Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ डिसेंबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
सिक्कीम इथं सैन्य दलाचं वाहन दरीत कोसळून १६ सैनिक हुतात्मा.
·
संसदेचं हिवाळी अधिवेशन मुदतीच्या सहा दिवस आधीच अनिश्चित काळासाठी
संस्थगित.
·
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी राज्य सरकार येत्या सोमवारी
विधीमंडळात ठराव मांडणार.
·
जागतिक छायाचित्र स्पर्धेत औरंगाबाद इथले छायाचित्रकार बैजू
पाटील यांचा दुसरा क्रमांक.
आणि
·
बांगलादेशाविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला
डाव ३१४ धावांवर संपुष्टात.
****
सिक्कीम
इथं भारतीय सैन्य दलाचं वाहन दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात १६ सैनिक हुतात्मा
तर ४ सैनिक जखमी झाले. लाचेन परिसरात आज सकाळी हा अपघात झाला. या घटनेबद्दल राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र दु:ख
व्यक्त केलं आहे.
****
संसदेचं
हिवाळी अधिवेशन आज अनिश्चित काळासाठी संस्थगित झालं. ७ डिसेंबरला सुरू झालेलं हे अधिवेशन
२९ डिसेंबरला संपणार होतं. लोकसभेत आज सकाळी सदनाचं कामकाज सुरू होताच सभापती ओम बिर्ला
यांनी ही घोषणा केली. या अधिवेशनात एकूण १३ बैठका झाल्या. ६८ तास ४२ मिनिटे कामकाज
चाललं. या अधिवेशनात सदनात ९ विधेयकं मांडण्यात आली त्यापैकी ७ विधेयकं मंजूर झाली.
अधिवेशन काळात सभागृहानं ९७ टक्के काम केल्याचं बिर्ला यांनी सांगितलं.
राज्यसभेत
१०२ टक्के कामकाज झाल्याचं राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सांगितलं. राज्यसभेनं
या अधिवेशनात ९ विधेयकं मंजूर केली. ३१ खाजगी विधेयकंही सभागृहात मांडण्यात आली. गोंधळामुळे
सभागृहाचा १ तास ४६ मिनिटं वेळ वाया गेला, असंही सभापतींनी सांगितलं.
****
काँग्रेस
पक्ष कोविड अनुरूप वर्तणुकीचं पालन करत नसल्याची टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह
ठाकूर यांनी केली आहे. ते आज संसद भवन परिसरात बातमीदारांशी बोलत होते. राहुल गांधी
यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोविड
संसर्ग झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शेजारी देशांमधून आलेल्या कोविडच्या नव्या
उप-प्रकारचा प्रादुर्भाव पाहता, खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारला
काँग्रेसची यात्रा थांबवायची असल्याचा आरोप ठाकूर यांनी फेटाळून लावला.
****
भारत
बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारने मंजुरी
दिली आहे. ही लस कोविन ऍपवर आजपासून उपलब्ध होणार आहे. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन
या लसी घेतलेलेही भारत बायोटेकची लस घेऊ शकतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान,
कोविड संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या
आरोग्य मंत्र्यांची बैठक होत आहे.
****
महाराष्ट्र
- कर्नाटक सीमा प्रश्नी राज्य सरकार येत्या सोमवारी विधीमंडळात ठराव मांडणार आहे. सीमा
संरक्षण राज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधान भवन परिसरात ही माहिती दिली. कर्नाटक
सरकारनं नुकत्याच संमत केलेल्या विधेयकापेक्षा हा ठराव अधिक सक्षम असेल, अशी माहितीही
देसाई यांनी दिली. हा ठराव आजच मांडला जाणार होता, मात्र आमदार मुक्ता टिळक यांच्या
निधनामुळे हा निर्णय पुढे ढकलल्याचं देसाई यांनी सांगितलं. दरम्यान, सीमा प्रश्नासंदर्भात
राज्य सरकार केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे. गृहमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत
दिलेला शब्द कर्नाटकचे मुख्यमंत्री पाळत नसल्याकडे गृहमंत्र्यांचं या पत्रातून लक्ष
वेधलं जाणार आहे.
****
आमदार
मुक्ता टिळक यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात
आले. शासनाच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र
अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी
मुक्ता टिळक यांच्या पार्थिव देहाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
****
आमदार
जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीचे आमदारांनी
आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या
नेतृत्वात महाविकास आघाडीनं हे आंदोलन केलं. शिंदे - फडणवीस सरकारने आवाज दाबण्यासाठी
पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
****
प्रवाशांचा
सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असून परिवहन विभागाच्या परवान्याचे नियम आणखी कडक करण्यात
येणार असल्याचं शंभुराज देसाई यांनी सांगितलं. नाशिक - औरंगाबाद मार्गावर खाजगी बसला
झालेल्या अपघातात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती, त्या पार्श्वभूमीवर
आमदार सचिन अहिर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. बसच्या तपासणीसाठी
भरारी पथकांची क्षमता वाढवली जाणार असल्याचंही देसाई यांनी सांगितले
****
राष्ट्रकुल
संसदीय मंडळाच्या संसदीय अभ्यासवर्गातून सुसंस्कृत आणि अभ्यासू युवापिढी राजकारणात
येईल विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे.
नागपूर इथं राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात
द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे
महत्त्वपूर्ण योगदान’ याविषयावर दानवे बोलत होते. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात
ही युवापिढी महत्त्वाची भूमिका निभावेल असं ते यावेळी म्हणाले.
****
उमेश
कोल्हे हत्याप्रकरणावरुन आमदार रवी राणा यांनी आज विधानसभेत माजी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. हे हत्या प्रकरण दाबण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी एका काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरुन पोलिसांना फोन केला होता,
असा आरोप रवी राणा यांनी केला. या हत्या प्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेने नेण्यातही
तत्कालीन सरकारचा हात आहे. त्यामुळे याप्रकरणाची आणि उद्धव ठाकरे यांची विशेष पथकामार्फत
चौकशी व्हावी, अशी मागणीही राणा यांनी केली.
****
‘क्रोमॅटिक
२०२२’ या जागतिक छायाचित्र स्पर्धेत औरंगाबाद इथले प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बैजू
पाटील यांच्या ‘हत्तीचे धुलीस्नान’ या फोटोला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
या १९६ देशातील फोटाग्राफर सहभागी झाले होते. जीम कार्बेट नॅशनल पार्कमध्ये सतत आठ
दिवस प्रयत्नांनंतर बैजू पाटील यांनी हा क्षण टिपता आला. या छायाचित्रात एका कोल्ह्याने
त्याच्या तोंडात शिकार पकडलेली दिसते. हत्तीच्या पार्श्वभूमीवर सूर्याची पहाटेची किरणे
आणि कोल्ह्यांचा अंडरएक्स्पोज फोटो यामुळे या फोटोचं सर्वत्र कौतुक होत आहे.
****
बांगलादेशाविरुद्ध
ढाका इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव आज ३१४ धावांवर
संपुष्टात आला. भारतानं कालच्या बिनबाद १९ धावसंख्येवरून आज खेळ पुढे सुरू केला. मात्र
कर्णधार के. राहुल १० धावांवर तर शुभमन गील २० धावांनी पायचीत झाला. चेतेश्वर पुजारा
आणि विराट कोहली प्रत्येकी २४ धावा काढून तंबूत परतले. ऋषभ पंतने सर्वाधिक ९३ धावा
तर श्रेयस अय्यरने त्याखालोखाल ८७ धावा केल्यानं भारताच्या धावसंख्येला आकार आला. उमेश
यादव १४, मोहम्मद सिराज सात, तर अक्षर पटेल चार धावांवर बाद झाले. जयदेव उनादकट १४
धावांवर नाबाद राहिला. आजचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशच्या बिनबाद सात धावा झाल्या
आहेत. कसोटीत भारत ८० धावांनी आघाडीवर आहे.
****
सोलापूर
इथं हिताची पेमेंटस सर्व्हिसेस कंपनीच्या एटीएम मधून सुमारे १० लाख रुपये चोरणाऱ्या
तिघांना सोलापूर पोलिसांनी अटक केली. राहुल खान, मोहम्मद असिम खान, आणि मोहम्मद सलिम
खान अशी या तिघांची नावं असून, ते हरियाणातले रहिवासी आहेत. या तिन्ही आरोपींकडून पोलिसांनी
एक कार, १२ एटीएम कार्ड आणि ३० हजार रुपये असा मुदेमाल जप्त केला. या तिघांनी ऑक्टोबर
महिन्यात वेगवेगळ्या एटीएममधून हे पैसे चोरल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास देशमुख
यांनी दिली.
****
राज्यात
आनंदाचा शिध्याचा ९७ टक्के शिधापत्रिकाधारकांनी लाभ घेतल्याची माहिती अन्न आणि नागरी
पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांची आज विधान परिषदेत दिली. विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. ज्याठिकाणी जास्त दरानं शिधा वाटप
झालं तिथं गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसंच शिधा पोहचण्यास उशीर झाल्यानं सहा कोटी
५१ लाख ८०५ रुपये दंड ठोठावण्यात आल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं
****
मागासवर्गीय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ७ कोटी ५९ लाख रुपये निर्वाह भत्ता देण्यात आल्याची माहिती
मंत्री संजय राठोड यांनी आज विधान परिषदेत दिली. सदस्य डॉ.मनिषा कायंदे यांच्या लक्षवेधी
सूचनेला ते उत्तर देत होते. राज्यात मागासवर्गीय मुलामुलींची ४४१ शासकीय वसतीगृहं आहेत.
वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी संवाद हा उपक्रम राबवण्यात आला असून यात अनेक
गृहपालांविरुध्द तक्रारी प्राप्त झाल्या, यातील दोषी आढळलेल्या २८ गृहपालांविरुद्ध
कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती राठोड यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment