Sunday, 21 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.04.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 April 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ एप्रिल २०१९ दुपारी १.०० वा.

****



 श्रीलंकेची राजधानी कोलंबो इथं आज ईस्टर संडेला दहशतवाद्यांनी घडवलेल्या आठ भीषण साखळी बॉम्बस्फोटांतील मृतांचा आकडा १०५ वर गेला असून, सुमारे ३८० नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे.



 अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसून, २००९ मध्ये लिबरेशन ऑफ तमिळ टायगर्स-लिट्टे या संघटनेचा बिमोड करण्यात आल्यानंतर हा पहिलाच मोठा अतिरेकी हल्ला आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी तत्काळ आपत्कालीन बैठक बोलावली असून, देशभरात हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे.



 आपण सातत्यानं कोलंबोतील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात असून, सरकार परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी द्विटर संदेशात म्हटलं आहे. श्रीलंकेतील भारतीय नागरिकांसाठी तेथील दूतावासानं हेल्पलाईन क्रमांकही जाहीर केले आहेत.

****



 छत्तीसगडमधील बिजापूर इथं आज सकाळी शोधमोहीम सुरू असताना सुरक्षा दलांची जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांशी चकमक उडाली. नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरात दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं. पामेड परिसरात झालेल्या या चकमकीनंतर नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

****



 प्रामाणिकपणे मेहनत घेऊन देशाची सेवा करणाऱ्या सर्व नोकरदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. श्रम करणाऱ्यांमुळेच देशाचा विकास होतो, असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. या संदर्भात पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशासाठी एक मजबूत प्रशासकीय रूपरेषा तयार करण्यासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली.

****



 बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर इथं राज्य वस्तू व सेवा कर कार्यालयानं केलेल्या ई-वे बिल तपासाच्या कारवाईतून १९ लाखांचा महसूल जमा झाला आहे. अमरावती विभागाच्या राज्यकर सह आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तीनशे माल वाहनांची तपासणी करण्यात आली होती.

****



 बुलढाणा जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांचा भत्ता कॅशलेस पद्धतीनं दिला जाणार आहे. हा भत्ता थेट पोलिसांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचं पोलिस प्रशासनानं कळवलं आहे.



 बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी सुमारे नऊ हजार कर्मचारी आणि दोन हजार पोलिस, अशी अकरा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची यंत्रणा कामाला लागली होती.

****



 परिवर्तन संस्थेतर्फे आयोजित शेक्सपिअर महोत्सवात आज ‘हॅम्लेट’ या मराठी नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि नाटककार प्रशांत दळवी यांच्याशी अजित दळवी आणि दासू वैद्य मुक्त संवाद साधणार आहेत. यावेळी शेक्सपिअरच्या ‘मच ऍडो अबाउट नथिंग’ या नाटकाचा संपादित प्रवेशही ज्ञानदा इंग्लिश स्कुलचे विद्यार्थी सादर करणार आहेत.



 आज संध्याकाळी सहा वाजता सरस्वती भुवनच्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

****



 संतोष चषक फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीतला सामना आज लुधियाना इथं सेनादल आणि पंजाब संघांमध्ये खेळवला जाणार आहे. आतापर्यंत आठ वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या पंजाबनं उपांत्यफेरीत पाचवेळा विजेतेपद भूषवलेल्या गोवा संघाचा १-२ नं पराभव केला, तर सेनादल संघानं पेनल्टी शूटआऊटवर कर्नाटकचा ४-३ नं पराभव केला. अंतिम सामन्यांचं धावतं समालोचन आज आकाशवाणीवरून दुपारी ३ वाजून २५ मिनिटांपासून ऐकता येईल. एफ.एम.रेन्बो नेटवर्क आणि नॅशनल हुक-ॲपवरही हा सामना ऐकता येणार आहे.

****



 आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेला आज कतारची राजधानी दोहा इथं सुरवात होत आहे. आज आठ सुवर्ण पदकांसाठी स्पर्धा होतील. या स्पर्धेत भारतासाठी चारशे मीटर धावण्याची स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे. या स्पर्धेत हिमा दास भारताचं नेतृत्व करणार आहे. २०१७ मध्ये भुवनेश्वर इथं झालेल्या या स्पर्धेत भारत प्रथम, तर चीन दुसऱ्या स्थानावर होता.

*****

***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

                        **** नवी दिल्लीत जंतर - मंतरचे बंद दरवाजे ओलांडून परिसरात प्रवेश केल्याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे ...