Monday, 2 October 2023

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक: ०२ ऑक्टोबर २०२३ सकाळी ७.१० मि.

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 02 October 2023

Time: 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०२ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      स्वच्छता ही सेवा अभियानाला देशभरातून मोठा प्रतिसाद;स्वच्छतेत महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळवून देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

·      मराठवाड्यासह राज्यभरात १६ लाखावर नागरिकांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग

·      गावागावातल्या पर्यटनाच्या संधीचा विकास होण्याची गरज माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून व्यक्त

      आणि

·      आशियायी क्रीडा स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळेला सुवर्ण पदक

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आज १५४ व्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांनी गांधीजींच्या स्मृतींना वंदन केलं आहे. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देशभरातून आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.

दरम्यान, गांधीजींना अभिवादन म्हणून काल देशभरात स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या अभियानामध्ये देशभरात नागरिकांनी मोठ्या उत्साहानं सहभागी होत आपला परिसर स्वच्छ केला.

मुंबईत गिरगाव चौपाटी इथं एक तारीख एक तास स्वच्छताया राज्यस्तरीय मोहिमेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात झाली. राज्यपाल रमेश बैस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, स्वच्छतेची ही मोहीम, फक्त कागदावर राहून, आज स्वच्छता आणि उद्या कचरा अशी परिस्थिती होऊ नये, असं नमूद केलं. स्वच्छतेत महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

राज्यातल्या सर्व ४११ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या एकूण १४ हजार ५२२ ठिकाणी नागरिकांच्या सहभागानं श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. यात सुमारे १६ लाखावर नागरिकांनी सहभाग घेत, सुमारे एक हजार ९४२ टन कचरा जमा केल्याची माहिती, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के.एच. गोविंदराज यांनी दिली.

****

छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं राज्यातल्या साडेतीनशे किल्ल्यावर स्वच्छतेला कालपासून सुरुवात झाली. मुंबईत शिवडी किल्ल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचं उद्घाटन केलं. गड, किल्ले हे आपलं वैभव असून ते स्वच्छ राहावेत हा आपला प्रयत्न असल्याचं फडणवीस म्हणाले.

****

छत्रपती संभाजीनगर इथं शहागंज परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या परिसरात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात झाली. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन, आदी भागात स्वच्छता करण्यात आली. केंद्रीय संचार ब्यूरो, जिल्हा प्रशासन, महानगर पालिका, नेहरू युवा केंद्र, तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, आदीच्या सहकार्यानं बुद्धलेणी परिसरात श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. कराड यांच्या उपस्थितीत अभियानाचा समारोप करण्यात आला. हे अभियान फक्त एका दिवसापुरतं मर्यादीत न ठेवता, आपला परिसर दररोज स्वच्छ करण्याचं आवाहन कराड यांनी यावेळी केलं. ते म्हणाले...

‘‘स्वच्छता मोहिमे अंतर्गत आपले घर, आपला परिसर, आपली संस्था, स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करावा. तुम्ही  या  मुहिमेमध्ये एक  तास एक  तारखेला  एक  तास असा  जे  प्रधानमंत्री  मोदी  साहेबांनी आपल्याला  ज्या  नारा  दिला  होता ते  तुम्ही  यशस्वीने  पाडला आम्ही  याच्यापुढे  सुध्दा आपला  परिसर  स्वच्छ ठेवा  म्हणून  आपण  प्रतिज्ञा  घेतली.’’

या महास्वच्छता अभियानाराज्याच्या पर्यटन प्रधान सचिव राधिका रस्तोगी, केंद्रीय संचार ब्युरोचे प्रबंधक संतोष देशमुख, यांच्यासह विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी तसंच संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले. छत्रपती संभाजीनगर शहरात ५६२ ठिकाणी राबवण्यात आलेल्या या अभियानातून ६३ टन कचरा संकलित करण्यात आला.

****

जालना इथं महापालिकेच्या ३० प्रभागांमध्ये ६० ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला. या सर्व ठिकाणी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. शहरातल्या मोती तलाव परिसरही स्वच्छ करण्यात आला.

****

धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हा परिषद इमारत परिसरात श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे या श्रमदान मोहिमेत सहभागी झाले होते.

तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग इथल्या किल्ला परिसरात केंद्रीय संचार ब्यूरो, पर्यटन जनजागृती संस्था, तसंच विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. आमदार राणाजगजितसिंह पाटील, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण तसंच अन्य संस्था संघटनांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते.

****

बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालय, तसंच बस स्थानक परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमात राष्ट्रीय महामार्गाचे विविध अभियंता आणि अधिकारी कर्मचारी, एसटीचे वाहक, चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या नेतृत्वाखाली शहरांत विविध ठिकाणी नगरसेवकांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यात आली.

****

 नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातल्या जवळगाव इथंही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आमदार माधवराव पाटील जवळगावकर, यांच्यासह नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. नांदेड इथं नंदगिरी किल्ला सफाई मोहिमेत युवकांचं योगदान कौतुकास्पद असल्याचं जिल्हा पोलीस श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितलं. नांदेड रेल्वे विभागातल्या सर्व रेल्वे स्थानकांवर स्वच्छता करण्यात आली.

****

लातूर जिल्ह्यातही सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जन शिक्षण संस्थानच्या वतीने औसा तालुक्यात उजनी इथं श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली.

****

परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शहरात गणपती चौक, शनिवार बाजार, तुरबुल हक्क दर्गा, स्त्री रुग्णालय, म्युनिसिपल कॉलनी, आदी ठिकाणांसह जिल्ह्यात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवण्यात आली

****

हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आलं. नरसी नामदेव इथं कयाधू नदीच्या घाटावर स्वच्छता करण्यात आली. आमदार संतोष बांगर यांच्यासह अनेक जणांनी या मोहिमेत सहभागी होत, आपला परिसर स्वच्छ केला.

****

राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावागावात पर्यटनाच्या संधी असून, त्याचा विकास होणं गरजेचं असल्याचं माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय टूर ऑपरेटर संघटनेच्या ३८व्या वार्षिक परिषदेत पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा शोध, या विषयावरच्या चर्चासत्रात ते काल बोलत होते. महाराष्ट्रातलं पर्यटन वाढलं तरच देश प्रगती करेल, असं ठाकरे म्हणाले.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने काढण्यात आलेल्या होऊ दे चर्चा या रथाची सुरुवात काल आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाली. शासकीय योजनांचा आढावा या रथाद्वारे घेतला जाणार आहे.

****

माणूस आपल्या चुकांमधूनच शिकतो, मात्र चुकांची पुनरावृत्ती टाळायला हवी, असं जळगाव इथल्या रँचो टेक्निकल स्कूलचे संस्थापक जहांगीर शेख यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं वेध परिषदेत बोलत होते. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांनी या परिषदेत जहांगीर शेख यांच्यासह नेमबाज तेजस्विनी सावंत, छायाचित्रकार प्रसाद पवार, साहसवीर चिंतन वैष्णव यांच्या मुलाखती घेऊन त्यांचा प्रवास सर्वांसमोर मांडला. ओंकार विद्यालय, रोटरी क्लब औरंगाबाद एलीट आणि श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्ट यांच्या वतीनं, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमाला, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत काल आठव्या दिवशी भारतानं तीन सुवर्णांसह दोन रौप्य पदकं पटकावली. बीडच्या अविनाश साबळे यानं तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धा प्रकारात सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. तर पुरुषांच्या गोळाफेकीत तेजींदर पाल तूर यानं सुवर्ण पदकाची कमाई केली. महिलांच्या पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरमीलन बैंस हीनं रौप्यपदक जिंकलं. तसंच अदिती अशोक हिनं वैयक्तीक गोल्फ प्रकारात रौप्य पदक पटकावलं.

पुरुषांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजीत पुरुष संघानं सुवर्ण पदक, महिलांच्या संघानं रौप्य पदक तर किनन डारियास यानं वैयक्तिक कांस्य पदक जिंकलं. बॅडमिंटनमध्ये भारतीय पुरुष संघानं रौप्य पदक जिंकल.

या स्पर्धेत १३ सुवर्ण, २१ रौप्य आणि १९ कांस्य पदकांसह एकूण ५३ पदकं मिळवत भारत सध्या पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर कायम आहे.

****

ज्येष्ठ नागरिकांनी वेळच्या वेळी झोप, संतुलित आहार आणि रोजचा व्यायाम या तीन गोष्टी पाळाव्यात आणि नेहमी सकारात्मक राहावं, असं आवाहन, लातूरच्या विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे मानसोपचार तज्ञ डॉ. आशिष चंपुरे यांनी केली आहे. लातूर इथं सामाजिक न्याय विभागाने काल ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त घेतलेल्या, ज्येष्ठ कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.

                                                                         ****

No comments: