Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 24
October 2023
Time: 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ ऑक्टोबर २०२३
सकाळी
७.१० मि.
****
· आज विजयादशमी;विविध ठिकाणच्या देवी मंदिरांसह शिर्डीचं साई मंदिर आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर
नागरिकांची गर्दी
· ओबीसी जनगणनेसाठी पद्धती निश्चित करण्याची गरज उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त;मराठा आरक्षण देण्याचा पुनरुच्चार
· भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार फिरकीपटू बिशनसिंग
बेदी यांचं निधन
· एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर
आठ गडी राखून दणदणीत विजय
आणि
· पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून काल
सहा सुवर्णांसह १७ पदकांची लयलूट
****
अश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमीचा सण आज साजरा होत आहे. हिंदू कालगणनेनुसार
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या या दसरा सणासाठी, वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, सोने-चांदीची आभुषणं आणि कपड्यांच्या खरेदीसाठी नागरिकांच्या
गर्दीने बाजारपेठा, फुलून गेल्या आहेत. दसऱ्याला विशेष मागणी
असलेल्या झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली आहे.
काल महानवमीला घटोत्थापन होऊन नवरात्रोत्सवाचीही सांगता
झाली, आज ठिकठिकाणच्या देवी
मंदिरांमध्ये दसऱ्याच्या सीमोल्लंघन मिरवणुका काढण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथल्या कर्णपुरा देवीची आज सायंकाळी सहा वाजता महाआरती होणार
आहे. त्यानंतर भव्य रथ यात्रा निघणार आहे. सिडको एन- सात परिसरातलं रामलीला मैदान तसंच वरुड फाटा
इथल्या इस्कॉन मंदिरासह शहरात पाच ठिकाणी रावण दहन करण्यात येणार आहे.
राजकीय पक्षांच्या दसरा मेळाव्याची तयारीही अंतिम टप्प्यात
पोहोचली आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना विजयादशमीच्या
शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचा हा सण
सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात चांगलं परिवर्तन आणणारा असून, यानिमित्तानं आपण आनंद आणि स्नेहाचं सोनं लुटूया, असं
मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी आजच्या धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या
शुभेच्छा दिल्या आहेत.
****
६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर इथं दीक्षाभूमीवर
अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते काल पंचशील ध्वजारोहण
करण्यात आलं. समता सैनिक
दलातर्फे मानवंदना देण्यात आली. यंदा दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
करण्यासाठी २५ लाखाच्या वर अनुयायी येण्याची शक्यता असून श्रीलंकेचे धम्मरत्न थेरो
हे यंदाच्या धम्मचक्र परिवर्तन दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असल्याचं, स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितलं आहे.
****
शिर्डी इथं साईबाबांच्या १०५ व्या पुण्यतिथी उत्सवाला कालपासून प्रारंभ झाला.
संस्थानच्या तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा करून या सोहळ्याला सुरुवात
झाली. दरम्यान, आज विजयादशमीला समाधी मंदिर
दर्शनासाठी रात्रभर सुरू राहणार असल्याचं, संस्थानचे मुख्य कार्यकारी
अधिकारी पी शिवशंकर यांनी सांगितलं आहे.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज
नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आता स्वयंसेवकांच्या पथसंचलनाला
सुरुवात झाली आहे.
यंदा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन प्रमुख
पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत
यावेळी मार्गदर्शन करतील. यावेळी ध्वजारोहण, तसंच शस्त्रपूजन करण्यात येणार आहे.
****
मराठा आरक्षणाबाबत घाईने कोणताही निर्णय घेण्यापेक्षा
कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देऊ, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत
मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेतली असून, आपण त्यांच्या
भूमिकेसोबत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले...
‘‘मराठा समाजाला आरक्षण सरकार देईलच इतकं स्पष्ट सन्माननीय एकनाथराव
शिंदे साहेबांनी सांगितलं आहे. आम्ही सगळे पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी आहोत. हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे हा सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे राज्य सरकार करणार आहे.’’
मागासवर्गीय आयोगावर रिक्त असलेल्या जागा भरण्यात येतील, तसंच आवश्यकता असेल आयोगाचं पुनर्गठनही करण्यात
येईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. ओबीसी
जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही, मात्र त्यासाठीची पद्धती
निश्चित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली....
‘‘यासंदर्भात सरकारची काय भूमिका आहे ही मी मागच्या काळातच स्पष्ट केलेली आहे. आणि
सरकारने कधीही
याला नकार दिलेला नाहीये. याच्या पद्धतीचाच मूळ प्रश्न आहे.कारण
ज्या प्रकारे आता बिहारमध्ये ज्या अडचणी तयार झाल्या आहेत, तशा प्रकारच्या अडचणी आपल्या
इथे तयार होणार नाहीत, अशा प्रकारची भूमिका स्वीकारावी लागेल’’
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी, सरकारला आरक्षण जाहीर करण्यासाठी दिलेली मुदत
आज संपत आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ न देता जरांगे यांनी पुन्हा
आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला असून, या मुदतीनंतर कोणत्याही
वाटाघाटी केल्या जाणार नाहीत, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
२८ ऑक्टोबरपासून गावागावात साखळी उपोषणही केलं जाणार आहे. राजकीय नेत्यांना गावबंदीची तयारी या आंदोलकांनी केली आहे.
****
मराठा क्रांती मोर्चाने काल पत्रकार परिषद घेऊन, आम्हाला घटनात्मक पद्धतीने हिंदू मराठा म्हणूनच
आरक्षण मिळालं पाहिजे, असं म्हटलं आहे. फक्त कुणबी मराठा प्रमाणपत्र देऊन तात्पुरती मलमपट्टी करू नका, असा इशाराही या पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.
****
मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करू नये, ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी यासह
अन्य मागण्यांसाठी काल जालना जिल्ह्यातल्या अंबड इथं ओबीसी समाजाच्यावतीनं मोर्चा
काढण्यात आला. समाजाच्या विविध मागण्यांचं निवेदन एका शिष्टमंडळानं तहसीलदार
चंद्रकांत शेळके यांना सादर केलं.
****
धनगर समाजाला अनुसुचित जमातीत आरक्षण देण्यात यावं या
मागणीसाठी बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर काल मोर्चा काढण्यात आला.
****
****
मेरी माटी मेरा देश अभियानात महाराष्ट्रातल्या कार्यक्रमांचा
येत्या २७ तारखेला समारोप होणार आहे. मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर शुक्रवारी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार
असल्याचं, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
नागरिकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी
केलं आहे.
****
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार फिरकीपटू बिशनसिंग
बेदी यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्यावर
शस्त्रक्रिया झाली होती, तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात
उपचार सुरू होते. बेदी यांनी १९६६ ते १९७९ दरम्यानच्या क्रिकेट
कारकिर्दीत ६७ कसोटी सामन्यात २६६ तर १० एकदिवसीय सामन्यात सात बळी घेतले. २२ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं होतं.
बेदी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, क्रीडा आणि युवककल्याण
मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या चौथ्या पॅरा एशियाई क्रीडा स्पर्धेत
भारतीय खेळाडूंनी सतरा पदकं जिंकून आपलं विजयी अभियान धडाक्यात सुरू केलं आहे. यामध्ये सहा सुवर्ण, सहा
रौप्य तर पाच कांस्य पदकांचा समावेश आहे. पाच हजार मीटर धावण्याच्या
टी ११ स्पर्धेत अंकूर धर्मा याने, उंच उडीच्या टी - फोर्टी सेवन प्रकारात भारताच्या निशादकुमार याने, तर
नेमबाजीत अवनी लेखरा हिने दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. ५० मीटर मिक्स पिस्तुल प्रकारात १६ वर्षीय रुद्रांश खंडेलवाल याने तर मोनू
घंघास याने गोळा फेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं. उंच उडीत टी
- सिक्टी थ्री प्रकारातली तसंच पुरुषांच्या क्लब थ्रो स्पर्धेतली तिन्ही
पदकं भारतीयांनी पटकावली.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल अफगाणिस्ताननं
पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला. काल चेन्नई इथं झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत निर्धारित
षटकात २८२ धावा केल्या. अफगाणिस्तानच्या संघानं हे लक्ष्य ४९व्या
षटकातच पूर्ण केलं.
या स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश संघादरम्यान
सामना होणार आहे.
****
धाराशिव इथं १६ ते २० नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र
केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठीच्या मैदानाचं भूमिपूजन काल करण्यात आलं.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या पिंपळगाव सराई इथले रहिवासी
असलेले अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांना सियाचीन इथं कर्तव्यावर असताना वीरमरण आलं. त्यांच्या पार्थिव देहावर काल त्यांच्या मूळ
गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
No comments:
Post a Comment