Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 21 February 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २१ फेब्रुवारी
२०२३ दुपारी १.०० वा.
****
राज्यातल्या
संत्तासंघर्षासंदर्भात शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध
याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आजपासून पुन्हा
सुनावणी सुरु झाली. ठाकरे गटाच्या वतीने विधिज्ञ कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरु
आहे. शिंदे गटातल्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना राज्यपाल
मुख्यमंत्र्यांना शपथ कशी देऊ शकतात, पक्षात दोन गट पडले असताना निवडणूक आयोग एका
गटाला चिन्ह कसं देऊ शकतं, असे प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केले. राज्यपालांच्या
अधिकारासंदर्भातही त्यांनी भाष्य केलं. पक्षांतल्या बंडखोरीमुळे लोकशाहीला धोका
निर्माण होतो, त्यामुळे पक्षांतर बंदीचा कायदा बदलण्याची गरज आहे, असा युक्तीवाद
सिब्बल यांनी केला.
दरम्यान,
शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्य बाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला
द्यायच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या याचिकेवर उद्या दुपारी साडे तीन वाजता
सुनावणी होणार आहे.
****
डिजिटल
आर्थिक व्यवहारात भारत जगातल्या अग्रणी देशांपैकी एक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. भारताच्या युपीआय आणि सिंगापूरच्या पे नाऊ या डिजिटल
आर्थिक व्यवहारांच्या दोन यत्रणांमधील संपर्क सुविधेचा प्रारंभ; आज पंतप्रधान मोदी
आणि सिंगापुरचे पंतप्रधान ली सीएन लुंग यांच्या दूरस्थ उपस्थितीत झाला, त्यानंतर
ते बोलत होते. डिजिटल इंडिया अभियानामुळे प्रशासन आणि सार्वजनिक सेवा वितरणामध्ये
अभूतपूर्व सुधारणा शक्य झाल्या असल्याचं पंतप्रधान म्हणाले. कोविड महामारीच्या
काळात भारत सरकार कोट्यवधी लोकांच्या बँक खात्यांमध्ये थेट पैसे हस्तांतरित करू
शकलं, ही भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांची ताकद असल्याचं पंतप्रधानांनी नमुद
केलं. भारत आणि सिंगापुरच्या डिजिटल आर्थिक व्यवहारांच्या संपर्क सुविधेमुळे
दोन्ही देशांमध्ये डिजिटल आर्थिक देवाण घेवाण सुलभ होणार आहे.
****
यंदाच्या
अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचा विकास आणि भांडवली खर्चावर भर देण्यात आला असून,
सर्व क्षेत्र आणि सर्व राज्यांसाठी कुठलाही भेदभाव न करता निधी दिला असल्याची
माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे. मुंबईत दूरदर्शननं
आयोजित केलेल्या डीडी कॉन्क्लेव्ह अमृतकाळातील अर्थसंकल्प मध्ये ते आज बोलत होते.
अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी केलेल्या तरतुदींची त्यांनी यावेळी माहिती दिली.
अर्थसंकल्पात सर्व राज्यांसाठी एक लाख ३० हजार कोटींची तरतूद, ६५ हजार प्राथमिक
कृषी सहकारी संस्थांसाठी तरतूद केली असून, आरोग्य क्षेत्राच्या तरतुदींमध्ये अडीच
हजार कोटींची वाढ केल्याचं कराड यांनी सांगितलं.
****
राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी बारावीची परीक्षा
आजपासून सुरू झाली. या परीक्षेसाठी राज्यभरातून १४ लाख ५७ हजाराहून अधिक
विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे.
औरंगाबाद
विभागीय मंडळातून एक लाख ६९ हजार ८०१ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत. ही
परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी विभागात जिल्हानिहाय दहा भरारी पथकं नेमण्यात
आली आहेत.
दहावी
आणि बारावी परिक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी लातूर
विभागीय मंडळ स्तरावर हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. इयत्ता दहावीसाठी शून्य २३
८२ - २५ १६ ३३ आणि इयत्ता बारावीसाठी शून्य २३ ८२ - २५ १७ ३३ या क्रमांकावर विद्यार्थी, पालक आणि शाळा प्रमुख
सपंर्क करु शकतात, असं लातूर विभागीय मंडळाच्या विभागीय सचिवांनी कळवलं आहे.
****
असोसिएशन
ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या वतीनं औरंगाबाद इथं आयोजित देशातल्या पश्चिम
विभागातल्या कुलगुरुंच्या परिषदेचं उद्घाटन आज शिक्षा संस्कृती उथान न्यासचे सचिव
अतुल कोठारी यांच्या हस्ते झालं. उद्धाटन सोहळ्याला भारतीय विद्यापीठ संघाचे
अध्यक्ष प्राध्यापक सृजन दास, महासचिव पंकज मित्तल उपस्थित होते. कुलगुरूंच्या या
परिषदेत आज उच्च शिक्षणात सतत मूल्यांकन आणि मूल्यमापन, तंत्रज्ञानाचा वापर या
विषयावर सहभागी कुलगुरु विचार मंथन आणि आपली भुमिका मांडणार आहेत.
दरम्यान,
आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन असून, यावेळी सहभागी कुलगुरूंनी आपापल्या मातृभाषेत
फलकावर सही करून हा दिन साजरा केला.
****
परभणी
इथं राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन
केंद्राकडून सुशिक्षित बेरोजगारांसाठी 'पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाइन रोजगार
मेळाव्याचं' येत्या शुक्रवारी २४ फेब्रुवारीला आयोजन करण्यात आलं आहे.
जिल्ह्यातल्या जास्तीत-जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी
व्हावं, असं आवाहन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र.
सो. खंदारे यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment