Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 May
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ मे २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक
बातम्या
· दोन
हजार रुपयांच्या नोटा आजपासून बँकेतून बदलून घेता येणार;ओळखपत्राशिवाय या नोटा बदलून
देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल
· ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एमकेसीएलच्या ‘महालाभार्थी’ या पोर्टलचा वापर
· सत्ता
गेल्याने घरघर लागलेल्या महाविकास आघाडीची विसर्जनाकडे वाटचाल-भाजपची टीका
· सरकार
विरोधकांविरूद्ध चुकीची कारवाई करीत असल्याचा शरद पवार यांचा आरोप
· समृद्धी
महामार्गाच्या शिर्डी ते नाशिक या दुसऱ्या टप्प्याचं येत्या शुक्रवारी लोकार्पण
· जात
वैधता प्रमाणपत्राअभावी नांदेड जिल्ह्यातल्या एक हजार ३८३ लोकप्रतिनिधींची निवड रद्द
आणि
· आयपीएल
क्रिकेट स्पर्धेच्या प्ले ऑफ फेरीत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात
सामना
सविस्तर
बातम्या
दोन हजार रुपयांच्या नोटा आजपासून बँकेतून बदलून घेता येणार
आहेत. एका वेळी कमाल २० हजार रुपये अर्थात जास्तीत जास्त दहा नोटा बदलता येणार आहेत.
दरम्यान, दोन हजाराच्या नोटा चलनातून मागे घेणं हा चलन व्यवस्थापनाचा भाग असल्याचं
भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नवी
दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. भारतीय रिजर्व्ह बँक दीर्घ काळापासून स्वच्छ चलन धोरणाचं
पालन करत असून त्यानुसार यापूर्वीही वेळोवेळी विशिष्ट क्रमांकाच्या नोटा चलनातून काढून
घेऊन नव्या नोटा जारी केल्याची माहिती त्यांनी दिली. नोटबंदीनंतरच्या काळात चलनाची
गरज तातडीनं भागवण्यासाठी प्रामुख्यानं दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली होती. मात्र,
आता हा उद्देश पूर्ण झाला असून इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात चलनात असल्यामुळे
आता दोन हजारांच्या नोटा कमी करण्यात येत आहेत असं ते म्हणाले.
दोन हजार रुपयांच्या नोटा सप्टेंबर २०२३ नंतरही वैध असतील,
असे संकेत शक्तिकांत दास यांनी दिले. दोन हजार रुपयाच्या नोटांच्या वैधतेसंदर्भात बँकेनं
काहीही निर्देश दिलेले नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले...
Byte…
नोटीफिकेशन
मे हम ने कहा हैं it continues as legal tender। हम ने तो कही पे नहीं कहा, उसके आगे
तो कुछ नहीं कहा। हम ने तो ऐसा नहीं कहा कि भाई लीगल टेंडर जो है वो सिर्फ 30TH
सप्टेंबर तक है ऐसा तो नहीं कहा है। हमारे एक्सपेक्टेशन ये है कि 30 सप्टेंबर के अंदर
जो है मॅक्झिमम क्वांटिटि ऑफ नोटस् वापस आ जायेंगे। हम देखेंगे उस वक्त, we will see
& we will decide.
छोट्या व्यावसायिकांकडून दोन हजाराच्या नोटा नाकारण्याचा
मुद्दा नवीन नाही, पूर्वीही अनेक व्यावसायिक ग्राहकांकडून दोन हजाराची नोट घेण्याऐवजी
ऑनलाईन व्यवहारांना प्राधान्य देत असत, याकडे दास यांनी लक्ष वेधलं. परदेशी गेलेल्या
नागरिकांच्या हिताचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं दास यांनी सांगितलं.
दरम्यान, नोटा बदलण्यासंदर्भात रिजर्व्ह बँकेने नव्या मार्गदर्शक
सूचना जारी केल्या. दररोज किती नोटा बदलण्यात आल्या याची बँकांनी नोंद ठेवावी, नोटा
बदलण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सावलीची तसंच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी,
असं रिजर्व्ह बँकेनं सांगितलं आहे.
****
ओळखपत्र दाखवल्याशिवाय दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून
देऊ नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
भाजप नेते अश्विनी उपाध्यय यांनी दाखल केलेल्या या याचिकेत ओळखपत्राशिवाय दोन हजारांच्या
नोटा बँकेमधून बदलून देणं, हे संविधानाच्या अनुच्छेद १४ चं उल्लंघन असल्याचं म्हटलं
आहे. दोन हजाराच्या नोटा बॅँकांनी संबंधित खातेधारकाच्या खात्यातच जमा करण्याचे निर्देश
द्यावे, असंही या याचिकेत म्हटलं आहे.
****
आगामी काळात पर्यावरणाच्या माध्यमातून दिशादर्शक काम पहायला
मिळेल, असा विश्वास, पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. जी
२० अंतर्गत मुंबईत सुरु असलेल्या पर्यावरण आणि हवामानविषयक बैठकीचं काल कपिल पाटील
यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरणाचं संतुलन साधण्यासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर काम सुरु असल्याचं पाटील
यांनी सांगितलं. ते म्हणाले....
Byte…
पर्यावरणाचं
संतुलन ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र
मोदीजींचा संकल्प आहे, की आपला देश स्वच्छ झाला पाहिजे. आपल्या पर्यावरणामध्ये संतुलन
राहिलं पाहिजे. पर्यावरणाचं संतुलन ठेवण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये फार मोठ्या
प्रमाणात काम सुरू आहे, मला विश्वास आहे, की येणाऱ्या काळामध्ये जगाला दिशादर्शक असं
भारताचं काम पर्यावरणाच्या मध्ये आणि क्लायमेट चेंजच्या मध्ये निश्चितपणाने आपल्या
देशामध्ये होईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे.
****
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित-एमकेसीएलच्या ‘महालाभार्थी’ या पोर्टलचा उपयोग ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
उपस्थितीत काल सह्याद्री अतिथीगृह इथं याचं सादरीकरण करण्यात आलं. जास्तीत जास्त नागरिकांना
सहजरित्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी या पोर्टलचा उपयोग व्हावा, अशी
सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. यासाठी स्वयंसेवक नागरिकांना योग्य
ती मदत करतील अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
****
सत्ता गेल्यामुळे घरघर लागलेल्या महाविकास आघाडीची विसर्जनाकडे
वाटचाल सुरु झाल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये
यांनी केली आहे. ते काल मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.
सत्तेतून गेल्यावर जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी कोणाची ताकद जास्त हे सांगण्यातच
आघाडीचे तिन्ही पक्ष आपली ताकद खर्च करत आहेत. जिवंत राहण्यासाठी एकमेकांमध्येच स्पर्धा
सुरु झाल्याची टीका उपाध्ये यांनी केली.
****
काळा पैसा वैध करण्यासंदर्भातल्या प्रकरणी सक्त वसूली संचालनालय-ईडीने
राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल चौकशी केली. एका कंपनीला
दिलेल्या नियमबाह्य कर्ज प्रकरणात पाटील यांच्या सहभागाची ईडीकडून चौकशी केली जात आहे.
२०१९ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गैरव्यवहार विभागानं दाखल केलेल्या तक्रारीवरून
ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे.
****
चुकीची कामं करणाऱ्या माणसाच्या सल्ल्यावरून सरकार विरोधकांविरूद्ध
चुकीची कारवाई करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला
आहे. ते काल पुण्यात बातमीदारांशी बोलत होते. विरोधकांना त्रास देण्याच्या उद्देशाने
केंद्रसरकार तपास यंत्रणांचा वापर करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जाणीवपूर्वक
लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दोन हजार रुपयांच्या नोटेबाबतच्या निर्णयात
सरकारने सर्वसामान्यांचा विचार केलेला नाही अशी टीका त्यांनी केली.
राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात काहीही चर्चा
अद्याप झालेली नाही, महाविकास आघाडीतल्या पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करावी असं आवाहन
त्यांनी केलं.
****
केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्षातील नेत्यांना
लक्ष्य केलं जात असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत
यांनी केली आहे. जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर राऊत काल मुंबईत पत्रकारांशी
बोलत होते. २०२४ मध्ये ईडीच्या कार्यालयात कोणा कोणाला पाठवायचं याची यादी आम्ही लवकरच
तयार करु असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, जयंत पाटील यांना सक्तवसूली संचालनालयानं समन्स
बजावून चौकशी केल्याच्या विरोधात काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यभरात
निदर्शनं करण्यात आली. औरंगाबाद इथं पक्ष कार्यकर्त्यांनी ईडी विरोधात फलक झळकावत घोषणाबाजी
केली.
जालना इथं पक्ष कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
निषेध आंदोलन केलं. बदनापूर, परतूर आणि भोकरदन इथल्या तहसील कार्यालयासमोरही राष्ट्रवादीच्या
पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केलं.
****
औरंगाबाद शहराची पाणी पुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी
आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड
यांनी दिले आहेत. जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठीच्या नव्या जलवाहिनीच्या कामाचा
डॉ कराड यांनी काल स्मार्ट सिटी कार्यालयात आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. शहरातल्या
जनतेला २४ तास पाणी पुरवठा होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं डॉ.कराड यांनी सांगीतलं.
महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत, आणि संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते नाशिक या
दुसऱ्या टप्प्याचं येत्या शुक्रवारी २६ मे रोजी लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होईल,
हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर शिर्डी पासून नाशिक जिल्ह्यातल्या भरवीरपर्यंतचं अंतर
अवघ्या ४५ मिनिटांत पार करता येणार आहे. या महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम अजूनही
सुरू असून, इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस वाहतुकीसाठी
खुला होण्याची शक्यता आहे.
****
महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना अभिवादन
करण्यात आलं. औरंगाबाद महानगरपालिकेत उपायुक्त रवींद्र निकम यांनी, नांदेड जिल्हा परिषदेत
मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात
अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी तर बीड जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार
अडसुळ यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
****
जातीचे वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करु न शकल्याने
नांदेड जिल्ह्यात आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या एक हजार ३८३ लोकप्रतिनिधींची निवड
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रद्द केली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत
निवडून आलेल्या या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १७ जानेवारी २०२३
पर्यत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र प्रमाणपत्र सादर न केल्यानं, त्यांची
निवड रद्द ठरवण्यात आली.
****
क्रिकेट :
इंडियन प्रीमिअर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या प्ले
ऑफ सामन्यांना आजपासून प्रारंभ होणार आहे. यातला पहिला सामना गतविजेता संघ गुजरात टायटन्स
आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांदरम्यान होणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता चेन्नईमधल्या
एम ए चिदंबरम मैदानावर हा सामना सुरु होईल. या सामन्यातला विजेता संघ थेट अंतिम फेरीत
दाखल होईल, तर पराभूत संघाचा अन्य दोन संघातल्या विजेत्याशी सामना होईल. या सामन्यात
जिंकणाऱ्या संघाची अंतिम सामन्यात आजच्या विजेत्या संघाशी विजेतेपदासाठी लढत होईल.
****
लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात काल शासन आपल्या दारी
या योजनेच्या पहिल्या कार्यक्रमात सात हजार नऊ जणांना विविध प्रकारचे लाभ देण्यात आले.
आमदार अभिमन्यू पवार यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात होणाऱ्या
या योजनेच्या कार्यक्रमाचा, जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी.पी. यांनी केलं.
****
बोगस कीटकनाशक विक्रेत्या कंपन्यांवर कारवाईच्या मागणीसाठी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल हिंगोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
कार्यालयासमोर चलनी नोटा उधळून आंदोलन केलं. दोन दिवसांत कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन
छेडण्याचा इशारा संघटनेनं निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
****
शेतकऱ्यांनी एचटीबीटी बियाणाबाबत जागरूक राहून अनधिकृत बियाणांची पेरणी
करु नये, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. खरीप हंगामपूर्व
बैठकीत ते बोलत होते. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव खरीप हंगामात टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी
एक जूननंतर पाण्याचा अंदाज घेवून कापसाची पेरणी करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापती आणि
उपसभापती पदांची निवडणूक काल झाली. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी राजू
नाना भुमरे तर उपसभापतीपदावर राम पाटील एरंडे यांची बिनविरोध निवड झाली. औरंगाबाद कृषी
उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी भारतीय जनता पक्षाचे राधाकिसन पठाडे तर उपसभापतीपदी
शिवसेना शिंदे गटाचे मुरली चौधरी विजयी झाले. लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
सभापती पदावर शेषराव जाधव आणि उपसभापती पदी अनिल चव्हाण निवडून आले, वैजापूर कृषी उत्पन्न
बाजार समितीमध्ये भाजप शिवसेना युतीचे रामहरी जाधव सभापती तर शिवकन्या पवार या उपसभापतीपदी
निवडून आल्या आहेत.
**
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
सभापतीपदी भाजपाचे अशोक ठेंगल तर उपसभापतीपदी काँग्रेसचे मदन इंगोले यांची बिनविरोध
निवड झाली.
****
बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा जवळ आज सकाळी एस टी बस आणि ट्रकच्या अपघातात चार जण ठार तर काही प्रवासी
जखमी झाले. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात स्थळी बचावकार्य सुरू असल्याची
माहिती बुलडाणा पोलिसांनी दिली.
****
No comments:
Post a Comment