Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 01 January 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
आमच्या सर्व श्रोत्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
· नववर्ष २०२४ चं देशभरात उत्साहात आणि जल्लोषात स्वागत
· देश प्रथम या मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार असल्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून प्रतिपादन
· सोळाव्या वित्त आयोगाची केंद्र सरकारकडून स्थापना
· विकसित भारत संकल्प यात्रा पुढच्या पिढ्यांनाही विकासाचा महामार्ग दाखवणार - केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव
आणि
· वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर
****
नववर्ष २०२४ चं देशभरात उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं. प्रार्थना आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी धार्मिक स्थळी लोकांनी गर्दी केली होती.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातल्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. हे वर्ष प्रसन्नता, शांती आणि समृद्धी आणणारं असो, तसंच नागरिकांनी देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिलं पाहिजे असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल रमेश बैस यांनीही नागरीकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री ठाणे इथं रक्तदान शिबिरात सहभागी होत नवीन वर्षाचं स्वागत केलं. यावेळी नागरीकांना शुभेच्छा देताना ते म्हणाले,
‘‘२०२४ हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, आरोग्यदायी जावो, अशा मनापासून शुभेच्छा. या राज्यावरचं, बळीराजावरचं, सर्वसामान्य माणसावरचं संकट, अरिष्ट दूर होवो, आणि या नवीन वर्षामध्ये सर्वांच्याच आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ द्या आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या, हे राज्य सुजलाम, सुफलाम आणि समृद्ध होऊ द्या, अशा प्रकारच्या सर्वांना शुभेच्छा.’’
नववर्षाच्या स्वागतासाठी काल राज्यातल्या पर्यटन स्थळांवर तसंच मोठ्या मॉल्समध्ये नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. सरत्या वर्षातला सूर्यास्त पाहण्यासाठी राज्यातल्या विविध समुद्र किनाऱ्यांवर देखील आबालवृद्धांनी गर्दी केली होती. नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातल्या वणीच्या श्री सप्तशृंगी देवीचं मंदिर आणि शिर्डी इथलं साईबाबांचं मंदिर दर्शनासाठी काल रात्रभरही खुलं ठेवण्यात आलं होतं.
****
देश प्रथम या मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार आहोत, असा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात काल ते देशवासियांशी संवाद साधत होते. या मालिकेचा हा १०८वा भाग होता. सरत्या वर्षात देशानं लक्षणीय कामगिरी केल्याचं सांगून पंतप्रधानांनी, नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नारी शक्ती वंदन कायदा, जी ट्वेंटी परिषदेचं यशस्वी आयोजन, भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणं, चांद्रयान ३ मोहीमेचं यश, क्रिडा क्षेत्रातली कामगिरी आदी घटनांचा त्यांनी उल्लेख केला. शारिरीक आणि मानसिक आरोग्याचं महत्वही पंतप्रधानांनी मन की बात मधून विषद केलं.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या अणदूर इथं मन की बात हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी थेट उसाच्या फडात जाऊन उसतोड कामगारांबरोबर ऐकला.
****
प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल ‘स्वच्छ माझा महाराष्ट्र’ या महास्वच्छता अभियानाला सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते. मुंबई शहरात राबवलं जाणारं हे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबवण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. हे अभियान आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना केलं आहे.
****
साडेबारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात डाटा गोळा करायला वेळ लागेल, त्यामुळे मराठा आरक्षणासाठी एक वर्षांचा कालावधी लागू शकतो, असं संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. २०१४ ते २०१९ काळात आपण हा प्रश्न जवळून हाताळला होता, त्यावेळी मागास वर्ग आयोगाला अहवाल द्यायला एक वर्ष लागलं होतं, असं त्यांनी सांगितलं.
****
कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाविरोधात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे, त्यामुळे जे एन वन या नव्या स्वरुपामुळे घाबरून जाऊ नये, मात्र सतर्कता बाळगायला हवी, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी म्हटलं आहे. नागपूर इथल्या एम्स रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्या काल बोलत होत्या.
****
राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती झाली आहे. करीर यांनी काल मनोज सौनिक यांच्या कडून मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला.
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ हे देखील काल सेवानिवृत्त झाले असून, त्यांचा पदभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
****
केंद्र सरकारनं सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना केली आहे. नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ अरविंद पानगढिया हे या आयोगाचे अध्यक्ष असतील. वित्त आयोग केंद्र आणि राज्यांदरम्यान कर महसुलाचं वाटप, तसंच पंचायत संस्थांची उत्पन्नाची साधनं याविषयी शिफारशी करेल.
****
विकसित भारत संकल्प यात्रा ही पुढच्या पिढ्यांनाही विकासाचा महामार्ग दाखवणारी यात्रा असल्याचं, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ आणि कळमनुरी तालुक्यातल्या सेलसुरा या गावात काल विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली, त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारत संकल्प यात्रेमुळे सर्व स्तरातल्या नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत असल्याचं ते म्हणाले,
‘‘योजनाएं जब सौ प्रतिशत जमीनपर पहुंचेगी, तो इसके बाद हमको विकसित भारत का संकल्प भी साथ के साथ करना चाहिये. आज मै जितने भी लाभार्थियोंसे मिला हुं, प्रधानमंत्री आवास योजना का पैसा, किसान सम्मान निधी का पैसा, वो आपके अकाऊंट मे, जो हमारे दिव्यांग भाई है, उनका पैसा उनके अकाऊंट में, ये जो जन धन अकाउंट है, ये देश के इकानॉमीका सबसे बडे माध्यम बना है. इन सब को देश की आर्थिक ताकत के साथ जोडनें का काम, ये प्रधानमंत्रीजीने किया है.’’
यावेळी वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या १७० लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभांचं वाटप करण्यात आलं. खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे यावेळी उपस्थित होते.
मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत नागरिकांनी आपल्या लाभाची माहिती दिली...
****
नांदेड इथं विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत महापालिका हद्दीत २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत १३ ठिकाणच्या पाच हजार ७४४ नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीत झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. शाईन एंटरप्राईजेस या कंपनीत झालेल्या या दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. याशिवाय जखमी कामगारांना तातडीनं शासकीय खर्चानं सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
दरम्यान, पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी काल सकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. पालकमंत्री संदिपान भुमरे, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही घटनास्थळी भेट देत, दुर्घटनेची माहिती घेतली.
****
अयोध्येतल्या राम मंदिर लोकार्पणानिमित्त अयोध्येतून आलेल्या अक्षता कलशाची काल हिंगोली शहरात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.
****
छत्रपती संभाजीनगर इथं दुसऱ्या फुले-शाहू- आंबेडकरी साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल प्रसिद्ध कवी फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते झालं. ज्येष्ठ विचारवंत लक्ष्मण माने यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, कविसंमेलन आणि प्रकट मुलाखती आदी कार्यक्रम होत आहेत. आज या संमेलनाचा समारोप होणार आहे.
****
No comments:
Post a Comment