Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date: 01 October 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०१ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी
आज स्वच्छता हीच सेवा हे अभियान सकाळी दहा वाजेपासून राज्यासह देशभरात ठिकठिकाणी राबवण्यात
आलं. स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी असून
त्यासाठीचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. अधिक स्वच्छ भविष्याकडं वाटचाल करण्यासाठी या
उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या
कार्यक्रमात केलं होतं.
दरम्यान, स्वच्छता ही
आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे. सार्वजनिक स्वच्छतेसोबतच राजकीय
भ्रष्ट्राचाराची सफाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी म्हटलं आहे. या अभियानाअंतर्गत गिरगाव चौपाटी इथं आज स्वच्छता
केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पंधरा डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर
स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा घेणार असल्याचंही यावेळी
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
छत्रपती शिवरायांच्या
साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं साडेतीनशे किल्ल्यावर आजपासून
सफाई करण्याचं काम सुरू झालं आहे. या उपक्रमाचं उद्गघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केलं. गड, किल्ले हे
आपलं वैभव असून ते स्वच्छ राहावं हा आमचा प्रयत्न आहे. केवळ एक दिवस नव्हे तर
भविष्यात आपलं शहर, गाव स्वच्छ राहावं हा प्रयत्न असल्याचं
उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
इंटरनेटद्वारे संकेतस्थळावर अर्थात
ऑनलाईन गेम, सट्टा, अश्वशर्यती, आणि लॉटरीवर आजपासून २८ टक्के वस्तू
आणि सेवा कर - जीएसटी लागू होत आहे. जीएसटी परिषदेत या निर्णयाची काल अधिसूचना
जारी झाली आहे.
****
व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलिंडरच्या दरात आता
दोनशे नऊ रुपयांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ आजपासून लागू होत आहे. या आधी
सप्टेंबरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती १५७ रुपयांनी कमी करण्यात आल्या
होत्या. मात्र, नव्या दरवाढीनुसार मुंबईत या
सिलिंडरची किंमत एक हजार ६८४ रुपये एवढी झाली आहे.
****
आजचा
दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून
साजरा करण्यात येतो. ‘पिढ्यांन्
पिढ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मानवाधिकारासाठी देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता
करणं’ अशी या वर्षीच्या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
दरम्यान, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात सर्वसमावेशक धोरण निर्गमित करण्यात आलेलं
आहे. त्यानुसार, ज्येष्ठ नागरिकांचं समाजातलं स्थान लक्षात घेऊन त्यांचा वृध्दापकाळ
चांगल्या रितीनं व्यतीत होणं, समाजात त्यांचं जीवन सुसह्य
असणं तसंच शारिरीक-मानसिक आरोग्य सुस्थितीत राहून त्यांच्या
आर्थिक क्षमतांसह कामाचा
- शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी निर्देशक तत्वांचा
या धोरणात समावेश आहे. या अनुषंगानं राज्यात ठिकठिकाणी कार्यक्रम
तसंच ज्येष्ठ नागरिक मेळावे होत आहेत.
****
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे सध्या
राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात
तसंच तालुक्याच्या ठिकाणी उद्या लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार आहे. बीड शहरातही
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई
परीसरात लूटमार करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. केंद्रीय
गुन्हे अन्वेषण विभाग -सी.बी.आय.चे अधिकारी असल्याचं सांगत मिस्किन जावेद जाफरी आणि
मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेला अली बाबूलाल हयात अली हे दोघे लूटमार करत होते. शहरात लूटमार करणं, धनकवाडी -
धारूर मार्गावर प्रवाशांना अडवून लुटणं असे गुन्हे ते करत होते.
****
चीनच्या हँगझोऊ इथं सुरू असलेल्या आशियाई
क्रीडा स्पर्धेत आज आठव्या दिवशी भारतानं एका सुवर्ण पदकासह दोन रौप्य पदकं
पटकावली. पुरुषांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजीत कॅन डाउरीस चेनाई, झोरावर सिंग संधु आणि पृथ्वीराज तौंडाईमन या खेळाडूंचा यात समावेश असलेल्या
संघानं हे सुवर्ण पदक जिंकलं. तर, याच खेळ
प्रकारात मनिषा कीर, प्रिती रजक आणि राजेश्वरी कुमारी या महिलांच्या
संघानं रौप्य पदक मिळवलं. तसंच अदिती अशोक हिनं वैयक्तीक गोल्फ
प्रकारात रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत अकरा सुवर्ण, सोळा रौप्य आणि १४ कांस्य पदकांसह एकूण ४१ पदकांची कमाई केली आहे.
****
सोलापूरच्या पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर प्रकाश अण्णा महानवर यांची
नियुक्ती झाली आहे. महानवर सध्या मुंबई विद्यापीठाच्या दूरस्त आणि मुक्त अध्ययन
संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक आणि संचालक पदावर कार्यरत आहेत.
****
कोकण
किनारपट्टीलगत आता कमी दाबाचा पट्टा निर्माण
झाला आहे.त्यामुळे मराठवाड्यासह कोकण-मध्य महाराष्ट्र-विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार
पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, देशातील
यावर्षीचा मान्सूनचा हंगाम समाप्त झाल्याचं भारतीय हवामान विभागानं काल जाहीर
केलं.
****
No comments:
Post a Comment