Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 18 March 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १८ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक तत्त्व जारी
· विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
· इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं तसंच निवडणूक रोख्यांच्या मुद्यावरून राहुल गांधी यांची भाजपवर टीका
आणि
· धाराशिव लोकसभा मतदारसंघात एक हजाराहून अधिक उमेदवारी अर्ज भरण्याचा मराठा समाजाचा इशारा
सविस्तर बातम्या
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं, आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. यासंदर्भात आयोगानं कॅबिनेट सचिव, सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी, यांना पत्र पाठवलं असून, सार्वजनिक ठिकाणांवरचे राजकीय जाहिरातींचे फलक, ४८ तासांमध्ये हटवण्याचे निर्देश दिले. कोणत्याही राजकीय पक्ष किंवा उमेदवाराला निवडणूक प्रचारासाठी सरकारी वाहन वापरता येणार नाही, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियावर सरकारी लाभ सांगणाऱ्या जाहिरातींना परवानगी नाही, मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या जाहिराती रोखण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची सूचना आयोगानं केली आहे. मतदार जागरूकतेसाठी आकाशवाणी, दूरचित्रवाणी, सिनेमा आणि सरकारी वाहिन्यांच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करता येणार असल्याचं, आयोगानं स्पष्ट केलं आहे.
****
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, निवडणूक आयोगानं निवडणूक रोख्यासंबंधित डिजिटल स्वरूपात प्राप्त माहिती, आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश कॅन्डिडेट डॅश पॉलिटिकल डॅश पार्टी, या संकेतस्थळावर नागरिक ही माहिती पाहू शकतात. राजकीय पक्षांनी ही माहिती पाकीट बंद स्वरुपात दाखल केल्याचं आणि ही पाकिटं तशाच स्वरुपात न्यायालयाकडे सोपवल्याचं आयोगानं एका निवेदनात म्हटलं आहे.
****
राज्यातल्या विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी, काल पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या सज्जतेविषयी माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार असून, २५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली...
२०४० मतदान केंद्रांवर औरंगाबाद लोकसभेचं मतदान संपन्न होणार आहे. एकूण २० लाख ३५ हजार २३ मतदार जवळजवळ नऊ लाख एकोणसत्तर हजार ९५८ महिला मतदार आहेत. आणि पुरूष मतदार आहेत दहा लाख चौसष्ट हजार. संपूर्ण पोलिंग सेंटरचं नियंत्रण हे औरंगाबादमध्ये १३ हे महिलांमार्फत चालणारं पोलिंग सेंटर असेल.
****
जालना लोकसभेसाठी १९ लाख ३६ हजार ९९० मतदार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. यामध्ये दहा लाख १८ हजार २५१ पुरुष, तर नऊ लाख १६ हजार ३१९ स्त्री आणि ५१ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यात १८ ते १९ या वयोगटातल्या नवमतदारांची संख्या २४ हजार १२१ आहे. ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या तसंच दिव्यांग मतदारांना प्रथमच टपालाद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यात १७ मतदान केंद्र संवेदनशील असून, सुरक्षेचं चोख नियोजन केलं असल्याचं जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी सांगितलं. काल या संदर्भातल्या बैठकीत त्या बोलत होत्या. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यालयात पाच प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. आदर्श आचारसंहिता पालनाचं आवाहन त्यांनी केलं.
****
निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा लातूर जिल्हा प्रशासनानं दिला आहे. लातुरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी या संदर्भातली माहिती दिली. त्या म्हणाल्या...
मसल, मिस इनफर्मेशन, मनी या सगळ्या आपल्याला माहीत आहेत. या चारहीच्या बाबतीत आणि आपला जो ॲक्ट आहे, याच्याप्रमाणे ज्या गोष्टी आहेत, मिस इनफर्मेशन दिली, सोशल मिडीयावरपण आमचं जे पथक आहे, पूर्ण फ्लाईंग स्कॉडस् त्यामध्ये कार्यान्वित राहणार आहेत. सी व्हिजीलसारखे ॲप याठिकाणी कार्यान्वित आहेत. कोणी कुठल्या बाबतीत जाहिरात ही स्पष्ट त्या ठिकाणी नमूद करणं, हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे याचा जर भंग झाला किंवा या प्रक्रियेला अनुसरून कोणी कार्यवाही केली नाही, तर त्याच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल.
