Thursday, 18 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १८ ऑगस्ट २०२२ सायंकाळी ६.१०

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 August 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ ऑगस्ट २०२ सायंकाळी ६.१०

****

·      सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरं देण्यासाठी शासन वचनबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही.

·      महिला सुरक्षेचा शक्ती कायदा मंजूर करण्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा - उपसभापती निलम गोऱ्हे यांचे आदेश. 

·      वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेची मंजुरी.

आणि

·      झिंबाब्वे विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताची दमदार सुरुवात.

****

सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरं देण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यांच्या हस्ते आज पुणे मंडळ म्हाडाच्या वतीनं बांधण्यात येणाऱ्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा दूरदृष्य प्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी शिंदे बोलत होते. सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधकामाच्या दरात म्हाडा घरं उपलब्ध करुन देत असून म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून पोलीस निवासस्थानंही देण्यात येतील, असं ते म्हणाले.

शासन आणि म्हाडाची विश्वासार्हता वाढीला लागली आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार असून प्रत्येकाच्या मनात सरकारबद्दल असणारा विश्वास अधिक वाढण्यासाठी यंत्रणांनी जोमानं काम करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. राज्यात विविध गृह प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हाडाच्या कार्याचं कौतुक केलं.

****

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी ही मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही लावून धरली. ही मागणी करताना या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली. राज्यात महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सरकारला दिले. गोंदिया इथल्या महिला अत्याचाराच्या प्रश्नावर लवकरात लवकर तपशीलवार चर्चा घेतली जाईल असं त्यांनी सदनाला सांगितलं. राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तुकड्यांना त्रुटी पूर्ततेनंतर अनुदान मंजूर करण्याच्या प्रश्नावरून विरोधी पक्ष सदस्य आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांमध्ये विधान परिषदेत खडाजंगी झाली. त्यामुळं झालेल्या गदारोळामुळं कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.

****

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, संयुक्त जनता दल, महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांचा समावेश असणाऱ्या उपसमितीनं वस्तू आणि सेवा कर- जीएसटीमध्ये होणारी चोरी रोखण्यासाठी पॅकेजमधील वस्तूंवर हा कर आकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं विरोधकांनी तो दोष कोणालाही देऊ नये असं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत वस्तू- सेवाकर सुधारणा विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना नमुद केलं. आता यासंबंधी दुरुस्तीमुळं कलम ४१ मध्ये बदल करून अंतिम करच आकारला जाईल. परतावा मिळेपर्यंत जो कर लागायचा तो आता लागणार नाही. परतावा मिळण्यासाठी सरसकट दोन वर्षांची वेळ अंतिम केली असल्याचंही फडणवीस म्हणाले. छोट्या छोट्या गोष्टींवर हा कर लावणं अन्यायकारक असून किमान अन्नधान्य, शालेय साहित्य आणि रुग्णालयातल्या देयकांवर तरी हा कर लावण्यात येऊ नये असं छगन भुजबळ म्हणाले. शेतकऱ्यांना डिझेलवर अनुदान देण्याचा राज्य सरकारनं विचार करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. जीएसटीची व्याप्ती वाढवून केंद्र सरकार अनेक जिवनावश्यक वस्तूही या कक्षेत आणून कराचं ओझं सामान्य जनतेवर टाकत असल्याची टीका त्यांनी केली. विधानसभेतल्या या चर्चेनंतर हे सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं.

****

राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाबाबत राज्यव्यापी बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असं ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते. राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावला आहे. मात्र काही ठिकाणी वर्ग खोल्यांची बांधणी आणि दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. मराठवाडा विभागातील जुन्या शाळांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, त्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असंही महाजन यांनी यावेळी सांगितलं.

****

अंबाजोगाई इथले पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे यांचं निलंबन करण्यात येत असून, पोलिस उप अधीक्षक सुनील जायभाय यांची अकार्यकारी पदावर बदली करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. अवैध गुटखा प्रकरणासंदर्भात ही कारवाई करण्यात येत आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता.

****

दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू किंवा जखमी झाल्यास मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली. यात पथकातील खेळाडुचा पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास १० लाख रुपये, महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास साडे सात लाख रुपये तर एक अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास पाच लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य करण्यात येईल. हा आदेश केवळ या वर्षीसाठीच असून यासाठी काही अटी आणि शर्ती लागू असणार आहेत.

****

केंद्रीय दूरसंचार विभागानं फाईव्ह जी सेवेसाठीच्या स्पेक्ट्रमचं वितरण दूरसंचार कंपन्यांना केलं आहे. आता दूरसंचार कंपन्यांनी लवकरात लवकर फाईव्ह जी सेवा सुरू करण्याची तयारी करावी, असं आवाहन केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. पुढच्या महिन्यापर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. स्पेक्ट्रमसाठीचे ८ हजार ३१२ कोटी रुपये दिल्यानंतर एअरटेलला काही तासातच स्पेक्ट्रमच्या वितरणाचं पत्र देण्यात आलं. वेगानं ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनिल मित्तल यांनी कौतुक केलं आहे.

****

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सद्भावना दिन पाळला जात आहे. मंत्रालयात पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. जात - वंश - धर्म - भाषाविषयक भेदभाव करु नये. सर्वांनी सामंजस्यानं कार्य करणं आणि अहिंसा तसंच संविधानाच्या मार्गानं मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भातली प्रतिज्ञा पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी यावेळी मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिली.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०८ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३८ लाख ६४ हजार ४१७ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०८ कोटी ९५ लाख ७९ हजार ७२२ मात्रा देण्यात आल्या आहेत.  दरम्यान, देशात काल नव्या १२ हजार ६०८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १६ हजार २५१ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख एक हजार ३४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

भारतानं झिंबाब्वे विरुद्धच्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात हरारे इथं दमदार सुरुवात मिळवली आहे. भारतानं १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तेवीस षटकांत बिनबाद १२१ धावा केल्या आहेत. त्या आधी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेल्या भारतीय संघानं झिंबाब्वेचा डाव ४० षटकं आणि तीन चेंडुंमध्ये १८९ धावांमध्ये बाद केला.

****

 

 

 

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 05 جولائی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 05 July-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...