Saturday, 2 December 2023

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 02.12.2023, रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date – 02 December 2023

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जनतेला आरोग्य सुविधा सहजरित्या उपलब्ध करून देण्याची आवश्यकता राष्ट्रपतींकडून व्यक्त;पुण्यात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रपती ध्वज प्रदान  

·      अवकाळीच्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू; अहवाल प्राप्त होताच तातडीने मदतीची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

·      दहावी-बारावीचा निकाल श्रेणी आणि विशेष गुणवत्तेनुसार न लावण्याचा सीबीएसईचा निर्णय

·      ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं प्रारंभ

आणि

·      ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी ट्वेंटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेत भारताला विजयी आघाडी

****

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जनतेला आरोग्य सुविधा सहजरित्या उपलब्ध करून देण्याची आवश्यकता, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. त्या काल नागपूर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होत्या. याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या एकशे अकराव्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती मुर्मू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

त्यापूर्वी काल सकाळी राष्ट्रपतींनी पुण्यात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रपती ध्वज प्रदान केला. हा लष्करातला सर्वोच्च सन्मान आहे. प्रज्ञा या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा केंद्राच उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते काल झालं. हे केंद्र सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयांना अत्याधुनिक आरोग्य संशोधन क्षेत्रात जागतिक संस्था बनवण्यात मदत करेल असा विश्वास राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केला.

****

राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून, शासनाला अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.

‘‘अवकाळी पाऊस गारपीटीमुळे तत्काळ तातडीने नुकसानग्रस्त भागाचे युद्धपातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना निर्देश मी स्वत: दिल्या होत्या. त्याप्रमाणे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील यावर सविस्तर चर्चा झाली. दोन हेक्टरच्या ऐवजी तीन हेक्टर जमीनीचा मोबदला नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला. एकत्रित पंचनामे संपूर्ण अहवाल आल्यानंतर यामध्ये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार पूर्ण ताकदीने उभं आहे.’’

****

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही पणनमंत्री तसंच हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. काल हिंगोली जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले..

‘‘ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, नुकसान झालेला एकही शेतकरी, बाधित झालेला  शेतकरी वंचित राहणार नाही. वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचा, अचूक पंचनामे करण्याचा आदेश त्यासाठी दिलेला आहे. आणि मला वाटतं त्याची अंमलबजावणी शासनातर्फे पूर्ण होईल. एनडीआरएफचे जे नियम आहेत, जे नॉर्मस् आहेत, आता नवीन नियम जे सरकारने वाढीव दिलेलं आहे, केंद्र सरकारने त्यानुसार पैसे दिले जाईल.’’

हिंगोली जिल्ह्यात, वीज कोसळून ठार झालेले शेतकरी राजू जायभाये यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री सत्तार, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काल भेट घेऊन, त्यांच्या राज्य शासनातर्फे मदत म्हणून चार लाख रुपयांचा धनादेश त्यांना सुपूर्द करण्यात आला. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून लाभ मिळवून देण्याच्या सूचना ही पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

****

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्यासाठी जातनिहाय जनगणना व्हायला हवी, असं उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल रायगड जिल्ह्यात कर्जत इथं पक्षाच्या वैचारिक मंथन शिबीरात बोलत होते. वेगवेगळ्या समाजाला दिलेल्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची कार्यवाही आम्ही सगळे करत आहोत. सरकार म्हणून आमच्यात मतभेद नाहीत, असंही पवार यांनी नमूद केलं.

****

मराठा समाजाला येत्या २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळणार आहे. तसं झालं नाही तर पुढची दिशा ठरवू मात्र, समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवावं, असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. काल जालना इथं झालेल्या सभेत ते बोलत होते. आंतरवाली सराटी इथले आंदोलकांवर दाखल सर्व गुन्हे दोन दिवसात आणि राज्यातले सर्व गुन्हे दोन महिन्यात मागे घ्यावे, अशी मागणीही जरांगे यांनी यावेळी केली.

****

सीबीएसई अर्थात, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल श्रेणी आणि विशेष गुणवत्तेनुसार लावणार नाही, तसंच गुणांची टक्केवारी जाहीर करणार नाही असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. सर्वोत्तम ५ विषयातले गुणही सीबीएसई मोजून देणार नाही. प्रवेश किंवा नोकरी देणाऱ्या संस्थांनीच हे गुण मोजावेत असं मंडळानं म्हटलं आहे.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या महिला आणि बाल विकास विभागाला वेगवेगळ्या भागात होणारे चार बालविवाह रोखण्यात यश आलं आहे. चाईल्ड हेल्पलाईन कक्षाचे कर्मचारी, तसंच जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यवाही करत, संबंधित बालविवाह समुपदेशन करून रोखले. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने आणि सदस्यांनी संबंधित पालकांकडून हमीपत्र लिहून घेतल्यावर बालिकांना त्यांच्या स्वाधीन केलं. 

****

४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं प्रारंभ होत आहे. प्रसिद्ध लेखक डॉ जगदीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या संमेलनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. श्री मुक्तानंद महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या कविवर्य ना. धों. महानोर साहित्यनगरीत सकाळी ११ वाजता हा उद्घाटन सोहळा होईल. त्यापूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात येईल. मावळते अध्यक्ष शेषराव मोहिते यांच्याहस्ते ग्रंथनगरीचं उद्घाटन होणार आहे. या दोन दिवसीय संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, परिचर्चा, कथाकथन, तसंच काव्यगायन आदी कार्यक्रम होणार आहेत.

****

अकोला जिल्ह्यातल्या कुरणखेड इथं विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जल जीवन मिशन, प्रधानमंत्री जनधन योजना, आयुष्यमान भारत योजना, ज्ज्वला योजना, मुद्रा योजना यासह विविध योजनांची माहिती चित्ररथाद्वारे देण्यात आली. यावेळी गावातले लाभार्थी योगेश विजयकर यांनी आपला अनुभव या शब्दांत व्यक्त केला...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नारायणपूर, लांजी, वडनेर, वारेगाव, गाढे पिंपळगाव, टेंभी आदी गावांमध्ये या यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात आल्याचं वृत्त आहे.

****

रायपूर इथं काल झालेल्या चौथ्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी पराभव केला. या विजयासोबतच भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत तीन - एक अशी विजयी आघाडी घेतली आहे. कालच्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात १७५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ मात्र २० षटकात सात बाद १५४ धावाच करु शकला. मालिकेतला शेवटचा सामना उद्या बंगळुरु इथं खेळला जाणार आहे.

****

पुण्यात म्हाळुंगे इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या राज्यस्तरीय शालेय जिमनॅस्टक स्पर्धेत परभणीच्या खेळाडूंनी नऊ पदकं जिंकली. आर्टिस्टिक जिमनॅस्टिक या प्रकारात गौरी पाते हिनं रौप्य, ॲक्रोबॅटीक्स जिमनॅस्टिक या प्रकारात दिग्विजय पाते, प्रज्ज्वल अंबोरे, अनिल शिंदगे आणि आनंद साळवे यांच्या संघाने प्रत्येकी एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकलं.

****

लातूर शहरात पोलीस दलातर्फे, उद्या रविवारी, लातूर पोलीस मॅराथॉन २०२३ चं आयोजन करण्यात आल आहे. अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि तरुण मुल व्यसनापासून दूर राहण्यासाठीचला चांगले छंद जपयाअसा या मॅरॅथॉन चा संदेश असेल.

****

नांदेड जिल्ह्यात पाच डिसेंबर रोजी “जागतिक मृदा दिवस” साजरा करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहेत.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...