आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ जानेवारी २०२४ सकाळी ११.००
वाजता
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था
इस्त्रोनं आज एक्स रे पोलारिमीटर सॅटेलाईट एक्सपोसॅटचं यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रात
पीएसएलव्ही सी ५८ या उपग्रहाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आलं. या उपग्रहाद्वारे अवकाशात होणारा किरणोत्सर्ग, कृष्ण
विवर तसंच न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास केला जाणार आहे. या उपग्रहासोबतच
१० अन्य पॅलोड्सचंही प्रक्षेपण करण्यात आलं. ही कामगिरी करणारा
भारत जगातील दुसरा देश ठरला आहे. या कामगिरीबद्दल केंद्रीय अंतराळ
राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी इस्त्रोचं अभिनंदन केलं
आहे.
****
केंद्र शासनाच्या नवीन वाहन कायद्याच्या निषेधार्थ आज नाशिक
जिल्ह्यात मनमाड जवळील पानेवाडी इथं पेट्रोल-डिझेल टँकर चालकांनी आंदोलन सुरू केलं आहे. या ठिकाणी
आज एकाही टँकरमध्ये इंधन भरू न दिल्यामुळं, सध्या पाचशे ते सहाशे टँकर इथं उभे आहेत. आज
दुपारपर्यंत टँकर न भरू दिल्यास नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि काही भागात पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवू शकते, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
नववर्ष २०२४ चं देशभरात उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात
आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,
उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी,
राज्यपाल रमेश बैस यांनी देशातल्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या
आहेत.
****
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी नागरिकांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी काल रात्री ठाणे इथं रक्तदान करुन नवीन वर्षाचं स्वागत
केलं.
****
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी आज पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव इथं भेट देवून विजय स्तंभाला अभिवादन केलं. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी या ठिकाणी मोठी गर्दी
केली आहे.
****
प्रतिभावंत भारतीय खेळाडू अनहत सिंह हिनं एडिनबर्ग इथं झालेल्या
मुलींच्या १९ वर्षांखालील स्कॉटिश कनिष्ठ खुल्या स्क्वॉश स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
****
No comments:
Post a Comment