तालुक्यातल्या कवठा शिवारात अतिवृष्टी,
शंखी गोगलगायी यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
प्रशासनाने पंचनामे तात्काळ पूर्ण करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची
दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
****
भारत आणि
झिंबाब्वे दरम्यान तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना हरारे इथं खेळला जात आहे. भारतानं
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
****
टोकियो इथं
आजपासून सुरू होणाऱ्या बी डब्ल्यू एफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत लक्ष्य सेन
आणि किदंबी श्रीकांत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. पी. व्ही. सिंधू हिनं दुखापतीमुळे
या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
एच. एस.
प्रणॉय, साई प्रणित, मालविका बनसोड, सायना नेहवाल यांच्यासह पुरुष दुहेरीतली जोडी सात्विक
साईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी देखील या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
****
No comments:
Post a Comment