Wednesday, 24 January 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.01.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 24 January 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २४ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचीत्त्याने उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज आपलं संविधान, आपला सम्मानया उपक्रमाचा शुभारंभ झाला. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या तत्त्वांप्रती सामूहिक बांधिलकीची पुष्टी करणं आणि राष्ट्राला बांधून ठेवणारी समान मुल्यांची जपणूक करणं हा या अभियानाचा उद्देश असल्याचं केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने म्हटलं आहे.

****

७५ व्या प्रजासत्ताक दिनाला, कर्तव्यपथावरील संचलन बघण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं पंधराशेहून अधिक शेतकऱ्यांना कर्तव्य पथावर आमंत्रित केलं आहे. हे शेतकरी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री फसल विमा योजनाआणि प्रधानमंत्री कृषी मंत्री योजनाअशा विविध योजनांचे लाभार्थी आहेत. आपल्या दिल्लीतल्या वास्तव्यादरम्यान, हे शेतकरी कृषी पायाभूत सुविधा निधी, राष्ट्रीय बियाणे सहकार्य आणि पर ड्रॉप मोअर क्रॉपयासारख्या महत्त्वाच्या सरकारी योजनांचं प्रशिक्षण घेणार आहे.

****

राष्ट्रीय बालिका दिवस आज साजरा होत आहे. देशातल्या मुलींना सक्षम बनवण्यासाठी मदत करणं आणि त्यांना नवीन संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. मुलींच्या हक्कांबाबत आणि त्यांच्या शिक्षणाबाबत जनजागृती यानिमित्त केली जात आहे.

****

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आज कोलकाता इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. इंडिया आघाडीत आपले प्रस्ताव नाकारण्यात आल्यानं हा निर्णय घेतल्याचं त्या म्हणाल्या.

****

राष्ट्रीय रज्जूमार्ग अर्थात रोपवे विकास कार्यक्रम - पर्वतमालाअंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी एक लाख २५ हजार कोटी रुपयांचे दोनशेहून अधिक प्रकल्प निश्चित केले असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते काल नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या रोप वे वरील चर्चासत्र आणि प्रदर्शन कार्यक्रमात बोलत होते. रोप वे आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि देशात रोप वे चं जाळं अधिक विकसित करण्यासाठी या क्षेत्रात सार्वजनिक-खासगी भागीदारीला प्रोत्साहन देण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं गडकरी म्हणाले.

****

अवयवदानात देशात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. राज्यात १४९ जणांनी केलेल्या अवयदानामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवयवदात्यांची कुटुंबं आणि आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे. मात्र, अवयवांची गरज असलेल्या रुग्णांची संख्या पाहता, अवयवदानाबद्दल अजूनही मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

****

बारामती ॲग्रो कंपनीच्या कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार आज मुंबईत सक्तवसुली संचालनालय - ईडीच्या कार्यालयात हजार झाले. ईडीच्या चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

****

लातूर जिल्ह्यात कालपासून मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण सुरु झालं असून, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी मुरुड - अकोला या गावात जाऊन प्रगणकांबरोबर सर्वेक्षणाची पाहणी केली. जिल्ह्यात जिथे कुणबी नोंदी सापडल्या आहेत तिथे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे. प्रत्येक तालुक्यात गावांमध्ये ग्रामसभा घेऊ, चावडीवर नोंदी प्रसिद्ध केल्या जात आहेत.

****

वेरूळ अजिंठा महोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक शहराचं वैभव जाणून घेण्यासाठी इंटॅक संस्थेच्या सहकार्याने तीन हेरिटेज वॉक होणार आहेत. यातील दुसरा वॉक उद्या सकाळी होत आहे. इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यात उपस्थितांना शहराच्या विविध भागांची माहिती देणार आहेत.

****

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात बोपन्ना - एब्डेन जोडीनं अर्जेंटिनाच्या जोडीचा पराभव केला. 

****

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं पदक तालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. महाराष्ट्राच्या संघानं आतापर्यंत १४ सुवर्ण १५ रौप्य आणि १६ कांस्यपदकांसह एकूण ४५ पदकं मिळवली आहेत. या स्पर्धेत १२ सुवर्णांसह तमिळनाडू दुसऱ्या तर सात सुवर्णांसह हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

काल दिवसभरात महाराष्ट्राच्या खात्यात बारा सुवर्ण, सात रौप्य आणि दोन कास्य अशा १९ पदकांची भर पडली. मल्लखांबमध्ये राज्यातल्या खेळाडूंनी चार, जिम्नॅस्टिक्समध्ये तीन सुवर्ण आणि दोन रोप्य पदकांची कमाई केली. ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण आणि दोन रौप्य, योगासनामध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्य, सायकलिंग आणि तलवारबाजीमध्ये प्रत्येकी एक सुवर्ण आणि एक कांस्य तर स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्रानं एक रौप्य पदक पटकावलं आहे.

****

No comments: