Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 December
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ डिसेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
· शासकीय कार्यालयं आणि विभागांमध्ये निवड झालेल्या ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
· येत्या २५ तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते नदी जोड प्रकल्पाचा शुभारंभ-प्रधानमंत्री
आवास योजनेत महाराष्ट्राला अतिरिक्त १३ लाख घरं
· सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची लोकसभा विरोधी पक्षनेते
राहुल गांधी यांची मागणी
· संतोष देशमुख हत्येचं राजकारण करु नये-सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं आवाहन
आणि
· आयसीसी चँपियन्स करंडक स्पर्धेत भारताचे सामने युएईमध्ये घेण्याचा पाकिस्तानचा
निर्णय
****
शासकीय कार्यालयं आणि विभागांमध्ये निवड
झालेल्या ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य
प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान केली. रोजगार मेळाव्यांमुळे युवकांचं सक्षमीकरण
होत असून, त्यांची क्षमता आणि कौशल्याचा उपयोग करुन घेणं,
ही सरकारची प्राथमिकता असल्याचं, पंतप्रधान म्हणाले.
राज्यात नागपूर आणि पुणे इथं हे रोजगार मेळावे पार पडले.
नागपूर इथं झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २५७ जणांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. शासकीय
नोकऱ्यांमध्ये नवनियुक्तांनी आपल्या अंगभूत तसंच व्यक्तिगत कौशल्याचा विकास करून केवळ
नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावं, असं आवाहन गडकरी
यांनी यावेळी केलं.
पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
यांच्या उपस्थितीत झालेल्या रोजगार मेळाव्यात ५०० जणांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात
आली.
****
येत्या २५ तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते
नदी जोड प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान
यांनी आज पुण्यात ही माहिती दिली. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत, कृषी आर्थिक संशोधन केंद्राच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या
कार्यक्रमात चौहान बोलत होते. कमी पाण्यात अधिकाधिक सिंचन व्यवस्था विकसित करण्याच्या
गरजेवर त्यांनी भर दिला. संपूर्ण जगासाठी भारत हे अन्नधान्याचं कोठार होण्याच्या दृष्टीने
सरकार पूर्ण प्रयत्न करत असल्याचं चौहान यांनी सांगितलं. कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर
कमी करून, नैसर्गिक शेतीवर भर देण्याचं आवाहन चौहान यांनी केलं.
दरम्यान, प्रधानमंत्री
आवास योजनेत महाराष्ट्राला या वर्षी अतिरिक्त १३ लाख घरं देण्यात येणार आहेत. केंद्रीय
ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पुण्यात शेतकरी सन्मान दिनानिमित्त शेतकरी
आणि ग्रामविकास लाभार्थी मेळाव्यात ही माहिती दिली. पुढील एका वर्षांत ही घर मिळणार
आहेत. असेही शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक
मान्यवर यावेळी उपस्थित होते. ही महाराष्ट्रासाठी मोठी भेट असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी
व्यक्त केली. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा
लाख घड्याळ मंजूर केली होती. ते टारगेट
वाढवण्यात आलेला आहे. अतिरिक्त १३ लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत. एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीने एका
वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय
ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी
केलेली आहे. महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत
मोठी भेट आहे.
****
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांची जयंती
राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
देशाच्या अन्नसुरक्षा आणि समृद्धीमध्ये शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या योगदानाचा सन्मान
करण्याचा हा दिवस आहे. खाद्य सुरक्षा सुनिश्चित करणं, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करणं आणि देशाच्या कृषी वारश्याच्या संरक्षणात
शेतकऱ्यांच्या अमूल्य भूमिकेचं स्मरण यानिमित्त केलं जातं.
****
परभणी हिंसाचार प्रकरणादरम्यान मृत झालेल्या
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांची आज राहुल गांधी यांनी परभणीत इथं भेट घेत या
प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणी मुख्यमंत्र्यानी विधानसभेत केलेल्या विधानावर टीका
करत, ज्या लोकांनी हे कृत्य केलं आहे, त्यांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
दरम्यान, आंबेडकरी
चळवळीतील नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची राहुल गांधी यांनी भेट घेऊन,
त्यांचं सांत्वन केलं. गांधी यांच्या या दौऱ्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते
बाळासाहेब थोरात, खासदार संजय जाधव, आमदार
डॉ राहुल पाटील, अमित देशमुख यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी
आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
****
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
यांनी आज बीड जिल्ह्यात मस्साजोग इथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन
केलं. यावेळी माध्यमांशी बोलतांना, संतोष देशमुख
यांच्या हत्येचं राजकारण करु नये असं आवाहन करत, या हत्याकांडात
सहभागी सर्वांवर कडक कारवाई करण्याची सरकारची भूमिका असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं.
ते म्हणाले –
संतोष
देशमुखांच्या हत्येत राजकारण मध्ये आणू नका. आमची भूमिका स्पष्ट आहे की या संतोष देशमुखच्या
हत्येत ज्यांचा ज्यांचा हात असेल, मग तो कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर
कारवाई ही झाली पाहिजे. आणि ज्याचाही हात असेल, त्याला हे सरकार माफ करणार नाही असं
मुख्यमंत्र्यांसहीत दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे.
दरम्यान, संतोष
देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी येत्या २८
डिसेंबर रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी आज सर्व संघटनांची
एकत्रित बैठक बीड इथं झाली. जिल्ह्यातील गुन्हेगारी, दहशत तसंच
जातीयवाद मोडीत काढण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पुढच्या वर्षी होणाऱ्या आयसीसी चँपियन्स
करंडक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यांसाठी, तटस्थ स्थळ
म्हणून पाकिस्तान क्रिकेट मंडळाने संयुक्त अरब अमिरात या देशाची निवड केली आहे. सुरक्षाविषयक
कारणांमुळे भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद-आयसीसीने भारताचा हा निर्णय मान्य केल्यामुळे
पाकिस्ताननं हे सामने युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. युएईतले हे सामने नेमके कुठे
होणार हे पाकिस्तान क्रिकेट मंडळानं स्पष्ट केलं नसलं, तरी दुबईमध्ये
हे सामने होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानच्या या
निर्णयामुळे या स्पर्धेचं वेळापत्रक निश्चित करण्याचा आयसीसीचा मार्ग आता मोकळा झाला
आहे.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत ‘वन नेशन-वन स्टुडन्ट आयडी’ - अपार योजना राबवण्यात येत
आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ७५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांच्या
नोंदणीचे काम पूर्ण झालं आहे. याबाबत आमचे वार्ताहर रमेश कदम यांनी अधिक माहिती दिली
–
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७५.६३% विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. पहिली ते बारावी पर्यंत
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना “ऑटोमोटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री आयडी” अर्थात
‘अपारकार्ड’ दिले जाणार आहे. अपारकार्ड ही विद्यार्थ्यांसाठी नवीन ओळख देणारी प्रणाली
आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना १२ अंकी क्रमांक असलेले कार्ड दिले जाणार आहे. अपारकार्ड
प्रणाली एज्यूलॉकर सारखी असून त्यात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती
एकत्रित उपलब्ध असणार आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी
यांच्या जयंती दिनी धाराशिवच्या लोकसेवा समितीच्या वतीनं दिले जाणारे “लोकसेवा पुरस्कार” जाहीर झाले आहेत. यात बीडच्या पसायदान
सेवा प्रकल्पाचे गोवर्धन दराडे, जालन्याच्या प्रेरणादायी शिक्षण
संकुलाचे रामकिसन सोळंके आणि धाराशिवच्या मीराताई मोटे यांचा समावेश आहे. २५ तारखेला
धाराशिव इथं प्रमोद महाजन बहुउद्देशीय सभागृहात सकाळी ११ वाजता हे पुरस्कार समारंभपूर्वक
प्रदान केले जातील.
****
छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवून मोफत
वीज मिळवण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आता महावितरणतर्फे ग्राहकांना
मोफत नेट मीटर मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना
आपल्या प्रकल्पात किती वीजनिर्मिती झाली आणि घरामध्ये किती विजेचा वापर झाला याची अद्ययावत
माहिती मोबाईल ॲपवर मिळेल. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र
यांनी ही माहिती दिली.
****
लहान बाळाचे आधार नोंदणी करण्याचे काम शासनाकडून
रेलटेल कार्पोरेशन ऑफ इंडिया भारत सरकारचा उपक्रम - मुंबई या संस्थेला देण्यात आले
आहे. या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालकांनी, सर्व अंगणवाडी मधून बालकाची आधार नोंदणी तात्काळ करून घेण्याचं आवाहन महिला
आणि बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव यांनी केलं आहे.
****
आज २३ डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिवस
संपूर्ण देशात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून बीड इथं आज प्राध्यापक सुशीला मोराळे यांनी, शेतकऱ्यांच्या
उत्पादनाला हमीभाव देऊन खरेदी केंद्र सुरू करावी आणि विजेचे खाजगीकरण थांबवावे या मागणीचं
निवेदन बीडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.
****
अजमेर इथल्या ऊर्ससाठी दक्षिण मध्य रेल्वे
कडून नांदेड-अजमेर-नांदेड, हैदराबाद-अजमेर-हैदराबाद आणि काचीगुडा-अजमेर-काचीगुडा या तीन विशेष गाड्या चालवण्यात येणार
आहेत. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
प्रशासकीय कामकाजात ‘सुशासन’ संकल्पना
प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलपणे काम करावं, असं आवाहन लातूरच्या
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. सुशासन दिनानिमित्त जिल्हाधिकारी
कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
****
No comments:
Post a Comment