Sunday, 3 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.11.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 03 November 2024

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०३ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.

****

बहीण भावाच्या नात्यातला स्नेह अधिक वृद्धिंगत करणारा भाऊबीजेचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. या दिवशी बहिणीनं भावाला ओवाळण्याचा आणि भावानं बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देण्याचा प्रघात आहे. भाऊबीजेच्या निमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्नेह, समर्पण आणि भक्तीचं प्रतीक असलेली भाऊबीज सर्वांच्या जीवनात अपरिमित आनंद घेऊन येवो अशी शुभकामना त्यांनी आपल्या सामाजिक प्रसार माध्यमावरील संदेशाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. दरम्यान, बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा सण काल मोठ्या उत्साहात साजरा झाला. विक्रम संवत २०८१ ला कालपासून प्रारंभ झाला. देशाच्या अनेक भागात हा नववर्षाचा प्रारंभ मानला जातो.

****

चार धाम पैकी केदारनाथ धामचे द्वार हिवाळ्यानिमित्त आज सकाळी विधीपूर्वक बंद करण्यात आले. भाऊबीजेच्या औचित्यानं या मंदिराची विशेष सजावट करण्यात आली आहे. उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या यमुनोत्री धामचे द्वार आज दुपारी बंद करण्यात येतील. या वर्षी १५ लाखांहून अधिक भाविकांनी केदारनाथ धाम तर सात लाखांहून  अधिक भाविकांनी यमुनोत्री धामला भेट दिली आहे.

****

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात विजयासाठी भारतासमोर १४७ धावांचं लक्ष्य आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा भारताच्या दुसऱ्या डावामध्ये पाच बाद ५७ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडचा दुसरा डाव आज सकाळी १७४ धावांवर बाद झाला. न्यूझीलंडनं तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. 

****

भारताचे संविधान हेच सर्वोच्च आहे. मनुस्मृती विरोधात काँग्रेसची लढाई सुरुच आहे. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी लढा उभारणे काळाची गरज आहे. हा लढा अधिक बुलंद करण्यासाठी विदर्भातील सामाजिक संस्थानी नागपूर इथे येत्या ६ तारखेला संविधान संमेलन आयोजित करण्यात आलं असून या संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मान्यवर यात आपले विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप नाही. आदर्श आचारसंहितेचं पालन करूनच कार्यक्रम होणार आहे, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

****

नंदुरबार जिल्ह्यात भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. काल रात्री उशीरा नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावाजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला नादुरुस्त दुचाकीजवळ उभ्या असलेल्यांना भरधाव गाडीनं धडक दिली. यात १२ ते ४० वर्ष वयोगटाल्या पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याला नंदुरबार इथं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती, आमच्या वार्ताहरानं दिली आहे.

****

आक्षेपार्ह टिप्पणी करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सावंत यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. महिलांच्या अवमानाबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांची तोंड का बंद आहेत, असा सवाल करत शिवसेनेच्या मुंबादेवी मतदार संघातील उमेदवार शायना एन.सी यांनी या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने महिलांबाबत आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली आहे. 

****

परभणी जिल्ह्यातील रामपुरी इथं मतदान जनजागृतीपर दिवाळी पहाटचा सुरेल संगीत कार्यक्रम घेण्यात आला. २० नोव्हेंबर रोजी सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावा आणि लोकशाही बळकट करा असा संदेश स्वीप उपक्रमांतर्गत यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी मतदान करण्याचा निर्धार करून मतदानाची शपथ घेतली.

****

भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये भारतीय रेल्वेनं ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत’ या संकल्पनेसह आणि प्रवाशांना अधिकाधिक स्वच्छ प्रवासाचा अनुभव मिळणं सुनिश्चित करण्यासाठी विविध व्यापक उपक्रमांसह सातत्यानं प्रमुख सहभाग नोंदवला आहे. गेल्या महिन्यात रेल्वेनं राबवलेल्या स्वच्छता पंधरवडा मोहिमेत देशभरातली ७ हजार २८५ रेल्वे स्थानकं, २ हजार ७५४ रेल्वे गाड्या आणि १८ हजार ३३१ कार्यालयं स्वच्छ करण्यात आल्याची माहिती रेल्वेतर्फे देण्यात आली आहे. पंधरवडा कालावधीत, भारतीय रेल्वेच्या वेगवेगळ्या गटांनी वृक्षारोपण मोहीम, स्वच्छ संवाद, स्वच्छ रेलगाडी, स्वच्छ स्टेशन, स्वच्छ परिसर, स्वच्छ आहार, स्वच्छ प्रसाधन इत्यादी दैनंदिन योजना किंवा उपक्रम हाती घेतले. या वर्षी रेल्वे मार्गावरील स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...