Saturday, 22 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 22.04.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date :  22 April  2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २२ एप्रिल २०२३   दुपारी १.०० वा.

****

देशात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह आठ राज्यांना कोविड सज्जता वाढवण्याची सूचना केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, हरियाणा, कर्नाटक, केरळ आणि राजस्थान या राज्यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. कोविड विषयक देखरेखीबद्दल सावध राहून ती अधिक बळकट करावी, चाचणी, उपचार, बाधितांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, लसीकरण आणि मास्कचा वापर याकडे लक्ष देण्याची सूचना भूषण यांनी या पत्रातून केली आहे.

***

देशात गेल्या २४ तासात १२ हजार १९३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, ३२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दहा हजार ७६५ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ६७ हजार ५५६ सक्रीय रुग्ण असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ६६ शतांश टक्के आहे. राज्यात काल ९९३ नव्या रुग्णांची नोंद झाली, पाच जणांचा मृत्यू झाला, तर एक हजार १४७ रुग्ण बरे झाले. राज्यात सध्या पाच हजार ९७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

***

जागतिक वसुंधरा दिवस आज साजरा होत आहे. 'आपल्या ग्रहामध्ये गुंतवणूक करा' अशी यावर्षीची वसुंधरा दिनाची संकल्पना आहे. पृथ्वी आपल्याला देतच असते, आणि हा प्रवाह निरंतर राखण्यासाठी आपणही आपल्या प्रयत्नांची गुंतवणूक तिच्यासाठी निरंतर करत राहिलं पाहिजे, असा या संकल्पनेचा हेतू आहे.

यानिमित्त दिलेल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, वसुंधरेचं रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या सर्वांचं कौतुक केलं आहे. भारत निसर्गाशी सुसंगत राहण्याच्या आपल्या संस्कृतीच्या अनुषंगानं शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

***

ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद आज साजरी होत आहे. यानिमित्तानं छत्रपती संभाजीनगर मध्ये छावणी परिसरातल्या ईदगाह मैदानवर, हजारो नागरिकांनी मुख्य नमाज पठण केली. खासदार इम्तियाज जलील, पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी यावेळी मुस्लिमबांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरातल्या विविध मशिदींमध्येही रमजान ईद शांततेत आणि उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

***

राज्य तुरुंग विभागानं नवीन धोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार महिला आणि पुरुष कच्चे कैदी तसंच शिक्षा झालेल्या महिला कैद्यांना, त्यांच्या मुलांना, तसंच नातवंडं, भाऊ, बहिण यांना भेटता येणार आहे. कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारावं आणि समान वागणूक द्यावी, या उद्दशानं हे धोरण तयार करण्यात आलं असल्याची माहिती, तुरुंग अतिरिक्त महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली.

***

महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या 'मोबाईल व्हॅन'चं उद्घाटन काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. या फिरत्या व्हॅनमध्ये एल ई डी स्क्रीन असून, मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

***

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात शिवुर पोलीस ठाण्याच्या शासकीय वाहनाचा मध्यरात्री अडीच वाजता पेट्रोलिंग दरम्यान झालेल्या अपघातात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. विठ्ठल बदने असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पोलिसांची गाडी शिवूर पोलीस ठाणे हद्दीत मध्यरात्री गस्त घालत असतांना झाडाला धडकून हा अपघात झाला. यामध्ये अन्य दोन पोलीस कर्मचारी आणि एक पत्रकार जखमी झाला आहे.

***

छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीसाठी, महाविकास आघाडीच्या पात्र उमेदवारांची यादी, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी काल जाहीर केली. महाविकास आघाडीचं शेतकरी महाविकास आघाडी पॅनल असून, उमेदवार "विमान" या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याची माहिती, काळे यांनी दिली.

***

हजुर साहिब नांदेड - संबळपूर एक्स्प्रेस रेल्वे गाडी नांदेड स्थानकाहून आज साडेचार तास उशिरा सुटणार आहे. या गाडीची निधारीत वेळ दुपारी चार वाजून ३५ मिनिटांनी असून, ती आज रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.

***

छत्रपती संभाजीनगर इथं शेक्सपिअर महोत्सवाचं उद्घाटन काल ज्येष्ठ नाट्यकर्मी प्राध्यापक मोहन फुले यांच्या हस्ते झालं. सुजाता पाठक, पद्मनाभ पाठक, लक्ष्मीकांत धोंड, नीता पानसरे वाळवेकर यांनी यावेळी दासू वैद्य लिखित 'मेळा' पुस्तकाचं अभिवाचन केलं.

***

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायन्ट्स आणि गुजरात टायटन्समध्ये सामना होणार आहे. दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर संध्याकाळी साडे सात वाजता मुंबई इथं मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे.

 

//**************//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...