Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 24 October
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
· विजयादशमीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा;सीमोल्लंघन,
शस्त्रपूजनासह मुहूर्ताच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी.
· दुसऱ्या पक्षात जाण्याइतकी आपली निष्ठा कमकुवत नाही-माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं दसरा मेळाव्यात
प्रतिपादन.
· माजी खासदार नीलेश राणे यांची सक्रीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा.
आणि
· पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेमध्ये भारताची दहा सुवर्ण, बारा रजत आणि तेरा कांस्य पदकांसह पस्तीस पदकांची कमाई.
****
साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असणारा दसरा अर्थात
विजयादशमी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्ता संध्याकाळी राजधानी
दिल्लीतल्या दसरा उत्सवात भाग घेत आहेत. या उत्सवात रावण,
कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचं दहन केलं जातं, हे दहन म्हणजे दुर्गुणांवर सदगुणांच्या विजयाचं प्रतीक आहे. सरस्वती पूजनासोबतच शस्त्रपूजन हे आजच्या सणाचं ठळक वैशिष्ट्यं आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेशात भारत चीन सीमेवर
जाऊन शस्त्रपूजन करून सैनिकांसोबत विजयादशमीचा सण साजरा केला. सीमेच्या पलीकडे असलेल्या चिनी सीमेवरील चौक्यांचं संरक्षणमंत्र्यांनी निरीक्षण
केलं, तसंच सीमेवर तैनात सैनिकांशी संवाद साधला.
राज्यातही दसरा सण अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. घरोघरी पारंपरिक पद्धतीनं पाटी पूजन,
ग्रंथपूजन आणि आयुधांचं पूजन करून एकमेकांना सोनं अर्थात आपट्याची पानं
देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दसऱ्यानिमित्त वाहनं,
आभुषणं, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी
बाजारपेठांमधून गर्दी केली आहे.
तुळजापूर इथे आज सकाळी श्री तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा
सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. मंदिरात पहाटे विधीवत पूजा आणि आरती करुन देवीचं माहेर
असणाऱ्या अहमदनगरहून आलेल्या मानाच्या पलंग पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक
काढण्यात आली. श्री.तुळजाभवानी देवीची मूर्ती ही चल मूर्ती असल्याने ती आपलं
सिंहासन सोडून सीमोल्लंघन करण्यासाठी भाविकांच्या बरोबर मंदिराच्या बाहेर येते आणि
सीमोल्लंघनानंतर देवी पौर्णिमेपर्यंत श्रमनिद्रा करते. देवीच्या याच श्रमनिेद्रेला आजपासून प्रारंभ
झाला.
अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीचा सीमोल्लंघन सोहळा आज पारंपरिक
पद्धतीने साजरा झाला. पालखी मार्गावर दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांनी
आई राजा उदोचा जयघोष करत पालखीवर पुष्पवृष्टी केली.
मुंबईत आज दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं १०२
ठिकाणी संचालनाचं आयोजन केलं. याशिवाय, दादरच्या शिवतीर्थावर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आझाद मैदानावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन दसरा मेळावे संध्याकाळी होत आहेत. या
पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला दसऱ्याच्या
तसंच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर यांनी ज्या भूमीवर सामाजिक क्रांतीचा पाया रचला, त्या दीक्षाभूमीचा कायापालट करण्याची
ग्वाही देत, दीक्षाभूमी विकासाच्या सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या
आराखड्याला नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मान्यता दिल्याची माहिती
मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
भाजपच्या राष्ट्रीय सचिव नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातल्या
सावरगाव इथे आज दसरा मेळावा घेतला, दुसऱ्या पक्षात जाण्याइतकी आपली निष्ठा कमकुवत नसल्याचं प्रतिपादन पंकजा मुंडे
यांनी केलं. राज्याच्या सरकारकडून लोकांच्या खूप अपेक्षा असून,
मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे, या प्रश्नांबाबत अपेक्षाभंग सहन करणार नाही, असा इशारा
मुंडे यांनी यावेळी बोलताना दिला. मुंडे यांच्या या मेळाव्याला
कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर पार
पडला. संघाचं दिमाखदार पथसंचलन यावेळी करण्यात आलं.
प्रसिद्ध गायक शंकर महादेवन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
होते. यावेळी बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन
भागवत यांनी, आपली संस्कृती सर्वसमावेशक असून, ती कोणालाही वेगळं मानत नाही, आपलेपणामुळे समाज संघटित
आणि बलसंपन्न होतो, आणि देशाची अखंडता अबाधित राहते असं सांगतानाच,
कोणत्याही परिस्थितीत आपण एकत्र राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
****
६७चा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज नागपूरच्या दीक्षाभूमी इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि समता सैनिक दलातर्फे सामूहिक बुद्ध
वंदना घेण्यात आली. यावेळी हजारो बौद्ध अनुयायी उपस्थित होते. यावेळी २२ प्रतिज्ञांचं
वाचन करुन, समता सैनिक दल आणि शाक्य संघातर्फे सलामी देऊन, बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. दीक्षाभूमीवर आज संध्याकाळी धम्मचक्र
प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम श्रीलंकेचे धम्मरत्न थेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत
होणार आहे.
नाशिकच्या इथं बुद्ध स्मारक त्रिरश्मी बुद्ध लेण्यात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते महाबोधी वृक्षरोपण करण्यात आलं. आज मिळालेला बोधीवृक्ष, ही नाशिक आणि महाराष्ट्राला मिळालेली अमूल्य अशी भेट असून यामुळे नाशिकला जागतिक महत्व प्राप्त होईल, असा विश्वास भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.
छत्रपती संभाजी नगर इथल्या बुद्ध लेणीत झालेल्या
कार्यक्रमाला जपानचे धर्म गुरू इको काचो यांच्यासह भदंत
विशुद्धानंद बोधी, पोलीस आयुक्त मनोज
लोहिया, खासदार इम्तियाज जलील उपस्थित
होते. बौध्द धर्म समजून घेण्याचं आवाहन इको काचो यांनी यावेळी केलं. बुध्द लेणीवर
आज सकाळपासून अनुयायांची मोठी गर्दी आहे.
****
शिर्डी इथं श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त समाधी मंदिरात संस्थानचे
अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते श्रींची
पाद्यपूजा करण्यात आली. या उत्सवानिमित्त अखंड पारायण समाप्तीनंतर आज श्रींची
प्रतिमा, पोथी आणि विणाची मिरवणूक काढण्यात आली.
****
हिंगोली इथल्या ऐतिहासिक दसरा महोत्सवात आज ५१ फूट उंचीच्या रावण दहनाचा
कार्यक्रम पार पडणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातही पाच ठिकाणी रावणदहन होणार आहे.
****
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी आज
अचानक राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. आपल्याला आता राजकारणात काही
रस राहिला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजपसारख्या महान संघटनेत काम करण्याची
संधी मिळाल्यानं आपण स्वत:ला भाग्यवान समजतो, असं नीलेश
राणे यांनी आपल्या या ट्विट संदेशात म्हटलं आहे. दरम्यान, राणे
यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेमध्ये भारतानं आतापर्यंत दहा
सुवर्ण, बारा रजत आणि तेरा कांस्य पदकांसह पस्तीस पदकांची
कमाई केली आहे. आजच्या दिवसात भारतीय खेळाडूंनी सतरा पदकं
जिंकली. आज पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तिन्ही पदकं जिंकली.
पुरुषांच्या भारोत्तोलन स्पर्धेच्या पासष्ट किलो वजनगटात भारताला कांस्य पदक
मिळालं. महिलांच्या दहा मीटर पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत रुबिना फ्रान्सिसनं कांस्य पदक
जिंकलं.
पुरुष पंधराशे मीटर टी फॉर्टीसिक्स स्पर्धेत प्रमोद बिजार्नियानं रौप्य आणि राकेश
भाईरानं कांस्य पदक जिंकलं.
पुरुषांच्या पाच हजार मीटर टी एलेवन स्पर्धेत अंकुर धामानं तर पुरुषांच्या पाच
हजार मीटर टी थर्टीन स्पर्धेत शरथ मकनहल्ली शंकरप्पानं सुवर्ण पदकं जिंकली. रवि रंगोलीनं पुरुषांच्या एफ फॉर्टी गोळाफेक स्पर्धेत रजत पदक जिंकलं.
दहा मीटर एअर पिस्तुल एसएच वन स्पर्धेत १६ वर्षीय रुद्रांश खंडेलवालनं
रौप्य आणि मनीष नरवालनं कांस्य पदक जिंकलं.
****
आज जागतिक पोलिओ दिवस आहे. पोलिओ या आजाराबाबत जनजागृती
करण्यासाठी आणि लसीकरणाचं महत्व बिंबवण्यासाठी हा दिवस जगभरात पाळला जातो. भारतानं आपली पोलिओविरुद्धची लढाई अतिशय जागरूकतेनं लढली असून, नियमित लसीकरण अभियानं राबवून बालकांना सुरक्षा दिली आहे. २०१४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं भारत पोलिओमुक्त झाल्याची घोषणा केलेली
आहे. शेजारी देश अफगाणिस्तान आणि पाकिस्तानांतून पोलिओ व्हायरसचा
देशात पुन्हा प्रवेश होऊ नये, यासाठी आता भारत दक्ष आहे.
****
No comments:
Post a Comment