Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 03 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राज्य विधानसभा निवडणुकीतले उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. येत्या २० तारखेला २८८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात नऊ मतदार संघासाठी ४३७ उमेदवारांपैकी ३९८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. जालना जिल्ह्यात २९६, बीड जिल्ह्यात ३७७, परभणी जिल्ह्यात दी़डशे उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. लातूर जिल्ह्यात १९३, धाराशीव जिल्ह्यात १६४ उमेदरावांचे अर्ज वैध ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी हिंगोली जिल्ह्यात १८७ तर नांदेड जिल्ह्यात ४६० उमेदवारी अर्ज पात्र ठरले.
****
राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना शांत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. महायुतीचे ३६ तर महाविकास आघाडीचे २६ उमेदवार बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत. महायुतीच्या मोर्शी, आष्टी, श्रीरामपूर, दिंडोरी, देवळाली, अणूशक्तीनगर, मानखुर्द इथल्या उमेदवारांनी परस्परांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर महाविकास आघाडीत परंडा, पंढरपूर, दिग्रस, धारावी, मानखुर्द, सोलापूर शहर मध्य, सांगोला आणि लोहा या आठ जागांवर परस्परांविरोधात उमेदवार उभे आहेत. त्यामुळे, उद्या सोमवारी अर्ज मागं घेण्यात आल्यानंतर राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार आहे.
****
शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस हमीभावानं कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचं उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भिती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत ही बाब शासनानं लक्षात घ्यावी असं पटोले यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या या पत्रात म्हटलं आहे.
****
भारताच्या आत्मनिर्भर मोहिमेचे अपेक्षित परिणाम होत असून देशाची संरक्षण निर्यात २०२९-३० पर्यंत ५० हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. कानपूर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पासष्ठाव्या स्थापना दिवस समारंभात काल त्यांनी ही माहिती दिली. विकसित भारत हा दृष्टिकोन साकार करण्यासाठी देशात आयात होणाऱ्या उच्च तंत्रज्ञानाचा स्वदेशात विकास करण्याचं आवाहन संरक्षणमंत्र्यानी भारतीय तरुणांना यावेळी केलं. आयआयटी कानपूरसारख्या संस्था शैक्षणिक इंजिनं असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात ती भारताला गतिशीलता प्रदान करू शकतात असं राजनाथ सिंह म्हणाले.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान मुंबईत सुरू तिसरा कसोटी क्रिकेट सामना आज तिसऱ्या दिवशी अतिशय रंगतदार अवस्थ आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा भारतानं १४७ धावांचं लक्ष्य असताना सात बाद १२० धावा केल्या आहेत. ऋषभ पंतनं यात ६४ धावा केल्या आहेत. झीलंडचा दुसरा डाव १७४ धावांवर बाद झाला. भारतानं पहिल्या डावात २६३ तर न्यूझीलंडनं २३५ धावा केल्या आहेत. तीन कसोटी सामन्यांची ही मालिका न्यूझीलंडनं या पूर्वीच दोन-शून्य अशी जिंकली आहे.
****
लद्दाखमध्ये नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप - एनएलएसटी उभारण्याची तयारी सुरू आहे. या प्रकल्पाचं नेतृत्व बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स - आयआयए चे संचालक प्राध्यापक अन्नपूर्णी सुब्रमण्यम करत आहेत. सूर्यावरील वैज्ञानिक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठीच्या या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आली असून हा प्रकल्प अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आयआयए नुसार, या दुर्बिणीमध्ये दोन मीटरचे प्रतिक्षेपक बसवलेले असतील. यामुळे शास्त्रज्ञांना सूर्यावर होत असलेल्या हालचाली समजून घेण्यास आणि संशोधन करण्यास मदत होईल.
****
दूरदर्शनच्या वृत्तवाहिनीला आज २० वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी पूर्वीची डीडी-मेट्रो ही वाहिनी अहोरात्र वृत्त वाहिनीमध्ये रुपांतरित करण्यात आली होती. दूरदर्शनच्या ३१ प्रादेशिक वृत्त वाहिन्या असून समाज माध्यमांवरही डीडी न्यूज अतिशय प्रभावीपणे सक्रिय आहे.
****
श्रीनगरमधील खानयार भागात सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या चकमकींत तीन दहशतवाद्यांना ठार केलं. सुरक्षा दलांनी काल लष्कर-ए-तैयबाचा कमांडर उस्मान याला एका चकमकीत ठार केलं आहे.
****
No comments:
Post a Comment