Sunday, 24 December 2023

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.12.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date : 24 December 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २४ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.

                                                            ****

भारतीय क्रीडा मंत्रालयानं नवनियुक्त भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केलं आहे. काही खेळाडूंच्या विरोधामुळं मंत्रालयानं आज हा निर्णय घेतला. कुस्तीसंघाच्या निवडणुकीत ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय संजय सिंग विजयी झाल्यानंतर बजरंग पुनिया, वीरेंद्र सिंग यांच्यासह काही कुस्तीपटू या नियुक्तीला विरोध करत होते.

ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय संजय सिंग कुस्ती संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती. त्यांनंतर बजरंग पुनिया यांनी पद्मश्री पुरस्कार परत केला.

                              ****
केंद्रसरकारनं देशभरातल्या १
लाख ५३ हजार इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन म्हणून यावर्षी पाच हजार २२८ कोटी रुपयांचं अनुदान दिलं आहे. केंद्रानं देशात ७ हजार ४३२ जलद चार्जिंग केंद्र स्थापित करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांना ८०० कोटी रुपये देण्यासही मान्यता दिली आहे. जड उद्योग मंत्रालयाच्या माहितीनुसार, सद्यस्थितीत देशात एकूण १४८ सार्वजनिक इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग केंद्र कार्यरत आहेत. जीवाश्म इंधनांवरचं अवलंबन कमी करणं, वाहनांमुळं होणाऱ्या प्रदूषण समस्येवर मात करुन इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढवणं पर्यायानं इलेक्ट्रीक वाहनांची निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठीच्या फेम इंडियाच्या दुसऱ्या टप्प्याकडं सरकार मार्गक्रमण करत आहे.

                              ****
काँग्रेसमध्ये काल मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात आले
. पक्षानं १२ सरचिटणीस आणि ११ राज्य प्रभारी नियुक्त केले आहेत. प्रियंका गांधी यांच्या ऐवजी अविनाश पांडेंकडे उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली असून पांडे यांना उत्तरप्रदेशचे पक्ष प्रभारी बनवण्यात आलं आहे, तर सचिन पायलट यांच्याकडं छत्तीसगडची धुरा सोपवण्यात आली आहे.

रमेश चेनिथल्ला महाराष्ट्राचे तर मोहन प्रकाश बिहारचे प्रभारी असतील. केसी वेणुगोपाल संघटनेचे सरचिटणीस असतील. ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक गुजरातचे प्रभारी असतील तर रणदीप सिंह सुरजेवाला यांच्याकडं कर्नाटकची जबाबदारी देण्यात आली आहे.

                              ****
भारतीय रेल्वेनं, एल्स्टम कंपनीच्या सहकार्यानं डब्लूएजी १२ बी इलेक्ट्रिक इंजिन यशस्वीरित्या विकसित करत वापरात आणलं आहे. हे भारतातील सर्वात शक्तिशाली इंजिन असून देशाच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळं देशातील रेल्वे पायाभूत सुविधांसाठीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात प्रगती झाली आहे.
या इंजिनची निर्मिती आणि रचना अधिक कार्यक्षम आणि शाश्वत वाहतूक नेटवर्कमध्ये योगदान देत समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरसह अवजड मालवाहू गाड्यांची जलद, सुरक्षित आणि सुलभ वाहतूक व्हावी या दृष्टीनं करण्यात आली आहे.

                              ****

विज्ञान भारती, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि शिक्षण विभाग यांच्या वतीनं अकोला जिल्ह्यात आजपासून येत्या चार जानेवारीपर्यंत इस्रोचं विज्ञान आणि तंत्रज्ञान असलेली फिरती बस विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. अंतराळ प्रवासाची परिपूर्ण माहिती सामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशानं इस्रोनं स्पेस ऑन व्हील्स ही अनोखी फिरती बस तयार केली आहे. बसमध्ये चंद्रयान मोहीम, मंगळयान मोहीम, अवकाशात सोडलेले विविध उपग्रह तसंच इस्रोचा आतापर्यंतचा अंतराळ प्रवास अकोला जिल्हावासीयांना पाहायला मिळणार आहे.

                              ****
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला इथं आज सकाळी दहशतवाद्यांनी बारामुल्लाच्या जेंटमुल्ला मशिदीवर गोळीबार केला. यावेळी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिक्षक मोहम्मद शफी यांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी ठार केलं.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांतलं हे तिसरं मोठं दहशतवादी कृत्य आहे. यापूर्वी २३ डिसेंबर रोजी अखनूरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता, तर २१ डिसेंबर रोजी राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये पाच जवान शहीद झाले होते.

                              ****

भारतीय महिला क्रिकेट संघानं आस्ट्रेलियाविरोधातला कसोटी सामना आठ गडी राखून जिकंला. हा सामना मुंबईतल्या वानखेडे स्टेडीयमवर खेळवला गेला. चौथ्या आणि अंतिम दिवशी आज आस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी ७५ धावांचं आव्हान दिलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं आपल्या दुसऱ्या डावात दोन गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पूर्ण केलं. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१९ आणि दुसरा डाव २६१ धावांवर आटोपला होता. पहिल्या डावात भारताकडे १८७ धावांची आघाडी होती.   

                              ****

 

No comments: