Tuesday, 21 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.02.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 21 February 2023

Time : 07.10 AM to 07.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २१ फेब्रुवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      राज्या त २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचं उद्दिष्ट - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

·      राज्यातल्या संत्तासंघर्षासंदर्भात ठाकरे आणि शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून पुन्हा सुनावणी

·      निवडणूक आयोग बरखास्त करून निवडणूक प्रक्रियेनं निवडणूक आयुक्त नेमण्याची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी

·      पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटानं विधीमंडळ शिवसेना कार्यालयाचा घेतला ताबा, शिवसेना भवनावर दावा सांगणार नसल्याचं स्पष्टीकरण 

·      भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचं लोकसभेसाठी समीकरण ठरलं, योग्य वेळी ते जाहीर करु - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·      जालना जिल्ह्यातल्या ६३४ गावांमधल्या पाणीपुरवठा योजनेचं ई-उद्घाटन

·      मंत्रिपदाच्या काळातल्या लेटर हेडचा गैरवापर करुन बदनामीकारक बनावट पत्र तयार केली जात असल्याची माजी मंत्री अशोक चव्हाण यांची तक्रार

·      राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची आजपासून बारावीची परीक्षा

आणि

·      दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा उपान्त्य फेरीत प्रवेश

 

सविस्तर बातम्या

राज्यात सेंद्रिय शेतीचं प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले जात असून, २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर इथल्या कण्हेरी मठात सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी ते काल बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काडसिद्धेश्वर स्वामीजी यावेळी उपस्थित होते. विकास योजना आणि प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा समतोल राखण्याचं काम केलं जात असून, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ३३ लाख झाडे लावण्याचं नियोजन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण आणि संस्कृती रक्षणाची चळवळ पुन्हा जोमाने सुरु होईल,  अशी अपेक्षा मुख्यमंत्रीयांनी व्यक्त केली.

****

राज्यातल्या संत्तासंघर्षासंदर्भात ठाकरे आणि शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आजपासून पुन्हा सुनावणी सुरु होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या १६ सदस्यांना विधानसभेच्या उपाध्यक्षांनी बजावलेली अपात्रतेची नोटीस, राज्यपालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पाचारण करणं, विधानसभा अध्यक्षांची निवड, शिवसेनेच्या मुख्य प्रतोदाची निवड अशा ठाकरे आणि शिंदे गटानं एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या वेगवेगळ्या याचिकांचा यात समावेश आहे.

****

निवडणूक आयोग बरखास्त करून निवडणूक प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमण्यात यावेत, अशी मागणी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. हा निकाल आपल्याला अमान्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. पक्षनाव आणि चिन्ह शिंदे गटाला द्यायचं असेल, तर आमच्याकडून शंभर रुपयांच्या बॉण्डवर शपथपत्रं का लिहून घेतली, असा प्रश्न ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे. ते म्हणाले…

Byte …

निवडणूक आयोगाने आम्हाला शपथपत्र सादर करायला सांगितली. प्रतिज्ञापत्र मग सदस्य संख्या दाखवा. आता त्याच्यामध्ये चार-सहा महिने गेले. शंभर रूपयांच्या स्टँप पेपरवर आपण ती शपथपत्र दाखल केली. त्यांनी सांगितलेल्या फॉरमॅटमध्ये आम्ही ती दाखल केली. आता एवढा लाखोंनी आम्ही सगळा हा उपद्‌व्याप केल्यानंतर अचानक जर का निवडणूक आयोग असं म्हणायला लागला की ते काही चालणार नाही. तुमचे जे निवडून आलेले होते त्यांच्या संख्येनुसार हे पक्ष कोणाचा ठरवला जाईल. जर का तुम्हाला हाच निकष लावायचा होता तर आम्हाला एवढी मेहनत करायला का लावली? का माझ्या शिवसैनिकांना पदरमोड करायला सांगितली? का शंभर रूपयांच्या स्टँप पेपरवरती तुम्ही आमची प्रतिज्ञापत्र घेतली?

 

दरम्यान, शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्य बाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला द्यायच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सध्या सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या याचिकांच्या आधी या मुद्द्यावर सुनावणी घेण्याची विनंती वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सरन्यायाधीशांना केली. मात्र काल कामकाजाच्या यादीत ठाकरे गटाच्या याचिकेचा समावेश नसल्यानं, आज ही याचिका न्यायालयासमोर येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी शिंदे गटानं आधीच कॅव्हेट दाखल केलं आहे.

****

पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटानं काल विधीमंडळात शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदार यावेळी उपस्थित होते. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षाची पक्ष कार्यालयात बैठक झाली. यावेळी सर्व ५६ आमदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी व्हिप बजावणार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांना सांगितलं. सर्वांना हा व्हिप लागू होईल, व्हिप न स्वीकारणाऱ्या किंवा त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होईल, असा इशारा गोगावले यांनी दिला आहे.

शिवसेना भवनावर आम्ही दावा सांगणार नसल्याचं आमदार संजय शिरसाट यांनी यावेळी स्पष्ट केलं. शिवसेना भवन ही आमची मागणी कधीच नव्हती. शिवसेनेच्या शाखांच्या संदर्भात आमचा कुठलाही वाद नाही. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या शाखा स्थानिक नेत्यांच्या मालकीच्या असल्याचं शिरसाट यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदासाठी योग्य व्यक्ती नव्हते, कोणाच्यातरी सांगण्यावरुन ते मुख्यमंत्री झाले, अशी प्रतिक्रिया, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. ते संत प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत. त्यांनी पक्षच चालवायला हवा होता, असं राज्यपालानं म्हटलं आहे. ठाकरे यांनी मला विमानातून उतरवलं होतं. पुढे त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं, असंही कोश्यारी यावेळी म्हणाले.

****

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचं लोकसभेसाठी समीकरण ठरलेलं असून, योग्य वेळी ते जाहीर करू, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते काल कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएतून खासदार निवडून येतील हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करू नये, असं फडणवीस यांनी नमूद केलं.

****

ग्रामीण भागात जलजीवन मिशनची कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावी यासाठी गावातले सरपंच, लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन आपल्या गावात या योजना चांगल्या पद्धतीने राबवाव्यात, असं आवाहन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. जालना जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांमधल्या ६३४ गावांमधल्या पाणीपुरवठा योजनेचं ई-उद्घाटन काल पाटील यांच्या हस्ते जालना इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागात प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा व्हावा याकरता केंद्र आणि राज्य शासन जल जीवन मिशन योजना राबवत असून, जालना जिल्ह्यात ६३४ गावांमध्ये ५५९ कोटी रुपये खर्चून या योजना राबवण्यात येत असल्यांच त्यांनी सांगितलं.

औरंगाबाद इथंही पाणीपुरवठा करणाऱ्या विविध कार्यालयाच्या एकत्रित जलभवन या नूतन इमारतीचं उद्घाटन काल गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झालं. औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांची गतीनं अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

****

मंत्रिपदाच्या काळातल्या आपल्या लेटर हेडचा गैरवापर होत असून, बदनामीकारक बनावट पत्र तयार केली जात असल्याचं, माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी काल नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली. मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं एक बनावट पत्र मिळाल्याप्रकरणी त्यांनी ही तक्रार केली. आपल्यावर पाळत ठेवली जात असून घातपात होण्याची शंका चव्हाण यांनी या निवेदनात व्यक्त केली आहे.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून १४ लाख ५७ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. त्यात सात लाख ९२ हजाराहून अधिक विद्यार्थी आणि सहा लाख ६४ हजाराहून अधिक विद्यार्थिनी असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी काल पुण्यात वार्ताहर परिषदेत दिली. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमधून दोन लाख ६० हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. यंदाच्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय मंडळाने रद्द केला असून, परीक्षेच्या नियोजित वेळेनंतर विद्यार्थ्यांना अतिरिक्त दहा मिनिटं देण्यात येणार आहे.

****

रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्रात २०२३-२४ या वर्षात रेल्वे विकासासाठी सुमारे १३ हजार ५३९ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून राज्यातील १२३ रेल्वे स्थानकांचा अमृत स्टेशन म्हणून तर विविध स्थानकांचा ४ हजार ९६२ कोटी रुपये खर्चून पुनर्विकास केला जाणार आहे. औरंगाबाद तसंच जालना रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी अनुक्रमे ३९० आणि १७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

अमृत स्थानकांमध्ये औरंगाबाद, जालना, लातूर, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, आणि अहमदनगरसह भोकर, गंगाखेड, धर्माबाद, हिमायत नगर, मानवत रोड, मुदखेड, परळी वैजनाथ, परतूर, पूर्णा, रोटेगाव, सेलू, उमरी, किनवट, आदी स्थानकांचा समावेश आहे. या योजनेत रेल्वे स्थानकांचा बृहत आराखडा तयार करून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाईल. यामध्ये प्रवाशांसह व्यावसायिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून, सर्व श्रेणीच्या स्थानकांवर सुमारे ६०० मीटर लांबीचे उच्चस्तरीय फलाटही तयार केले जाणार आहेत.