लातूरचे पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन कारवाईसाठी सज्ज असल्याचं सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, पोलीस प्रशासनाच्या वतीनं प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
****
नंदुरबार जिल्ह्यातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी काल मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमशा पाडवी यांनी आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी समाजासाठी कायम संघर्ष केला, त्यांच्या शिवसेनेत येण्यानं आदिवासीबहुल भागातल्या लोकांना न्याय देता येणं, शक्य होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं तसंच निवडणूक रोख्यांच्या मुद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली आहे. काल मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीच्या सभेत ते बोलत होते. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला तसंच मेहबुबा मुफ्ती, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह देशभरातले अनेक नेते यावेळी उपस्थित होते. या सभेपूर्वी राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
त्यापूर्वी राहुल गांधी यांनी काल सकाळी मुंबईत मणिभवनला भेट देऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत न्याय संकल्प पदयात्रा काढली.
****
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवस हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आज वसमत, सेनगाव, कळमनुरी इथं, तर उद्या उमरखेड आणि अर्धापूर तालुक्यात ठाकरे यांचे जनसंवाद मेळावे होणार आहेत
****
महाराष्ट्राशी हरित व्यवसाय, पर्यटन, शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवण्यास भूतान देश उत्सुक असल्याचं, भूतानचे पंतप्रधान दाशॊ छेरिंग तोबगे यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्रात लवकरच भूतानच्या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याचं, पंतप्रधान तोबगे यांनी सांगितलं.
****
केंद्रीय विद्यापीठांमध्ये विविध पदवी अभ्यासक्रमासाठीची CUET-UG ही सामायिक प्रवेश परीक्षा १५ ते ३१ मे दरम्यान घेतली जाणार आहे. या कालावधीत, २० आणि २५ मे या सार्वत्रिक निवडणुकांच्या दोन तारखा येत आहेत. २६ मार्च या अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेनंतर, CUET-UG साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांची राज्यं आणि मतदारसंघ याविषयी माहिती प्राप्त होईल. ही माहिती आणि निवडणुकीच्या तारखांनुसार, राष्ट्रीय चाचणी संस्था या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करेल, असं विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी सांगितलं.
****
राष्ट्रीय तपास संस्था- एनआयएनं आयसिस प्रकरणात पुण्यातल्या चार स्थावर मालमत्तांवर टाच आणली आहे. या मालमत्तांचा वापर स्फोटकं बनवणं आणि दहशतवादी कृत्यांचं प्रशिक्षण आणि नियोजनासाठी केला जात असल्याचं, एनअआयएनं म्हटलं आहे.
****
धाराशिव लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाकडून एक हजाराहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा इशारा, सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. धाराशिव इथं काल पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केलं असलं, तरी ते कायद्याच्या कक्षेत टिकणारं नाही, त्यामुळे मराठा समाजास ओबीसीमधूनच आरक्षण देण्यात यावं, या मागणीचा यावेळी पुनरुच्चार करण्यात आला.
****
ग्रंथालयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणाऱ्या ग्रंथांची आवश्यकता असल्याचं, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भगवान अंजनीकर यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यावतीनं घेण्यात आलेल्या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा काल समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष माजी आमदार गंगाधर पटणे यावेळी उपस्थित होते.
****
वृक्ष संवर्धन ही निरंतर प्रक्रिया असल्याचं, पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ. पवन लड्डा यांनी म्हटलं आहे. काल परभणी इथं जागतिक जलदिनाच्या अनुषंगानं झालेल्या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. जलमित्र प्रतिष्ठान आणि स्वच्छता ग्रुप यांच्यावतीने हे व्याख्यान घेण्यात आलं. लातूर शहरातल्या वृक्ष संवर्धनाचा डॉ लड्डा यांनी यावेळी आढावा घेतला.
****
बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातल्या कन्हेरवाडीच्या नागरिकांनी त्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काल धरणे आंदोलन केलं. या भागात पाणी टंचाई असल्यानं लघू सिंचन धरणातलं पाणी नदीपात्रात सोडण्यात यावं, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
****
येत्या दोन दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment