Thursday, 8 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 08.12.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 December 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०८ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. दोन्ही राज्यातील विधानसभा तसंच उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा आणि पाच राज्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी प्रारंभ झाला. त्यानुसार आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये दोन जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे. यामध्ये पक्षाचे नेते हार्दिक पटेल विजयी झाले आहेत. विधानसभेच्या एकूण १८२ जागांपैकी १५३ जागांवर भाजप आघाडीवर आहे, काँग्रेस १८ जागांवर, तर आम आदमी पार्टी ६ ठिकाणी आघाडीवर आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस ३८ जागांवर आघाडीवर असून सत्ताधारी भाजप २६ जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर विजयी घोषित झाले आहेत. याशिवाय ३ अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशमधल्या मैनपुरी लोकसभा मतदार संघात समाजवादी पक्षाच्या डिम्पल यादव आघाडीवर आहेत. विधानसभेच्या एका जागेवर राष्ट्रीय लोक दलाचा उमेदवार आघाडीवर आहे. राजस्थानमधल्या एका जागेसाठीच्या पोट निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे. ओडिशामधे बिजू जनता दल तर छत्तीसगढमधल्या एका जागेवर काँग्रेस पक्ष सध्या आघाडीवर आहे. बिहारच्या एका जागेच्या या निवडणुकीत, जनता दल युनायटेड आघाडीवर आहे.

***

देशात थेट परकीय गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकारनं गुंतवणूकदार स्नेही धोरण लागू केलं असून, या अंतर्गत काही धोरणात्मकदृष्ट्या महत्वाची क्षेत्रं वगळता बहुतांश क्षेत्रं स्वयंचलित मार्गानं परकीय गुंतवणूकीसाठी खुली करण्यात आली आहेत. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

भारत गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं आणि अनुकूल गंतव्यस्थान राहील हे सुनिश्चित करण्यासाठी एफडीआय बाबतच्या धोरणाचं सातत्त्यानं पुनरावलोकन केलं जातं. सर्वोच्च स्तरावरील उद्योग संस्था, संघटना, क्षेत्रीय मंत्रालयं आणि उद्योगसमुहांचे प्रतिनिधी आणि इतर संस्थांसह भागधारकांशी विस्तृत सल्लामसलत केल्यानंतर या धोरणात बदल केले जातात. त्यानुसार सरकारनं अलीकडेच संरक्षण, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, विमा आदी क्षेत्रांमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत असंही मंत्री सोमप्रकाश यांनी सांगितलं.

***

लोकसभेत काल सादर करण्यात आलेलं बहु-राज्य सहकारी समिति संशोधन विधेयक २०२२ आज मंजुरीसाठी प्रस्तावित आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल हे विधेयक सादर केलं. लोकसभेत आज सागरी चाचेगिरी विधेयकावर चर्चा होईल. समुद्रात होणारी लुटमार रोखण्यासाठीची तरतूद तसंच अश्या गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद असणारं हे विधेयक काल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी सादर केलं. उर्जा संरक्षण अधिनियम २००१ मध्ये सुधारणेसाठीचं विधेयक २०२२ यावरही आज राज्यसभेत चर्चा होईल. लोकसभेत यापूर्वीच हे विधेयक पारित झालेलं आहे.

***

स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांनी काळाच्या गरजेनुसार अभियांत्रिकी, कृषी आणि वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या समावेशासह विषयांची मांडणी करून, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमक्रम सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा. संबंधित अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांच्या कायद्यातील तरतुदीत सुधारणा करण्यासंदर्भात शासन सकारात्मक विचार करेल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांच्या कायद्यातील तरतुदी बदलाबाबत, अग्रगण्य शैक्षणिक आणि संशोधन संघटनेच्या समस्यांबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत काल ते बोलत होते.

 कोरोना काळानंतर वैद्यकीय क्षेत्र अधिक विस्तारण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकसंख्येनुसार वैद्यकीय यंत्रणा असणं गरजेचं असून, अश्या प्रस्तावांबाबत उच्चस्तरीय बैठकीत शासनस्तरावर सकारात्मक विचार करण्यात येईल. याचबरोबर कृषी आणि अभियांत्रिकी या क्षेत्रातही नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांच्या कायद्यातील तरतुदीत योग्य तो बदल करण्याचा विचार करण्यात येईल असंही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

***

सोलापूरमध्ये  येत्या ११ डिसेंबर रोजी गुरव समाजाचं राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. या महाअधिवेशनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

//**********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...