Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 22 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या
चकमकीत दहा नक्षलवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. सुकमा जिल्ह्यातल्या कोनता भागात
नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हाती घेतलेल्या शोध
मोहिमेदरम्यान ही चकमक झाली. या ठिकाणावरून एके फॉर्टीसेवन आणि स्वयंचलित
रायफल्ससह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही शोध मोहीम अजूनही सुरू
असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
येत्या २५ नोव्हेंबर रोजी जागतिक सहकार्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय संमेलनाचं
उद्घघाटन होणार आहे. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं होणाऱ्या या संमेलनात, आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त
पंतप्रधानांच्या हस्ते एक टपाल तिकीटही प्रकाशित केलं जाणार आहे.
****
भारत आणि मालदीव यांच्यादरम्यानचे
व्यवहार आता या दोन देशांच्या स्वत:च्या चलनात, म्हणजे रुपया आणि रुफिया, या
चलनात होणार आहेत. यासंदर्भातल्या करारावर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गवर्नर
शक्तिकांत दास आणि मालदीव मॉनिटरी अथॉरिटीचे गवर्नर अहमद मुनावर यांनी मुंबईत
सह्या केल्या. या करारामुळे आयात आणि निर्यातदारांना आर्थिक व्यवहार करण्यात
सुलभता होईल तसंच या दोन देशांदरम्यानच्या व्यापारातही वाढ होईल.
****
भारतीय सायबर गुन्हेगारी समन्वय केंद्र
अर्थात आय फोर सी नं दूरसंवाद विभागाच्या सहकार्यानं १७ हजार व्हॉटसऍप खाती
प्रतिबंधित केली आहेत. ही सर्व खाती अग्नेय आशियात कार्यरत असणाऱ्या सायबर
गुन्हेगारीशी संबंधित आहेत. परकीय भूमीवरुन काम करणारं गुन्हेगारी विश्व नष्ट करणं
आणि भारताची डिजिटल सुरक्षा मजबूत करणं हा या मोहीमेचा उद्देश असल्याचं केंद्रीय
गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
राज्यात एकाच टप्प्यात झालेल्या
विधानसभा निवडणुकीची तसंच नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची
मतमोजणी उद्या होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी
प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आलं असून, प्रत्येक मतमोजणी
केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यभरतल्या सर्व २८८ मतमोजणी
केंद्रांवर सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल. टपाली मतपत्रिकांची मतमोजणी आधी
होईल, त्यानंतर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सकाळी साडे आठ वाजता सुरू होईल.
****
झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकीची तसंच
विविध राज्यातल्या विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणीदेखील उद्याच होणार
आहे. झारखंडमध्ये २४ मतमोजणी केंद्रं उभारण्यात आली असून, उद्या
सकाळी आठ वाजता टपाली मतांच्या मोजणीला सुरुवात
होईल,
असं झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी के रवी कुमार यांनी
सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात असलेल्या तीन
विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी
काही मार्गात बदल करण्यात आले आहेत. औरंगाबाद मध्य मतदारसंघाची मतमोजणी उस्मानपुरा
इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, पश्चिम मतदारसंघाची मतमोजणी
उस्मानपुरा इथल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पूर्व मतदारसंघाची
मतमोजणी जालना रोड वरच्या सेंट फ्रान्सिस शाळेत होणार आहे. एसएसची बोर्ड टी पॉइंट
ते पीरबाजार चौक रस्ता,
विट्स हॉटेल चौक ते गाडे चौक आणि आकाशवाणी ते सेव्हन हिल्स
पर्यंत एका बाजुचा रस्ता मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत बंद राहणार आहे.
****
मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला
जाणारा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना
जाहीर झाला आहे. मराठी नाट्य कलाकार संघाचे प्रमुख कार्यवाह विजय सूर्यवंशी यांनी
काल मुंबईत ही माहिती दिली. येत्या २५ तारखेला, मुंबईत आयोजित 'जागतिक
रंगकर्मी दिन'
सोहळ्यात हा पुरस्कार जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
****
संत ज्ञानेश्वर माउली संजीवन समाधी
सोहळ्यानिमित्त आळंदीमध्ये येत्या २३ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत कार्तिक वारी
होणार आहे. यानिमित्त आळंदीमध्ये राज्याच्या तसंच देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे
सहा ते सात लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे. या काळात गर्दीचं नियोजन
करण्यासाठी उद्यापासून पुढचे आठ दिवस आळंदीत प्रवेश करणाऱ्या सर्व प्रकारच्या
वाहनांना बंदी करण्यात आल्याची माहिती, पिंपरी चिंचवड वाहतूक
शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली.
****
रेल्वे विभागातल्या कर्मचारी भरतीच्या
परीक्षेसाठी येत्या २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी नांदेड - तिरुपती नांदेड ही विशेष
गाडी चालवण्यात येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही
माहिती दिली.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच
सामन्यांच्या बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना पर्थ इथं
सुरु असून,
भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. नाणेफेक जिंकून
प्रथम फलंदाजी करायला आलेला भारतीय संघ ५०व्या षटकात अवघ्या १५० धावांवर सर्वबाद
झाला.
****
No comments:
Post a Comment