Sunday, 21 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.04.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 April 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ एप्रिल २०१९ सायंकाळी ६.००

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. निष्पाप लोकांवरील अशा हिंसेला, सभ्य समाजात कोणतीही जागा नाही. या दु:खाच्या वेळी भारत श्रीलंकेच्या सोबत आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. तर पंतप्रधानांनीही शोकग्रस्त कुटुंबं आणि जखमींसाठी प्रार्थना केली आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातला प्रचार आज संपला. १३ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतल्या ११५ मतदारसंघांत या टप्प्यात निवडणूक होत आहे. यामध्ये राज्यातल्या औरंगाबाद, जालना, रावेर, जळगाव, अहमदनगर, पुणे, बारामती, माढा, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड या चौदा मतदार संघांत मंगळवारी मतदान होणार आहे.

****

प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे औरंगाबाद शहरात आज शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ क्रांती चौकातून सकाळी दुचाकी फेरी काढण्यात आली, तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या प्रचारासाठी शहरभर ५०० ट्रॅक्टरची फेरी काढण्यात आली. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सुभाष झांबड यांच्या प्रचारार्थ खुलताबाद मध्ये सकाळी वाहन रॅली काढण्यात आली, तर एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आमदारकीच्या काळात केलेल्या कामांविषयी दुपारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

****

काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी म्हणजे, मेंढयांच्या रक्षणाची जबाबदारी लांडग्यावर टाकण्यासारखे आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सांगली लोकसभा मतदार संघात भाजपा उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. या सभेत शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे देखील उपस्थित होते.

****

सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातील २५ लाख मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढवावा, असं आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केलं. साताऱ्यात एकूण १८ लाख ३९ हजार मतदार असून, त्यासाठी दोन हजार २९६ मतदान केंद्रं तयार करण्यात आली आहेत. ३०१ मतदान केंद्रांवर लाइव्ह वेबकास्टींगच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

****

रायगडमध्येही मंगळवारी मतदान होत असून, आघाडीचे सुनील तटकरे आणि युतीचे अनंत गिते यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात आहेत.

****

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ९१५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यात एकूण सहा लाख ६६ हजार ७२० मतदार निश्चित झाले आहेत. मतदान प्रक्रियेसाठी १२७ विभागीय अधिकारी आणि पाच हजार तीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकही मतदान केंद्र संवेदनशील नसलं, तरी सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. राजकीय वाद उफाळून येऊ नयेत, यासाठी राजकीय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तीनशेहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, तर ४२ जणांवर हद्दपारीच्या कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचं आज निधन झालं. ते ८७ वर्षाचे होते. १९४७ साली झालेल्या रझाकार विरोधी चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. जनता दलाच्या तिकिटावर नगर-नेवासा मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती. माधवराव मुळे यांच्या पार्थिवावर सायंकाळी अमरधाम इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

औरंगाबाद शहरातल्या मिसारवाडी भागात १३ वर्षीय मुलीची विक्री करुन, तिचा बालविवाह लावून देणे आणि अमानुष छळ करणे, या प्रकरणी विशेष न्यायालयानं आरोपी संजय अग्रवाल याला दहा वर्षं सक्त मजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसंच, त्याचे साथीदार आशा अग्रवाल, दिपा अग्रवाल, सागर अग्रवाल आणि शरद उर्फ अतुल अग्रवाल या चार आरोपींना ५ वर्षं सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात अन्य सात आरोपींची निर्दोष मुक्ताता करण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 14 October 2026 Time 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...