आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ ऑगस्ट २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
जालना
जिल्ह्यात समर्थ रामदास यांचं जन्मगाव जांब समर्थ इथल्या राम मंदिरातून
ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या आहेत. विधानसभेत आज माजी मंत्री राजेश टोपे यांनी
हा मुद्दा उपस्थित करुन घटनेची माहिती दिली. या प्रकऱणाची गांभीर्यानं
नोंद घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. याप्रकरणी
चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
****
शिवसेनेच्या
ठाकरे तसंच शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांचर सर्वोच्च न्यायालयात आज होणारी
सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती
आज उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी आता उद्या २३ तारखेला
होईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
बुलढाण्यात स्वाईन फ्लू चा धोका वाढत आहे. गेल्या आठवड्यात एका रूग्णाचा स्वाईन
फ्लूने मृत्यू झाला होता. सध्या दोन बाधित रूग्ण आढळले असून स्वाईन फ्लू संसर्गाचं
प्रमाण १४ टक्के आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून ठोस पावलं उचलण्याची मागणी होत आहे.
****
मराठवाड्यात काल ३८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात
लातूर जिल्ह्यातल्या १४, औरंगाबाद नऊ, उस्मानाबाद आठ, जालना पाच, तर बीड जिल्ह्यातल्या
दोन रुग्णांचा समावेश आहे.
****
भारत आणि झिंबाब्वे दरम्यान तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज हरारे इथं खेळला जाणार
आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी सामन्याला
सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या मालिकेत पहिले दोन सामने जिंकून भारतानं
मालिका दोन-शून्यनं जिंकली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या नाथसागर धरणाच्या विसर्गात घट करण्यात आली. धरणाचे १८ दरवाजे आता एक फुटावरुन अर्धा फूट उंचीवर स्थिर करण्यात आले असून,
गोदावरी नदीपात्रात नऊ हजार ४३२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग
करण्यात येत आहे.
****
हवामान विभागानं उत्तर मध्य महाराष्ट्रासाठी आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या दोन
दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र
आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा
कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment