आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ डिसेंबर २०२३ सकाळी ११.००
वाजता
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांनी आज राज्याच्या दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी पुण्यातल्या सशस्त्र दल वैद्यकीय
महाविद्यालयाला मानाचा ध्वज अर्थात प्रेसिडेंट्स कलर प्रदान केला. या महाविद्यालयानं आपल्या ७५ वर्षांच्या गौरवशाली इतिहासात देशात तसंच
देशाबाहेर अतुलनीय वैद्यकीयसेवा देण्याचं महान कार्य केलं असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी
यावेळी काढले.
दरम्यान, राष्ट्रपती
आज नागपूर इथं जाणार असून, इथल्या शासकीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या
हिरक महोत्सवी सोहळ्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुबई इथं हवामान बदलाविषयीच्या
कॉप-28 परिषदेला संबोधित करणार आहेत.
या परिषदेच्या पार्श्वभूमीवर ते हवामानविषयक अर्थकारण, ग्रीन
क्रेडिट उपक्रम, लीडआयटी या विषयीच्या चर्चांमध्येही सहभागी
होतील. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान काल रात्री उशिरा दुबईत दाखल झाले.
विमानतळावर संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झाएद
आणि भारतीय समुदायाकडून त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं.
****
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या जीडीपी, अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात सात पूर्णांक सहा दशांश टक्के
वाढ झाली आहे. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन
यांनी ही माहिती दिली. देशाच्या व्यापारात वृद्धी होत असून,
चालू खात्याची तूट कमी होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
रत्नागिरी इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं लोकार्पण मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झालं. आरोग्य यंत्रणा मजबुतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात
येतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या धरतीवर गोंदिया जिल्हा
परिषदेने जिल्हा परिषद आपल्या गावी हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. जिल्ह्यातल्या डव्वा इथून काल उपक्रमाला
सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत
पोहोचाव्या आणि त्याचा लाभ नागरिकांना व्हावा या हेतूने जिल्हा परिषद आपल्या १०४ गावांमध्ये
हा उपक्रम राबवणार आहे.
****
No comments:
Post a Comment