Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 24 December 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
ग्राहक व्यवहार विभाग, आज राष्ट्रीय ग्राहक दिनी, सार्वजनिक वापरासाठी 'जागो ग्राहक जागो ॲप', 'जागृती ॲप' आणि 'जागृती डॅशबोर्ड' चा प्रारंभ करणार आहे. ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक रोखणे आणि फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे हा या ॲपचा उद्देश आहे. जागो ग्राहक जागो ॲप ग्राहकांना ऑनलाइन व्यव्हारादरम्यान कोणतीही लिंक असुरक्षित असेल तर सावधगिरी बाळगण्यासाठी सतर्क करते. जागृती ॲप वापरकर्त्यांना बेकायदेशीर असलेल्या अनेक लिंक संबधीची तक्रार करण्यास सक्षम करते तसंच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधीकरणाकडे तक्रार म्हणून नोंद घेते.
****
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं भारतासोबत पत्रव्यव्हार केला आहे. भारताकडून अद्याप यासंबंधी कोणतेही उत्तर देण्यात आले नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे. ऑगस्टमध्ये शेख हसीना यांना बांगलादेशच्या पंतप्रधानपदावरून पदच्युत करण्यात आल्यापासून त्या भारतात राजकीय आश्रयास आहेत.
****
यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात १५ राज्यं आणि केंद्र सरकारच्या विविध ११ विभागांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. 'स्वर्णिम भारत-वारसा आणि विकास' ही यंदाच्या चित्ररथांची संकल्पना आहे. २०२४ च्या गेल्या प्रजासत्ताक दिनी संचलनात सहभाग झालेला असल्याने, महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा या सोहळ्यात असणार नाही. गेल्या संचलनात महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या संकल्पनेवर चित्ररथ सादर केला होता.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्ष शिथिलता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे आता महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त परीक्षा तसंच गट-क सेवा संयुक्त परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नव्याने अर्ज करता येणार आहे. सदर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यास विलंब झाल्याने, देण्यात आलेली ही सवलत फक्त एक वेळची विशेष बाब म्हणून लागू करण्यात आली आहे.
****
राज्यभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पाच पोलिस ठाण्यांना राज्य सरकारकडून दरवर्षी गौरवण्यात येतं. यंदा निवड झालेल्या पोलिस ठाण्यामध्ये कोल्हापूर इथलं शिवाजीनगर पोलिस ठाणं, नांदेड जिल्ह्यातलं देगलूर पोलिस ठाणं, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं वीरगाव पोलिस ठाणं, पिंपरी चिंचवड इथलं भोसरी पोलिस ठाणं, तसंच कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ पोलिस ठाण्याचा समावेश आहे. या पोलिस ठाण्यांना सन्मानचिन्ह आणि रोख बक्षीस प्रदान करण्यात येईल. तसंच राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे स्पर्धेत या पाच पोलिस ठाण्यांचा समावेश होणार आहे.
****
लातूर इथल्या बाळू डोंगरे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी डॉ प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंडे या दोघांना उत्तराखंडमधून अटक करण्यात आली आहे. बाळू डोंगरे यांची ११ डिसेंबरला जबर मारहाण आणि हत्या प्रकरणी गुन्हा दाखल होताच, हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. आरोपींना लातूर इथं आणल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं, लातूर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
****
चेन्नई इथं झालेल्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेत मुंबई विद्यापीठानं एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावलं आहे. २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारामध्ये दीपक पाटील याने सुवर्ण पदक तर ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारामध्ये हिबा चौगुले हिने रौप्यपदक मिळवलं. या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध नऊ राज्यातल्या ८० विद्यापीठांचे जलतरण संघ सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाच्या अकरा जलतरणपटूंच्या संघाची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
****
अकोला जिल्ह्यात काल २३ डिसेंबरपासून सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यास सुरुवात झाली. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीनं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. संभाव्य क्षयरुणांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथकं तयार करण्यात आली आहेत, या पथकांमध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक आणि आशा कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून आज सकाळी ६ वाजेपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. डाव्या कालव्यातून सुमारे दोन हजार घनफुट प्रतिसेकंद तर उजव्या कालव्यतून सातशे घनफुट प्रतिसेकंद पाणी सोडण्यात येत आहे. सध्या धरणात ९१ पुर्णांक ४ टक्के इतका पाणीसाठा आहे.
****
महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडीज संघात सुरू असलेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. गुजरातमध्ये बडोद्यात होणाऱ्या या सामन्याला दुपारी दीड वाजता प्रारंभ होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत एक सामना जिंकून भारतीय संघ आघाडीवर आहे. या मालिकेपूर्वी नवी मुंबईत दोन्ही संघात झालेली तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिकाही भारतीय महिला संघाने दोन-एकने जिंकली आहे.
****
No comments:
Post a Comment