Sunday, 21 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.04.2019 20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 April 2019

Time 20.00 to 20.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ एप्रिल २०१९ - २०.००

****

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातला प्रचार आज संपला. १३ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतल्या ११६ मतदारसंघांत या टप्प्यात निवडणूक होत आहे. यामध्ये राज्यातल्या औरंगाबाद, जालना, रावेर, जळगाव, अहमदनगर, पुणे, बारामती, माढा, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड या चौदा मतदार संघांत परवा मंगळवारी मतदान होणार आहे.

****

प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे औरंगाबाद शहरात आज शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ क्रांती चौकातून सकाळी दुचाकी फेरी काढण्यात आली, तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या प्रचारासाठी शहरभर ५०० ट्रॅक्टरची फेरी काढण्यात आली. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सुभाष झांबड यांच्या प्रचारार्थ खुलताबाद मध्ये सकाळी वाहन रॅली काढण्यात आली, तर एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आमदारकीच्या काळात केलेल्या कामांविषयी दुपारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी आपला जाहीरनामाही प्रसिद्ध केला.

****

काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी म्हणजे, मेंढ्यांच्या रक्षणाची जबाबदारी लांडग्यावर टाकण्यासारखे आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सांगली लोकसभा मतदार संघात भाजपा उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचार सभेत ते आज  बोलत होते. या सभेत शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे देखील उपस्थित होते.

****

सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातल्या २५ लाख मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढवावा, असं आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केलं. साताऱ्यात एकूण १८ लाख, ३९ हजार मतदार असून, त्यासाठी दोन हजार, २९६ मतदान केंद्रं तयार करण्यात आली आहेत. ३०१ मतदान केंद्रांवर लाइव्ह वेबकास्टींगच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

****

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ९१५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यात एकूण सहा लाख ६६ हजार, ७२० मतदार निश्चित झाले आहेत. मतदान प्रक्रियेसाठी १२७ विभागीय अधिकारी आणि पाच हजार, तीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकही मतदान केंद्र संवेदनशील नसलं, तरी सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. राजकीय वाद उफाळून येऊ नयेत, यासाठी राजकीय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तीनशेहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, तर ४२ जणांवर हद्दपारीच्या कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आज शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते धनंजय मुंडे यांनी पाथर्डी इथं सभा घेतली. या सभेला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, आदी उपस्थित होते.

****

जालना लोकसभा मतदार संघातले भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी जेष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी अंबड तालुक्यातल्या जामखेड इथं जाहीर सभा घेतली. काँग्रेसनं सत्तर वर्षात जे केले नाही, ते भाजपा सरकानं पाच वर्षात करून दाखवंलं, असा दावा त्यांनी यावेळी बोलतांना केला.

****

कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघातलाही प्रचार आज संपला.

मंगळवारच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली असल्याचं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितलं. या दोन्ही मतदारसंघात १२ हजार, ४७४ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात येणार आहे तर चार हजार, चार मतदान केंद्रांवर हे मतदान घेतलं जाईल. यापैकी ७१ मतदान केंद्र संवेदनक्षम ठरवण्यात आली आहेत, असं ते म्हणाले. याचबरोबर तेरा मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र असणार आहेत, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

रायगड लोकसभा मतदारसंघातलाही प्रचार आज संपला. आज शेवटच्या दिवशी सर्व उमेदवारांनी आपापल्या परीनं जोरदार प्रचार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, यांनी आज प्रचार केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी देखील महाडला सभा घेतली.

****

बुलडाणा लोकसभा मतदारसंघातल्या डोणगांव इथल्या मतदान केंद्र क्रमांक १२० वर २४ एप्रिल रोजी फेरमतदान घेण्यात येणार आहे. या केंद्रावर १८ एप्रिलला मतदान पथकानं चाचणी मतदान केल्यानंतर हे मतदान काढून टाकलं नाही, काही मतदान झाल्यानंतर ही बाब लक्षात आली, त्यानंतर हे संपूर्ण मतदान काढण्यात आलं, त्यामुळे या मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी सांगितलं.

****

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात परवा होणाऱ्या मतदानासाठी सर्व तयारी झाली असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी सांगितलं. ते आज जळगाव इथं वार्ताहरांशी बोलत होते. जळगांव लोकसभा मतदार संघात १९ लाख, २५ हजार, ३५२ मतदार आहे तर रावेर लोकसभा मतदार संघात १७ लाख, ७३ हजार, १०७ मतदार आहे. त्यासाठी जिल्ह्यात तीन हजार ६०७ मतदान केंद्रं तयार करण्यात आली असल्याची माहितीही डॉ.ढाकणे यांनी यावेळी दिली.

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 14 October 2026 Time 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...