Saturday, 24 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 24 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २४ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ; माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतनासंदर्भात वन रँक वन पेन्शन योजनेत सुधारणेलाही मान्यता

·      काँग्रेस पक्ष कोविड अनुरूप वर्तणुकीचं पालन करत नसल्याची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांची टीका

·      सीमा प्रश्नी राज्य सरकार सोमवारी विधीमंडळात ठराव मांडणार;विरोधकांचं सदनाबाहेर ठिय्या आंदोलन

·      उमेश कोल्हे हत्याप्रकरणी आमदार रवी राणा यांचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप

·      आयसीसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयकडून अटक

·      औरंगाबाद शहराला एक जानेवारीपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या आराखड्यास मान्यता

·      पीकविम्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्हा कृषी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

आणि

·      बांगलादेशाविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३१४ धावांवर संपुष्टात

 

सविस्तर बातम्या

गरीबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतनासंदर्भात वन रँक वन पेन्शन योजनेत सुधारणेलाही केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली. एक जुलै २०१९ पासून पूर्वलक्षी प्रभावाने ही सुधारणा लागू होईल. याचा देशभरातल्या २५ लाखाहून अधिक निवृत्त सैनिकांना लाभ होईल.

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी संस्थगित झालं. ७ डिसेंबरला सुरू झालेलं हे अधिवेशन २९ डिसेंबरला संपणार होतं. या अधिवेशनात लोकसभेत ९ विधेयकं मांडण्यात आली त्यापैकी ७ विधेयकं मंजूर झाली. राज्यसभेनं या अधिवेशनात ९ विधेयकं मंजूर केली. ३१ खाजगी विधेयकंही सभागृहात मांडण्यात आली.

****

काँग्रेस पक्ष कोविड अनुरूप वर्तणुकीचं पालन करत नसल्याची टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी केली आहे. ते काल संसद भवन परिसरात बातमीदारांशी बोलत होते. सरकारला काँग्रेसची यात्रा थांबवायची असल्याचा आरोप ठाकूर यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले...

 

Byte…

एक और कोविड-19 के प्रोटोकॉल को पालना काँग्रेस पार्टी नही कर रही। बी एफ सेवन जो नया व्हेरिएंट आया है, दुनिया भर एक चिंता का विषय बना है। और राहुल गांधीजी की यात्रा मे ही हिमाचल प्रदेश के मुख्यमंत्री जिनके साथ वो गले में हाथ डालकर चल रहे थे वो पॉजिटीव्ह पाये गये। क्या राहुल गांधी भी कोविड पॉजिटीव्ह है? क्या उन्होंने अपना टेस्ट करवाया है? ऐसे कितने और नेता काँग्रेस के पॉजिटीव्ह पायेंगे इस यात्रा में? भारत जोडो यात्रा दो महिने चल रही है किसको फरक पडता है? लेकिन इसका फरक पडता है की इनके कारण, हजारो लोग अगर संक्रमित होते है तो उसका दबाव स्वास्थ विभाग पर पडता है। अस्पतालों पर पडता है, फ्रंट लाईन वर्कर्स को चिंता करनी पडती है।

****

चीनसह अन्य देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी काल सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी रुग्णालयात आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असण्यावर भर द्यावा, मागच्या काळात कोविड परिस्थितीचा सामना करतांना दाखवलेली एकता आणि सहयोग यावेळेसही तसाच कायम असावा असं, मांडवीय यांनी यावेळी सांगितलं.

****


भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही लस कोविन ऍपवर उपलब्ध होणार आहे. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या लसी घेतलेले नागरिक देखील भारत बायोटेकची ही लस घेऊ शकतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

सिक्कीम इथं भारतीय सैन्य दलाचं वाहन दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात १६ सैनिक हुतात्मा तर ४ सैनिक जखमी झाले. लाचेन परिसरात काल सकाळी हा अपघात झाला. या घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.

****

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी राज्य सरकार येत्या सोमवारी विधीमंडळात ठराव मांडणार आहे. सीमा संरक्षण राज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी काल विधान भवन परिसरात ही माहिती दिली. ते म्हणाले...

 

Byte…

आजच आपण ठराव करणार होतो, त्यांच्या ठरावापेक्षा प्रभावी ठराव. आपली बाजू भक्कमपणाने मांडणारा. त्या मराठी भाषिक लोकांच्या पाठीशी महाराष्ट्र आहे. शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि महाराष्ट्रातील १३ कोटी जनता आहे हे दाखवणारा, हे स्पष्ट करणारा एक अतिशय विस्तृत ठराव. भरभक्कम ठराव मांडण्याचा आज आपण निश्चित केलं होतं. पण विद्यमान सदस्य टीळक ताईंच्या निधनामुळे आज कुठलंही कामकाज झालं नाही. आपला अतिशय चांगला रिजोल्युशन, चांगला ठराव सोमवारी विधानसभेत, विधान परिषदेत पास करण्याचं आपण नियोजन केलेलं आहे.

 

दरम्यान, सीमा प्रश्नासंदर्भात राज्य सरकार केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे. गृहमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत दिलेला शब्द कर्नाटकचे मुख्यमंत्री पाळत नसल्याकडे गृहमंत्र्यांचं या पत्रातून लक्ष वेधणार असल्याचं, देसाई यांनी सांगितलं.

****

आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीनं हे आंदोलन केलं. शिंदे - फडणवीस सरकारने आवाज दाबण्यासाठी पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

****

उमेश कोल्हे हत्याप्रकरणावरुन आमदार रवी राणा यांनी काल विधानसभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. हे हत्या प्रकरण दाबण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरुन पोलिसांना फोन केला होता, असा आरोप रवी राणा यांनी केला. ते म्हणाले...

Byte…

जेव्हा त्यांची भर चौकात हत्या करण्यात आली उमेश कोल्हेंची, राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन उद्‌धवजी ठाकरे यांना फोन आला, की हा पूर्ण तपास रॉबरीच्या दिशेने करा. त्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि मी सुद्धा देशाचे गृहमंत्री अमित शहाजींकडे गेलो. त्यांना विनंती केली आणि त्यांनी एन आय ए ची चौकशी लावली. तेव्हा एन आय ए ची टीम दिल्लीवरून अमरावतीला आली अध्यक्ष महोदय, तेव्हा लक्षात आलं की नुपूर शर्माची पोस्टचं उमेश कोल्हेंनी समर्थन केलं म्हणून भर चौकामध्ये त्यांची हत्या केली. मी मागणी करतो अध्यक्ष महोदय, की एस आय टी च्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे.

शंभूराज देसाई यांनी यावर उत्तर देताना, या प्रकरणी विस्तृत अहवाल राज्याच्या गुप्तचर विभागाकडून घेण्यात येईल आणि तो येत्या १५ दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात येतील, असं जाहीर केलं. याप्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेनं नेण्यासाठी दबाव आणण्यात आला का, पोलिसांना कोणी कोणी फोन केले? याचा मुद्देसूद अहवालही गुप्तचर विभागाकडून घेण्यात येईल आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाईल, असंही देसाई यांनी सांगितलं आहे.

****

आयसीसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआय नं काल दिल्लीत अटक केली. आयसीआयसीआय बँकेने २००९ ते २०११ या कालावधीत व्हिडिओकॉन समूहाला सुमारे १ हजार ८७५ कोटी रुपये कर्ज दिलं होतं. या कर्जप्रकरणात अनियमितता केल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्याविरोधातही सीबीआयनं २०१९ मध्ये गुन्हा नोंदवला आहे.

****

मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ७ कोटी ५९ लाख रुपये निर्वाह भत्ता देण्यात आल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी काल विधान परिषदेत दिली. राज्यात मागासवर्गीय मुलामुलींची ४४१ शासकीय वसतीगृहं आहेत. वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी संवाद हा उपक्रम राबवण्यात आला असून यात अनेक गृहपालांविरुध्द तक्रारी प्राप्त झाल्या, यातील दोषी आढळलेल्या २८ गृहपालांविरुद्ध कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती राठोड यांनी दिली आहे.  

****

अनुसूचित जमातीची प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर रिक्त झालेली तीन हजार ८९८ पदं तातडीनं भरणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल विधानसभेत दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार जागांमध्ये आरक्षणाप्रमाणे अनुसूचित जमातीच्या जागा भरण्यात येतील, अशी माहिती केसरकर यांनी दिली.

****

अल्पसंख्याक समाज विकास योजनांसाठी असणारा निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल तसंच रिक्त पदभरतीसंदर्भात तत्काळ कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल विधानसभेत दिली.

****

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे औरंगाबाद महापालिकेने सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी तातडीने अंमलबजावणीची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गत तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने तयार केलेल्या आराखड्यास मान्यता मिळाली आहे. येत्या एक जानेवारीपासून ६० टक्के शहराला तीन दिवसांआड तर ४० टक्के शहराला सहा दिवसांआड पाणी मिळणार आहे. हा प्रयोग शहरात दर महिन्यात दोन टप्प्यात आळीपाळीने राबवला जाणार आहे.

****

हिंगोली इथं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी काल जिल्हा कृषी कार्यालयावर मोर्चा काढला. विमा कंपनीकडून अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळालेली नसल्यानं हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी येत्या १५ दिवसांत संरक्षित रक्कम तसंच प्रलंबित १३ कोटी ८९ लाख रुपये देण्याचं लेखी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी  हे आंदोलन मागे घेतलं.

****

‘क्रोमॅटिक २०२२’ या जागतिक छायाचित्र स्पर्धेत औरंगाबाद इथले प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांच्या ‘हत्तीचे धुलीस्नान’ या फोटोला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. या १९६ देशातील फोटाग्राफर सहभागी झाले होते.

****

अंधांसाठीचा टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल राष्ट्रपती भवनात भेट घेतली. अनेक आव्हानांचा सामना करत उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल राष्ट्रपतींनी या संघाचं अभिनंदन केलं.

****

बांगलादेशाविरुद्ध ढाका इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव काल ३१४ धावांवर संपुष्टात आला. भारतानं बिनबाद १९ धावसंख्येवरून काल सकाळी खेळ पुढे सुरू केला. ऋषभ पंतने सर्वाधिक ९३ धावा तर श्रेयस अय्यरने त्याखालोखाल ८७ धावा केल्यानं भारताच्या धावसंख्येला आकार आला. कालच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशच्या बिनबाद सात धावा झाल्या होत्या. या कसोटीत भारत ८० धावांनी आघाडीवर आहे.

****

औरंगाबाद इथे येत्या बुधवारी २८ तारखेपासून विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या विभागीय क्रीडा संकुलात दोन दिवस या स्पर्धा घेण्यात येतील.

****

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील मठाचे मठाधीश रेणुकाचार्य शिवाचार्य महास्वामी यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते.

****

औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या ७३ व्या अखिल भारतीय वाणिज्य परिषदेत दोन दिवसात ५९२ शोधनिबंध सादर झाले, परिषदेचे संयोजन सचिव डॉ.वाल्मिक सरवदे यांनी ही माहिती दिली. या परिषदेत देशभरातून १ हजार ५४७ प्रतिनिधी सहभागी झाले. एकूण ९१२ शोधनिबंध प्राप्त झाले, त्यापैकी ५९२ निबंधांचं प्रत्यक्ष वाचन करण्यात आलं. आज या परिषदेचा समारोप होत आहे.

****

मराठवाड्यात काल वेळ अमावस्येचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. उस्मानाबाद, लातूर, आणि बीड जिल्ह्यात काल शेतांमधून नागरिकांनी या सणानिमित्त शेतात पूजा करून वनभोजनाचा आनंद लुटला.

****

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कालपासून नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या सप्तश्रृंगी देवी मंदिरात,  पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात, शिर्डी इथल्या साईबाबा मंदिरात तसंच तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात भाविकांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. भाविकांनी सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचंही पालन करावं, असं मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...