Tuesday, 24 December 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.12.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 December 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

****

• शासकीय कार्यालयं आणि विभागांमध्ये निवड झालेल्या ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

• देशातल्या नदी जोड प्रकल्पाचा उद्या पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ-प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राला अतिरिक्त १३ लाख घरं

• सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी

• संतोष देशमुख हत्या प्रकरणी राजकारण करु नये-सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं आवाहन

• प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन

आणि

• आयसीसी चँपियन्स करंडक स्पर्धेत भारताचे सामने युएईमध्ये घेण्याचा पाकिस्तानचा निर्णय

****

शासकीय कार्यालयं आणि विभागांमध्ये निवड झालेल्या ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झालेल्या रोजगार मेळाव्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान केली. रोजगार मेळाव्यांमुळे युवकांचं सक्षमीकरण होत असून, त्यांची क्षमता आणि कौशल्याचा उपयोग करुन घेणं, ही सरकारची प्राथमिकता असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. महारष्ट्रात नागपूर आणि पुणे इथं हे रोजगार मेळावे पार पडले. 

नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २५७ जणांना तर पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ५०० जणांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. 

****

देशातल्या नदी जोड प्रकल्पाचा उद्या २५ तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल पुण्यात ही माहिती दिली. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत, कृषी आर्थिक संशोधन केंद्राच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात चौहान बोलत होते. कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर कमी करून, नैसर्गिक शेतीवर भर देण्याचं आवाहन चौहान यांनी केलं.

दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राला या वर्षी अतिरिक्त १३ लाख घरं देण्यात येणार आहेत. शिवराजसिंह चौहान यांनी पुण्यात शेतकरी सन्मान दिनानिमित्त शेतकरी आणि ग्रामविकास लाभार्थी मेळाव्यात ही माहिती दिली. पुढील एका वर्षांत ही घर बांधून पूर्ण होणार असल्याचं चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले...

“महाराष्ट्र सरकार को छह लाख सैंतीस हजार नवासी मकान पहले मिले। और आज तेरह लाख उनतीस हजार छह सौ अठहत्तर मकान देने का काम किया जा रहा है। तो कुल मिलाके एक ही साल में उन्नीस लाख छयासठ हजार सात सौ सढसट मकान महाराष्ट्र को मिल रहे है। आज तक इतनी बडी संख्या में कभी किसी प्रदेश को गरीबों के लिये इतने मकान नही मिले।’’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळालेली ही अतिरिक्त घरं म्हणजे महाराष्ट्रासाठी मोठी भेट असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

****

परभणी हिंसाचार प्रकरणादरम्यान मृत झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांची काल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणीत इथं भेट घेऊन सांत्वन केलं. या प्रकरणी मुख्यमंत्र्यानी विधानसभेत केलेल्या विधानावर टीका करत, ज्या लोकांनी हे कृत्य केलं आहे, त्यांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

दरम्यान, आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची राहुल गांधी यांनी भेट घेऊन, त्यांचं सांत्वन केलं. 

****

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी काल बीड जिल्ह्यात मस्साजोग इथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी माध्यमांशी बोलतांना, या हत्याकांडात सहभागी सर्वांवर कडक कारवाई करण्याची सरकारची भूमिका असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं. ते म्हणाले...

‘‘संतोष देशमुखांच्या हत्येत राजकारण मध्ये आणू नका. आमची भूमिका स्पष्ट आहे की या संतोष देशमुखच्या हत्येत ज्यांचा ज्यांचा हात असेल, मग तो कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे. आणि ज्याचाही हात असेल, त्याला हे सरकार माफ करणार नाही असं मुख्यमंत्र्यांसहीत दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे.’’

उद्योगमंत्री उदय सामंत तसंच राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही काल देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. बोर्डीकर यांनी काल परभणी इथं सोमनाथ सूर्यवंशी तसंच विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.

****

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी येत्या २८ डिसेंबर रोजी बीड इथं मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी काल झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील गुन्हेगारी, तसंच जातीयवाद मोडीत काढण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

पाचवी तसंच सातवीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात टाकण्याचं धोरण केंद्र सरकारने रद्द केलं आहे. आता या विद्यार्थ्यांना मुख्य निकालानंतर दोन महिन्यात पुरवणी परीक्षा द्यावी लागेल, त्यातही अनुत्तीर्ण झाल्यास, पुढचं वर्ष त्याच वर्गाचा अभ्यास करावा लागणार आहे.

****

प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं काल निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. समांतर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे बेनेगल यांनी, अंकूर, मंथन, भूमिका, मंडी, सुरज का सातवा घोडा, सरदारी बेगम, जुबैदा, नेताजी सुभाषचंद्र बोस, वेल डन अब्बा, वेलकम टू सज्जनपूर आदी चित्रपटांसह भारत एक खोज आणि यात्रा या दूरदर्शन मालिकांचंही दिग्दर्शन केलं होतं. पाच वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणारे बेनेगल यांना, पद्मश्री आणि पद्मभूषण या नागरी सन्मानांसह चित्रपट सृष्टीतल्या सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं.  बेनेगल यांच्या निधनाबद्दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

****

आयसीसी चँपियन्स करंडक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामने, संयुक्त अरब अमिरात-युएईमध्ये होणार आहेत. सुरक्षाविषयक कारणांमुळे भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद-आयसीसीने भारताचा हा निर्णय मान्य केल्यामुळे पाकिस्ताननं हे सामने युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेचं वेळापत्रक निश्चित करण्याचा आयसीसीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

****

बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात देव दहिफळ इथं काल कुस्त्यांची दंगल पार पडली. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि पंजाब केसरी भोला ठाकूर यांची रोमहर्षक लढत या दंगलीचं मुख्य आकर्षण ठरली. या लढतीत सिकंदरनं भोलाला अवघ्या साडेतीन मिनिटात आसमान दाखवलं. पाच लाख रुपये पारितोषिकासह युवा केसरीचा बहुमान सिकंदरनं पटकावला. पैलवान सूरज शेख यानं मानाची चांदीची गदा पटकावली. स्पर्धेतल्या सर्व विजयी उमेदवारांना प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस देण्यात आलं.

****

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत 'वन नेशन-वन स्टुडन्ट आयडी' - अपार योजना राबवण्यात येत आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ७५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे काम पूर्ण झालं आहे. याबाबत आमचे वार्ताहर रमेश कदम यांनी अधिक माहिती दिली..

‘‘हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७५.६३% विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना “ऑटोमोटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री आयडी” अर्थात ‘अपारकार्ड’ दिले जाणार आहे. अपारकार्ड ही विद्यार्थ्यांसाठी नवीन ओळख देणारी प्रणाली आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना १२ अंकी क्रमांक असलेले कार्ड दिले जाणार आहे. अपारकार्ड प्रणाली एज्यूलॉकर सारखी असून त्यात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एकत्रित उपलब्ध असणार आहे.’’

आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.

****

माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी धाराशिवच्या लोकसेवा समितीच्या वतीनं दिले जाणारे "लोकसेवा पुरस्कार" जाहीर झाले आहेत. यात बीडच्या पसायदान सेवा प्रकल्पाचे गोवर्धन दराडे, जालन्याच्या प्रेरणादायी शिक्षण संकुलाचे रामकिसन सोळंके आणि धाराशिवच्या मीराताई मोटे यांचा समावेश आहे. धाराशिव इथं प्रमोद महाजन सभागृहात उद्या सकाळी ११ वाजता हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील.

****

लातूर इथं पहिल्या दोन दिवसीय अभिजात शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचं काल उद्घाटन झालं. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक संतोष पाठारे यांनी यावेळी बोलतांना, मराठवाडयात सिनेमा संस्कृती रुजण्यासाठी अशा लघुपट महोत्सवांची गरज व्यक्त केली. या फेस्टिव्हलला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

****

लहान बाळांची आधार नोंदणी करण्याचं काम शासनाकडून रेलटेल कार्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेला देण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालकांनी, सर्व अंगणवाडी मधून बालकाची आधार नोंदणी तात्काळ करून घेण्याचं आवाहन महिला आणि बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव यांनी केलं आहे.

****

शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षित दर मिळावा यासाठी धाराशिव जिल्ह्यात विशेष ग्रामसभांचं आयोजन करून ठराव घेण्याचा संकल्प आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केला आहे. एक जानेवारी रोजी या विशेष ग्रामसभा घेऊन राज्य सरकारकडे हा प्रस्ताव ठेवणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

****

प्रशासकीय कामकाजात ‘सुशासन’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलपणे काम करावं, असं आवाहन लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. सुशासन दिनानिमित्त काल जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. शासकीय अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करण्याची गरज जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

****

अजमेर इथल्या ऊर्ससाठी दक्षिण मध्य रेल्वे कडून नांदेड अजमेर नांदेड, हैदराबाद अजमेर हैदराबाद आणि काचीगुडा अजमेर काचीगुडा या तीन विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...