Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 December
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०४ डिसेंबर २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
· राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन, १ हजार १४३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
· नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी रस्त्याचं ११ डिसेंबरला लोकार्पण, आज मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री महामार्गाची पाहणी करणार
· इतर मागासवर्ग प्रवर्गातील जातींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची ग्वाही
· प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून औरंगाबादमध्ये
जी ट्वेंटी परिषद यशस्वी करण्याचं केंद्रीय वित्त
राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचं आवाहन
· औरंगाबादच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या २४
व्या राज्य क्रीडा महोत्सवाला प्रारंभ
आणि
· भारत -बांगलादेश यांच्यात आजपासून एकदिवसीय क्रिकेट मालिकेला सुरुवात
****
राज्यात
स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घोषणा केली.
दिव्यांग दिनानिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं घेण्यात
आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. दिव्यांग मंत्रालयासाठी १ हजार १४३
कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून महाराष्ट्र हे दिव्यागांसाठी
स्वतंत्र मंत्रालय सुरु करणारं पहिलं राज्य
असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले...
आपल्या राज्यामध्ये देखील
तीन टक्के लोक दिव्यांग बांधव भगिनी आहेत. आणि म्हणून आम्ही ठरवलं, की स्वतंत्र दिव्यांग
मंत्रालय आपण सुरू करू या. आणि आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त स्वतंत्र दिव्यांग
मंत्रालय याची मी घोषणा आज या ठिकाणी करू इच्छितो. आता हा विभाग जो आहे, सामाजिक न्याय
विभागाच्या अंतर्गत येत होता. आता याचं स्वतंत्र मंत्रालय होणार. नव्या विभागांसाठी
स्वतंत्र सेक्रेटरी दर्जाचा अधिकारी त्याला मिळेल. जवळपास दोन हजार त्रेसष्ठ पदं निर्माण
होतील. आणि गोरगरीब, दुर्बल, कष्टकरी, या सर्व दिव्यांग बांधव-भगिनींसाठी एक वरदान
म्हणून हा निर्णय ठरेल.
दिव्यांग दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. लातूर इथं
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीनं प्रभात फेरी काढण्यात आली. शहरातल्या
१२ विशेष शाळांमधील विद्यार्थी या प्रभात फेरीत सहभागी झाले. जिल्हा परिषद इमारतीच्या
प्रांगणात या प्रभात फेरीचा समारोप झाला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्य
सादर केलं.
****
औरंगाबाद इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, घाटीत द हाऊस ऑफ होप या स्वयंसेवी संस्थेनं विविध कार्यक्रमांतून दिव्यांग दिन
साजरा केला रक्तदान शिबीर, दिव्यांगांना
गरजेचं साहित्यवाटप, सर्वांसाठी
मोफत रुग्णवाहिका लोकार्पण आणि घाटीतल्या रक्तपेढीला खाटा देणं या उपक्रमांचा यात
समावेश आहे.
****
नांदेड इथं यशवंतराव चव्हाण सभागृहात दिव्यांगाकरीता न्यायालयीन तरतुदी, निदान आणि उपचार या विषयांवर परिसंवाद घेण्यात आला.जिल्हा
विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजितकौर यांनी न्यायालयीन तरतुदींविषयी तर डॉ.
लक्ष्मीकांत बजाज यांनी दिव्यांगत्व निर्मूलनासाठी शीघ्र निदान आणि उपचार या
विषयांवर मार्गदर्शन केलं.
****
उस्मानाबाद इथं दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
गोळा फेक, लांब उडी, उंच उडी, चाकाच्या
खुर्चीची स्पर्धा यासारख्या विविध १३ क्रीडा प्रकारांमध्ये जिल्ह्यातील जवळपास
तीनशे दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले. चित्रकला स्पर्धा ही काल
घेण्यात आली. दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या विविध वस्तूंचं
प्रदर्शन ही काल भरवण्यात आलं होतं.
****
आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू च्या हस्ते
काल नवी दिल्लीत २०२१ आणि २०२२ या दोन वर्षाचे राष्ट्रीय पुरस्कार वितरीत करण्यात
आले, दिव्यांगांचं सर्वेक्षण करून दिव्यांग सक्षमीकरण
कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत देशात सर्वोत्तम जिल्हा ठरण्याचा मान अकोला जिल्हा
परिषदेनं पटकावला. मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी हा पुरस्कार
स्वीकारला.
महाराष्ट्रातील महात्मा गांधी सेवा संघ या संस्थेला दिव्यांग क्षेत्रातील
राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, संस्थेचे
प्रतिनिधी विजय कान्हेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
****
नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या रस्त्याचं लोकार्पण
करण्यासाठी ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला येणार असल्याची
माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल नागपूर इथं
प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या महामार्गाच्या माध्यमातून ईकॉनोमिक कॉरीडोर तयार
होणार असून १४ जिल्हे जोडले जाणारे आहेत. हा मार्ग विदर्भ मराठवाडा आणि संपुर्ण
राज्याकरता समृद्धी घेऊन येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधानाच्या
दौऱ्यापूर्वी आज आपण मुख्यमंत्र्यासोबत या
महामार्गाची पाहणी करणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.
****
शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांची आखणी
करण्यासाठी सरकारनं समिती स्थापन केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर
मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये डॉ. प्रकाश खांडगे, शाहीर अंबादास तावरे, चारुशिला साबळे, केदार
शिंदे, भरत जाधव, प्रशांत दामले, नंदेश उमप, आदींचा सहभाग आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या
निषेधार्थ मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचं खासदार उदयनराजे भोसले यांनी
सांगितलं आहे. किल्ले रायगड इथं काल निर्धार शिवसन्मानाचा हा मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. आझाद मैदावरच्या या आंदोलनाची तारीख
लवकरच जाहीर करणार असल्याचंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
****
इतर मागासवर्ग - ओबीसी
आयोगाचा अध्यक्ष म्हणून ओबीसी प्रवर्गातील जातींच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागू
देणार नाही, असं राष्ट्रीय मागासवर्गीय
आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष हंसराज अहीर यांनी म्हटलं आहे. काल नागपूर इथं
विमानतळावर नागरिकांनी अहीर यांचं स्वागत केलं, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी आयोगाला
सांविधानिक अधिकार दिले असून, ताकद
दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेप्रमाणे विषमता संपवणे आणि
सर्वांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आयोगाकडून केला जाईल असं अहिर यांनी यावेळी सांगितलं.
****
प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून औरंगाबाद इथं नियोजित जी ट्वेंटी परिषद
यशस्वी करण्याचं आवाहन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे.
काल औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात जी-20 शिखर परिषद नियोजनाच्या आढावा बैठकीत डॉ कराड बोलत होते. येत्या १३ आणि १४
फेब्रुवारीला औरंगाबाद इथं होणारी ही परिषद महिला आणि बालकल्याण या विषयावर असणार
आहे. या परिषदेत विविध २० मुद्यांवर चर्चा होणार आहे. यामध्ये आठ विषय हे अर्थ
विषयक असतील तर इतर १२ मुद्द्यांमध्ये उद्योग, व्यापार, पर्यटन, आदी विषयांचा समावेश आहे. परिषदेचे प्रतिनिधी वेरूळ, अजिंठा, दौलताबाद
मधील पर्यटन तसंच औद्योगिक
क्षेत्रातील प्रगतीचीही पाहणी करणार आहेत.
****
कौशल्य विकास विभागाद्वारे कंपन्या, उद्योग क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात पाच लाख रोजगार देण्यात
येतील, असं राज्याचे कौशल्य रोजगार
आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा
यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल महारोजगार मेळावा घेण्यात आला. या
मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी लोढा बोलत होते. या मेळाव्याला विविध कंपन्या, उद्योगांनी सहभाग घेऊन आठ हजार ४४८ रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती
घेतल्या.
****
कोणत्याही खेळात विजेतेपद पटकावयाचं असेल तर खेळाडूकडे ’पॅशन, डेडीकेशन आणि हार्डवर्क’ या त्रिसुत्रीची आवश्यकता असल्याचं, प्रख्यात हॉकीपट्टृ धनराज पिल्ले यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २४ व्या राज्य क्रीडा महोत्सवाला कालपासून प्रारंभ
झाला, या महोत्सवाच्या उद्घाटन
सोहळ्यात धनराज पिल्ले बोलत होते. तुळजापूरहून औरंगाबादला आलेल्या क्रीडा ज्योतीने
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाची मशाल
प्रज्वलित करून या महोत्सवाचं उद्घाटन झालं. क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री गिरीश
महाजन, कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरु
डॉ. श्याम शिरसाठ, क्रीडा
संचालक डॉ. दयानंद कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या
महोत्सवात खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, अॅथलेटिक्स या पाच प्रकारात होणाऱ्या स्पर्धांसाठी
राज्यातल्या २२ विद्यापीठाचे २ हजार १२० खेळाडू सहभागी झाले आहेत. यावेळी मराठवाडयातील पहिल्या सिंथेटिक ट्रॅकचं भूमिपूजन डॉ. कराड
यांच्या हस्ते करण्यात आलं. ११ कोटी ७५ लाख रुपये खर्चून १० लेनच्या ४०० मीटर
लांबीचा हा सिंथेटिक ट्रॅक असणार आहे.
****
भारत
हा जगातील सर्वाधिक तरुणांचा देश असून, त्यांनी व्यसनाकडे न वळता व्यायामाकडे लक्ष द्यावं तसंच क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल
भवितव्यासाठी युवा वर्गाने क्रीडा गुण विकसित करावेत असं आवाहन क्रीडा आणि युवक
कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी केलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं मातोश्री दगडुबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित
एकोणपन्नासाव्या कुमार - कुमारी गट राज्य
अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२२ चं उद्घाटन केल्यानंतर काल ते बोलत
होते. तरुणांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा, यासाठी गंगाखेड इथे व्यायामशाळा उभी करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर
करून देण्याचं आश्वासन क्रीडा मंत्री महाजन यांनी यावेळी दिलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरसाठी लवकरच स्वतंत्र अतिरिक्त जिल्हाधिकारी
आणि उपविभागीय पोलिस अधिकारी ही दोन पदं उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं आमदार
राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. काल तुळजापूर इथं पत्रकार परिषदेत ते बोलत
होते. तुळजापूर इथं तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार रूपी
आशीर्वाद देतांनाचं शिल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
तुळजाभवानी मंदिरातील गाभारा, भाविकांच्या
दर्शनाची व्यवस्था, पार्किंग, सुरक्षा, निवास, प्रसाद या सुविधा तिरूपतीच्या धर्तीवर उभारून दरवर्षी अडीच
कोटी भाविकांची संख्या गृहीत धरून तुळजापूरला केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने
वैश्विक दर्जाचे तीर्थक्षेत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचही पाटील यांनी
सांगितलं.
****
सत्य बोलणारं साहित्य हे समाजाचं दर्पण असतं, प्रगतीशील साहित्य हे जुन्या कटू घटनांना विसरुन वैज्ञानिक दृष्टिकोनातून
उद्याचं भविष्य नव्या पद्धतीने दाखवत असल्याचं मत ज्येष्ठ शायर, गीतकार हसन कमाल यांनी व्यक्त केलं आहे. काल औरंगाबाद इथं
प्रगतिशील लेखक संघाच्या ११ व्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या
उद्घाटनपर भाषणात हसन कमाल बोलत होते. प्रगतीशील लेखक संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस
सुखदेवसिंग सिरसा यांनी अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हिंदीमध्ये अनुवादीत व्हावं
अशी इच्छा व्यक्त केली. या संमेलनात काल परिसंवादासह निमंत्रिताचं कवी संमेलन, 'कामगार चौक' ही
एकांकिका आणि त्यानंतर शाहिरी जलसा झाला.
****
कतार
इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल स्पर्धेत, कालपासून अंतिम १६ संघांमध्ये लढतीला प्रारंह झाला. नेदरलँडच्या संघानं काल
अमेरिकेचा ३-१ असा
पराभव करत उपान्त्यपूर्व फेरी गाठली. तर साखळी फेरीतही नेदरलँडने सेनेगल आणि
कतारचा प्रत्येकी २-० अश्या गुणांनी पराभव केला. जी गटातल्या अखेरच्या सामन्यात
स्वित्झर्लंडनं सर्बियाचा ३-२ असा पराभव करत उपउपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला तर साखळी सामन्यात कॅमेरुनच्या संघानं ब्राझिलचा १ -० असा पराभव केला, मात्र या विजयानंतरही कॅमेरुन पुढची फेरी गाठू शकला नाही.
****
भारत
आणि बांगलादेश यांच्यात आजपासून एकदिवसीय क्रिकेट मालिकेला सुरुवात होत आहे. आज
मीरपूरमध्ये पहिला सामना खेळला जाणार आहे. सकाळी साडे ११ वाजता
या सामन्याला सुरुवात होईल.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या २१६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आतापर्यंत सरपंचपदासाठी १ हजार १४२ तर
ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ५ हजार ६७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
तर
जालना जिल्ह्यातल्या २६६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आतापर्यंत सरपंच पदाच्या २६६
जागेसाठी १ हजार चारशे ६ उमेदवारांनी तर सदस्यांच्या २ हजार १७८ जागेसाठी ६ हजार
३३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
****
No comments:
Post a Comment