****

जालना जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ अंतर्गत विविध कामं करण्यासाठी मिळालेला निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभाग प्रमुखाला जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असे निर्देश जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. जालना इथं काल जिल्हा वार्षिक विकास योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात विविध विकास कामं करण्यासाठी वार्षिक योजनेअंतर्गत २८२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, प्राप्त निधी वेळेत खर्च करावा, वाळू चोरी रोखण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाने वाळू चोरांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश सावे यांनी यावेळी दिले.

****

राज्यातल्या सात सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेनं दंड ठोठावला आहे. मुंबईची सातारा सहकारी बँक, पुण्याची पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक, कोल्हापूरची युथ डेव्हलपमेंट सहकारी बँक, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, उस्मानाबाद जनता सहकारी बँक, वैजापूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक आणि नाशिकच्या श्री समर्थ सहकारी बँकेवर हा दंड लादण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेनं विविध दिशानिर्देशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ५० हजार ते ४ लाख रुपयांच्या दरम्यान हा दंड ठोठावला आहे.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात औरंगाबाद इथं गुन्हा दाखल झाला आहे. राऊत यांनी १९ फेब्रुवारीला मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले होते, असा आरोप करत शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी जवाहर नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

****

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल सेंट जॉर्ज पार्क इथं झालेल्या अंतिम साखळी सामन्यात भारतीय संघानं आयर्लंडवर पाच धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतानं स्मृती मानधनाच्या ८७ धावांच्या जोरावर निर्धारित षटकांत सहा बाद १५४ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल मैदानात उतरलेल्या आयर्लंडच्या संघाच्या आठ षटकं आणि दोन चेंडूत ५४ धावा झाल्या असतांना पावसाला सुरुवात झाली. मात्र पाऊस न थांबल्यानं डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयी घोषित करण्यात आलं. स्मृती मानधना सामन्यातली सर्वोत्तम खेळाडू ठरली.

****

औरंगाबाद इथं आजपासून देशातल्या पश्चिम विभागातल्या विद्यापीठांच्या कुलगुरुंची परिषद होणार आहे. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज या संस्थेच्या माध्यमातून आयोजित या दोन दिवसीय परिषेदेचं यजमानपद यंदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मिळालं आहे. शहरातल्या रामा इंटरनॅशनल इथं ही परिषद होणार असल्याची माहिती कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली. या परिषदेत महाराष्ट्र, गोवा, राजस्थान आणि गुजरात राज्यातल्या जवळपास १५० विद्यापीठांचे कुलगुरु सहभागी होणार आहेत.

****

राज्यभरातल्या विद्यापीठातल्या सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत संप आंदोलनाला सुरुवात केली आहे. औरंगाबाद, धुळे, साोलापूर इथल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. राज्यातली १३ विद्यापीठं आणि अनुदानित महाविद्यालयांतल्या कर्मचाऱ्यांना सापत्न वागूणक दिली जात असल्याच्या विरोधात हा बेमुदत संप करण्याचा निर्धार कर्मचारी महासंघानं केला असल्याची माहिती, संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी दिली.

औरंगाबाद इथं पहिल्या दिवशी 'बामुक्टो' प्राध्यापक संघटनेचे नेते तथा अधिसभा सदस्य डॉ.विक्रम खिल्लारे यांनी कर्मचार्यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला.

****

लातूर जिल्ह्यात २५ फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत श्री सिध्देश्वर कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा - आत्मा मार्फत हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवाला भेट देण्याचं आवाहन, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक दत्तात्रय गावसाने यांनी केलं आहे. या महोत्सवात शेती संबंधित विविध विषयांवर चर्चासत्र आणि परिसंवाद, तसंच शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. १७५ स्टॉलच्या माध्यमातून कृषी तसंच गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि माफक दरात थेट खरेदी - विक्री करण्यात येणार आहे.

****

औरंगाबाद शहरातलं सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणाचं काम उद्यापर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जी २० बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहर सौंदर्यीकरण कामांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. शहरात लावण्यात आलेले अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स आजपासून मोहीम राबवून तात्काळ काढावेत, तसंच भंगार पडलेली वाहनंदेखील उचलण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...