Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date: 24 October 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
अश्विन शुद्ध
दशमी, म्हणजेच विजयादशमीचा सण आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. हिंदू कालगणनेनुसार
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या या दसरा सणासाठी, वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, सोने-चांदीची आभुषणं आणि कपड्यांच्या खरेदीसाठी
नागरिकांच्या गर्दीने बाजारपेठा, फुलून गेल्या आहेत. सर्व
ठिकाणच्या मंदीरांना रोषणाई करण्यात आली आहे.
दसऱ्यानिमित्त
राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सत्याचा नेहमीच
विजय होतो,
हा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो. दुष्प्रवृत्तींवर
सत्प्रवृत्तींनी मिळवलेला विजय म्हणजेच दसरा, असं
राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही दसऱ्याच्या
शुभेच्छा दिल्या आहेत.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपूरच्या रेशीमगाब मैदानावर पार पडला. संघाचं
दिमाखदार पथसंचलन यावेळी करण्यात आलं. प्रसिद्ध गायक शंकर
महादेवन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी,
अर्थव्यवस्थेत भारत दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला
असून, भारतात स्टार्ट अप क्रांती आल्याचं नमूद केलं.
आपली संस्कृती सर्वसमावेशन असून, ती कोणालाही
वेगळं मानत नाही, आपलेपणामुळे संघटित आणि बलसपंन्न समाज निर्माण
होतो, आणि देशाची अखंडता अबाधित राहते, कोणत्याही परिस्थितीत आपण एकत्र राहण्याची गरज आहे, असं भागवत म्हणाले.
अखंड भारताचे
विचार आणि संस्कृती सुरक्षित ठेवण्यासाठी आरएसएसचं योगदान अतुलनीय असून, आपला
देश जर गाणे असेल तर संघाचे स्वयंसेवक हे त्याचे सरगम आहेत, असं
शंकर महादेवन यावेळी म्हणाले.
या शस्त्रपूजन
आणि पथसंचलन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस उपस्थित होते.
****
६७चा धम्मचक्र
प्रवर्तन दिनानिमित्त आज नागपूरच्या दीक्षाभूमी इथं डॉ. बाबासाहेब
आंबेडकर स्मारक समिती आणि समता सैनिक दलातर्फे सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी हजारो बौद्ध अनुयायी उपस्थित होते. यावेळी २२ प्रतिज्ञांचं वाचन करुन, समता सैनिक दल आणि शाक्य संघातर्फे सलामी देऊन, बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली.
दीक्षाभूमीवर
आज संध्याकाळी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम श्रीलंकेचे धम्मरत्न थेरो
यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
नाशिक इथल्या
त्रिरश्मी लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात आज महाबोधीवृक्ष फांदी
रोपण महोत्सव होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यावेळी उपस्थित राहणार
आहेत.
छत्रपती संभाजीनगर
इथल्या बुद्ध लेणी इथं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भदंत विशुद्धानंद बोधी यांच्या
मार्गदर्शनाखाली याठिकाणी विविध धार्मिक उपक्रम सुरु आहेत. याठिकाणी
बुद्धवंदना, पंचशील प्रार्थना घेण्यात आली. औरंगाबाद लेणी इथल्या बुद्ध मुर्तीला अभिवादन करण्यासाठी देखील अनुयायांची
मोठी गर्दी होत आहे.
****
शिर्डी इथं श्री
साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त समाधी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान
जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात
आली. या उत्सवानिमित्त अखंड पारायण समाप्तीनंतर आज श्रींची प्रतिमा, पोथी
आणि विणाची मिरवणूक काढण्यात आली.
****
हिंगोली
इथल्या ऐतिहासिक दसरा महोत्सवात आज ५१ फूट उंचीच्या रावण दहनाचा कार्यक्रम पार
पडणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर
इथं एका शाळेनं मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी महानगरपालिकेनं शाळेच्या मुख्याध्यापकांचं
कार्यालय सील केलं आहे.
सदर शाळेनं सुमारे सव्वा पाच लाखावर कर थकवल्याचं मनपाकडून सांगण्यात
आलं आहे. मोठ्या थकबाकीदारांवर अजूनही कठोर कारवाई करण्यात
येणार असल्याचं, सहायक आयुक्त प्रसाद देशपांडे यांनी
सांगितलं.
****
चीनमध्ये सूरु असलेल्या दिव्यांगांच्या चौथ्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत
आजच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंचं शानदार प्रदर्शन सुरु आहे.
महिलांच्या के एल 2 केनोई प्रकारात प्राची यादवनं सुवर्ण
पदकाला गवसणी घातली. ऍथलेटिक्स मध्ये महिलांच्या १०० मीटर टी 12 प्रकारात सिमरननं, तर पुरुषांच्या ४०० मीटर टी
64 प्रकारात अजय कुमारनं रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या
के एल 3 केनोई प्रकारात मनीष कौरवनं, व्हीएल
2 प्रकारात गजेंद्र सिंगनं तर क्लब थ्रो मध्ये एकता भायननं कांस्य
पदक जिंकलं.
या स्पर्धेत भारत आठ सुवर्ण, आठ रौप्य आणि आठ कांस्य
पदकांसह एकूण २४ पदकांची कमाई करत, पदक तालिकेत चौथ्या
स्थानावर आहे.
****
एकदिवसीय क्रिकेट
विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेशदरम्यान सामना होणार आहे. मुंबईत
वानखेडे मैदानावर दुपारी दोन वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment