Tuesday, 2 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.04.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 April 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ एप्रिल २०१९  सकाळी ७.१० मि.

****



Ø  शांतताप्रेमी हिंदूंचा दहशतवादाशी संबंध जोडून, बदनाम करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न - पंतप्रधानांची वर्ध्याच्या सभेत टीका

Ø  लोकसभा निवडणुकीनंतर सर्व विरोधी पक्षांची एक आघाडी होऊ शकते- काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी

Ø  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या रोजगारात वाढ

Ø  येत्या आठवड्यात राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता - हवामान खात्याचा अंदाज

 आणि

Ø  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक इच्छूक उमेदवारांचे अर्ज दाखल; पुण्यातून काँग्रेसची मोहन जोशी यांना उमेदवारी

****



 शांतताप्रेमी हिंदूंचा दहशतवादाशी संबंध जोडून, हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधानांनी काल वर्धा इथून, महाराष्ट्रातल्या भाजपच्या निवडणूक प्रचार मोहिमेला प्रारंभ केला. घराणेशाही, भ्रष्टाचार, आदी मुद्यांवरूनही त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार वाऱ्याची दिशा अचूक ओळखतात, त्यामुळेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं मोदी म्हणाले. पवार यांच्या कार्यकाळात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मोदी यांनी केला.



 दरम्यान, काँग्रेस पक्षानं, मोदी यांचा हा आरोप खोटा असल्याचं म्हटलं आहे, वरिष्ठ भाजप नेते, तत्कालीन गृहसचिव आर के सिंह यांनी हिंदू दहशतवाद या शब्दाचा सर्वप्रथम वापर केल्याचं, काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी सांगितलं.

****



 देशहिताच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याकरता सर्व विरोधी पक्ष एक झाले आहेत, त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर सर्व पक्ष एकत्रित येऊन मतदानोत्तर एक आघाडी करू शकतात, असं काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी म्हटलं आहे.



 सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करणं, लोकशाही आणि संविधान वाचवणं  या कामाला सर्वाधिक प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय संस्था आणि सामाजिक रचना उद्ध्वस्त करण्यापासून भाजपला रोखणं, विकास आणि अर्थव्यवस्थेला गती देणं, रोजगार निर्मिती, सामाजिक सौहार्द निर्माण करणं तसंच अन्याय आणि असमानतेच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र आले असल्याचं गांधी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

****



 काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या विरूद्ध केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून भारतीय धर्म जन सेनेचे तुषार वेल्लाप्पल्ली हे उमेदवार असतील, अशी घोषणा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. केरळमध्ये भाजप आणि भारतीय धर्म जन सेनेची आघाडी आहे.

****



 लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत येत्या गुरूवारी संपत आहे, त्यामुळे संबंधित मतदार संघात, काल अनेक ठिकाणी इच्छूक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. 



 औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड, अपक्ष म्हणून संगीता निर्मळ, बहुजन महा पार्टीच्या वतीनं शेख नदीम शेख करिम,  अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे, तर माढा लोकसभा मतदार संघातून रणजित नाईक निंबाळकर, रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदार संघातून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नीलेश राणे, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे धनंजय महाडिक, शिवसेना-भाजप युतीचे संजय मंडलिक, वंचित बहुजन आघाडीच्या अरुणा माळी यांनी तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शिवसेना भाजप युतीचे धैर्यशील माने, आणि वंचित बहुजन आघाडीचे असलम सय्यद यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. जालना लोकसभा मतदार संघातून अखिल भारतीय सेनेचे गणेश चांदोडे तर शहादेव पालवे यांनी अपक्ष म्हणून, अर्ज दाखल केला आहे. सातारा लोकसभा मतदार संघात बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, वंचित बहुजन आघाडीचे सहदेव येवले आणि एका अपक्ष उमेदवारानं काल अर्ज दाखल केले.



 दरम्यान, काल काँग्रेसनं आणखी नऊ उमेदवारांची एक यादी जाहीर केली. यामध्ये पुणे मतदार संघातून मोहन जोशी यांना तर रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****



 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या रोजगारात १ एप्रिलपासून दरवाढ करण्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या प्रस्तावास निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत देण्यात येणारा रोजगार हा कृषी कामगारांच्या ग्राहक मूल्य निर्देशांकाशी संलग्न असून दरवर्षी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, १ एप्रिल रोजी त्याचे नवे दर जाहीर केले जातात. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे ग्रामविकास मंत्रालयानं हे दर जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे दर असल्यामुळे ही दरवाढही वेगवेगळी आहे. सध्याच्या दराच्या तुलनेत ही दरवाढ पाच टक्के आणि त्यापेक्षा अधिक आहे.

****



 येत्या आठवड्यात राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नागपूरच्या हवामान केंद्रानं वर्तवली आहे. मराठवाड्यात चार दिवस तर विदर्भात पाच दिवस ही उष्णतेची लाट राहील. काल राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यात ४३ पूर्णांक ४ डिग्री सेल्सीअंश इतकं नोंदवलं गेलं.



 दरम्यान, मध्य भारतात यंदा एप्रिल ते जून या काळात, नेहमीपेक्षा अर्धा अंश सेल्सियस अधिक तापमान राहील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. या भागात पुढचे तीन महिने तापमापकाचा पारा कमाल चव्वेचाळीस अंशांपर्यंत वाढू शकतो, अशी शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 नांदेड लोकसभा मतदार संघात दोन उमेदवारांना पेड न्यूज प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी नोटीसा बजावल्या आहेत. अपक्ष उमेदवार डॉ महेश तळेगावकर यांच्यासंदर्भात दैनिक श्रमिक एकजूट आणि दैनिक नांदेड एकजूट या वृत्तपत्रातून प्रसारीत झालेल्या बातम्यांवरून तसंच दैनिक पुढारी या दैनिकात अपक्ष उमेदवार अशोक चव्हाण यांच्या नावापुढे लोहा असा उल्लेख आल्यानं उमेदवाराची वेगळी ओळख प्रदर्शित झाली. त्यामुळे त्या पेडन्युजच्या व्याख्येत येत असल्याच्या कारणाने दोघाही उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे.

****



 लातूर लोकसभा मतदार संघातली लढत ही तिरंगी होणार आहे. भाजपा सेना युतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे आणि काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार मच्छींद्र कांमत हे दोघे करोडपती उमेदवार आहेत, वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राम गारकर त्यांच्याशी झुंज देत आहेत. या तिन्ही उमेदवारांनी आपले संपत्तीविषयक विवरण निवडणूक विभागाला सादर केलं आहे.  अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर..


         भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या परिवाराकडे साडे अठ्ठावीस कोटींची मालमत्ता आहे.तर काँग्रेसचे उमेदवार मच्छींद्र कामत यांच्याकडे अकरा कोटी रूपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार जे निवृत्त शासकीय अधिकारी आहेत राम गारकर यांच्याकडे मात्र अवघे ७९ लाख अठ्याहत्तर हजार आठशे तेहतीस रूपये आहेत. स्वत:च्या मालकिची एक दुचाकी आणि एक स्विफ्ट कार वाहन आहे. आणि या दोघांचा जर विचार केला तर श्रृंगारे आणि मच्छींद्र कामत हे दोघं उद्योजक आहेत त्यामुळे होणारी लढाई ही कोट्याधीशांमधली होणार आहे.

****



 बीड लोकसभा मतदार संघातल्या शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपासंदर्भात आपणच निवडणूक आयोगाकडं सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या काल बीडमध्ये वार्ताहरांशी बोलत होत्या. तर खासदारकीचा निधी आपण जिल्ह्याच्या विकास कामांसाठी खर्च केला असून राज्य आणि केंद्र सरकारच्या देखील विविध योजनांचा निधीही जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर आणला असल्याचा दावा यावेळी डॉक्टर प्रितम मुंडे यांनी केला.

****



 राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनीही प्रचारात आघाडी घेतली असून ते मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करण्यावर भर देत आहेत. दरम्यान, सोनवणे यांना जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षानं पाठिंबा दिला आहे. पक्षाचे राज्य समन्वयक अॅड.विशाल कदम यांनी ही माहीती दिली.

****



 परभणी मतदार संघाचा प्रचाराला गती येत आहे. याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून


 परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव यांनी जिंतूर, सेलू इथं शिवेसना भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन प्रचाराचा प्रारंभ केला. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय विटेकर यांनी काल परभणी तालुक्यातील गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला.वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर मोहम्मद खान यांनी पालम, गंगाखेड शहराला भेट देवून मतदारांशी हितगुज साधले. हळुहळु सर्व उमेदवारांच्या प्रचाराला वेग येत असल्याचे दिसून येते.

****



 लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक एन. आर.  पाटील आणि चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिशन तेलंग यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी आमदार विनायकराव पाटील उपस्थित होते.

****



 बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातल्या चिंचाळा तांडा इथं पाण्याचे ड्रम भरून ठेवलेली बैलगाडी उलटून दोन लहान मुले चिरडून ठार झाली. काल ही घटना घडली. पाण्याचे ड्रम भरून ठेवलेल्या या बैलगाडीखाली ही मुलं खेळत असतांना बैलगाडीला लटकल्यामुळं बैलगाडी उलटून ही घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

*****

*** 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...