Sunday, 1 October 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.10.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 October 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

§  स्वच्छता अभियानातून राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे स्वच्छता अभियान बनलं मोठी लोक चळवळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

§  राज्यातील साडेतीनशे किल्ल्यांच्या स्वच्छता अभियानाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन.

§  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीनंतरही नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांचे लिलाव बंद आंदोलन सुरुच.

आणि

§  आशियाई क्रीडा स्पर्धेत आठव्या दिवशी भारतानं दोन सुवर्ण पदकासह दोन रौप्य पदकं पटकावली.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आज स्वच्छता हीच सेवा हे अभियान सकाळी दहा वाजेपासून राज्यासह देशभरात ठिकठिकाणी राबवण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या या अभियानामध्ये देशभरात नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या उत्साहानं सहभागी होत आपला परिसर स्वच्छ केला.

****

संपूर्ण भारतामध्ये स्वच्छतेची मोहीम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे एक मोठी लोक चळवळ झाली आहे. सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत बनवण्यासाठी आपण टाकलेलं हे एक मोठ पाऊल आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मुंबईत गिरगाव चौपाटी इथं एक तारीख एक तासया राज्यस्तरीय मोहिमेची त्यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यात शहरी आणि ग्रामीण मिळून ७२ हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेची ही मोहीम पार पडली. त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं.

****

छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं साडेतीनशे किल्ल्यावर आजपासून सफाई करण्याचं काम सुरू झालं आहे. या उपक्रमाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. गड, किल्ले हे आपलं वैभव असून ते स्वच्छ राहावं हा आमचा प्रयत्न आहे. केवळ एक दिवस नव्हे तर भविष्यात आपलं शहर, गाव स्वच्छ राहावं हा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगरमध्ये भारत सरकारचं माहिती आणि प्रसारण मंत्रालय, जिल्हा प्रशासन, महानगर पालिका, नेहरू युवा केंद्र, तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, आदीच्या सहकार्यानं बुद्धलेणी परिसरात आज सकाळी "स्वच्छता ही सेवा" उपक्रमा अंतर्गत "एक दिवस एक तास श्रमदान" ही मोहीम राबवण्यात आली. या अभियानाला  केवळ एका दिवसापुरतं मर्यादीत न ठेवता जनआंदोलनाचं स्वरूप देऊन दररोज आपला परिसर स्वच्छ करण्याचं आवाहन केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांनी यावेळी केलं. ते म्हणाले...

गांधी जयंत्ती निमित्त स्वच्छता अभियान सर्व ठिकाणी केलं आहे. नक्कीच हे अभियान आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी आणि सर्वांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे. आज स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम आहे, संपुर्ण शहरामध्ये अत्यंत चांगल्या तर्हेने कार्यक्रम होत आहे. स्वच्छता मोहिमे अंतर्गत घर, आपला परिसर, आपली संस्था, आपला एरिया स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करावा.

..या महास्वच्छता अभियानाला राज्याच्या पर्यटन प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा शर्मा, केंद्रीय संचार ब्युरोचे प्रबंधक संतोष देशमुख, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 

****

जालना शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील एकूण ३० वॉर्डांमध्ये ६० ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या सर्व ठिकाणी स्वच्छतेबाबत श्रमदान, स्वच्छता मोहीम, प्लास्टिक कचरा संकलन, स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली तसंच मोती तलावाजवळील संपूर्ण कचरा संकलन करून मोती तलाव स्वच्छ करण्यात आला.

****

याच उपक्रमात धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम उत्साहात राबवण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर, धाराशिवचे तहसीलदार शिवानंद बिडवे, यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी परिसरात स्वच्छता केली.

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग इथल्या किल्ला परिसरात केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय प्रचार कार्यालय सोलापूर आणि पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव, तसंच विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या स्वच्छता अभियानात आमदार राणाजगजितसिंह पाटील, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण तसंच अन्य संस्था संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

****

बीड शहरातल्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये एक तास स्वच्छता मोहीम उपक्रम राबवण्यात आला. अतिरिक्त जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. बीड जिल्हा रुग्णालय, बस स्थानक हा परिसरही स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमात राष्ट्रीय महामार्गाचे विविध अभियंता आणि अधिकारी कर्मचारी, एसटीचे वाहक, चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सफाई कर्मचाऱ्यांनी पालिका परिसरात शहरांमध्ये विविध ठिकाणी नगरसेवकांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम यशस्वी केली.

****

नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव इथंही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आमदार माधवराव पाटील जवळगावकर, छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त सुरेश बेदमुथा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, अमित राठोड, गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांच्यासह नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

या उपक्रमाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीतर्फे श्रमदान करण्यात आलं. नरसी नामदेव इथं कयाधू नदीच्या घाटावर स्वच्छता करण्यात आली. आमदार संतोष बांगर यांच्यासह ग्रामविकास अधिकारी रुद्राजी क्षीरसागर तसंच ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावकरी यावेळी उपस्थित होते.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या मध्यस्थी नंतरही नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी लिलाव बंद आंदोलनावर ठाम आहेत. केंद्र सरकारने वाढवलेलं ४० टक्के निर्यात शुल्क कमी करावं, कृषी विपणन केंद्र नाबार्ड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकार महासंघाने खरेदी केलेला कांदा देशांतर्गत बाजारपेठेत विकू नये यासह विविध मागण्यांसाठी कांदा व्यापाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे.

****

चीनच्या हँगझोऊ इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज आठव्या दिवशी भारतानं दोन सुवर्ण पदकासह दोन रौप्य पदकं पटकावली. पुरुषांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजीत कॅन डाउरीस चेनाई, झोरावर सिंग संधु आणि पृथ्वीराज तौंडाईमन या खेळाडूंचा यात समावेश असलेल्या संघानं सुवर्ण पदक, तर याच खेळ प्रकारात मनिषा कीर, प्रिती रजक आणि राजेश्वरी कुमारी या महिलांच्या संघानं रौप्य पदक मिळवलं. अविनाश साबळे याने तीन हजार मीटर स्टीपलचेंज स्पर्धा प्रकारात आज सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. तसंच अदिती अशोक हिनं वैयक्तीक गोल्फ प्रकारात रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत बारा सुवर्ण, सोळा रौप्य आणि १४ कांस्य पदकांसह एकूण ४२ पदकांची कमाई केली आहे.

****

चंद्रपूरच्या प्रसिद्ध ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात नव्या पर्यटन हंगामाची सुरुवात आज करण्यात आली. विधीवत पूजन करून पर्यटकांना या व्याघ्र प्रकल्पात प्रवेश देण्यात आला. गेले तीन महिने पावसाळ्यामुळे व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन बंद होते. प्रकल्प व्यवस्थापनाने आता ऑनलाईन नोंदणी देखील सुरू केली आहे.

****

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देऊ नये, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज आदिवासी समाजाने गडचिरोली येथे चक्काजाम आंदोलन केले. यामुळे तब्बल अडीच तास वाहतूक ठप्प होती. गडचिरोलीतील शिवाजी महाविद्यालयापासून शेकडो आदिवासींनी इंदिरा गांधी चौकापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर चक्काजाम आंदोलन केले.

****

No comments: