Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 22 April 2019
Time 7.10 AM to
7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ एप्रिल २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v लोकसभा
निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातलं उद्या
मतदान; राज्यातल्या १४ मतदारसंघात २४९ उमेदवार अजमावताहेत आपलं भवितव्य
v मतदानासाठी सर्व मतदारसंघातली प्रशासन यंत्रणा सज्ज
v औरंगाबाद शहरातल्या १३ वर्षाच्या मुलीची विक्री करुन, बालविवाह लावणाऱ्या
आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरीची
शिक्षा
आणि
v दोन वेगवेगळ्या अपघातात सहा जण ठार
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातलं उद्या मतदान होत आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची काल सांगता
झाली. १३ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतल्या
११६ मतदारसंघांत या टप्प्यात निवडणूक होत आहे. यामध्ये राज्यातल्या औरंगाबाद, जालना,
रावेर, जळगाव, अहमदनगर, पुणे, बारामती, माढा, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले,
रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड या चौदा मतदार संघांत उद्या
मतदान होणार आहे. या सर्व
मतदारसंघांमध्ये एकूण २४९ उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत.
****
प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं काल, औरंगाबाद शहरात
शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ क्रांती
चौकातून सकाळी दुचाकी फेरी काढण्यात आली, तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या
प्रचारासाठी शहरभर ट्रॅक्टर्सची फेरी काढण्यात
आली. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचारार्थ
खुलताबादमध्ये वाहन रॅली काढण्यात आली, झांबड यांनी आपल्याला मतदारांचा
मोठा प्रतिसाद असल्याचा दावा वार्ताहरांशी बोलतांना केला. एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी
मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. जलील यांनी आमदारकीच्या काळात केलेल्या कामांविषयीही पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्याचबरोबर
त्यांनी यावेळी आपला
जाहीरनामाही प्रसिद्ध केला.
****
काँग्रेस आणि राष्ट्रवादी
कॉंग्रेसबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी म्हणजे, मेंढ्यांच्या रक्षणाची जबाबदारी
लांडग्यावर टाकण्यासारखे आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सांगली
लोकसभा मतदार संघात भाजपा उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचार सभेत ते काल बोलत होते. या सभेत शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी
भिडे हे देखील उपस्थित होते.
****
अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये
काल शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष
मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप
यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते धनंजय मुंडे यांनी पाथर्डी इथं सभा
घेतली. या सभेला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे,
आदी उपस्थित होते.
****
जालना लोकसभा मतदार संघातले भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार
रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी जेष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी अंबड तालुक्यातल्या
जामखेड इथं जाहीर सभा घेतली. काँग्रेसनं सत्तर वर्षात जे केले नाही, ते भाजपा सरकानं
पाच वर्षात करून दाखवंलं, असा दावा त्यांनी यावेळी बोलतांना केला.
****
दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे
उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारार्थ
चेंबूर इथं काल पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची
जाहीर सभा झाली. राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारनं मुंबईचा विकास आराखडा दोनदा बदलून
दहा हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत
कॉंग्रेस सत्तेत आल्यास विकास आराखड्यासह फडणवीस सरकारच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी होईल असं चव्हाण यावेळी म्हणाले.
****
रायगड लोकसभा मतदारसंघातलाही प्रचार काल संपला. काल
शेवटच्या दिवशी सर्व उमेदवारांनी आपापल्या परीनं जोरदार प्रचार केला. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे,
यांनी काल प्रचार केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी देखील महाडला
सभा घेतली.
****
दक्षिण-मुंबई लोकसभा मतदार संघातले काँग्रेसचे उमेदवार
मिलिंद देवरा यांच्याविरुध्द निवडणूक आयोगानं काल, आचारसंहिता भंग केल्याबद्दल गुन्हा
नोंदवला आहे. गेल्या चार एप्रिल रोजी मुंबईच्या झवेरी बाजार परिसरात
प्रचारादरम्यान देवरांनी शिवसेनेनं पूर्वी जैन समाजाच्या भावना दुखावल्याचं सांगून शिवसेनेला मत न देण्याचं आवाहन केलं होतं.याप्रकरणी शिवसेना समर्थकांनी आठ एप्रिलला
निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
****
भारतीय जनता पक्षानं काल लोकसभा निवडणुकीसाठी, सात
उमेदवार जाहीर केले. केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांना चांदणी चौक इथून तर मनोज
तिवारी उत्तर-पूर्व दिल्लीतून, यासह प्रवेश वर्मा पश्विम दिल्ली तर रमेश बिधुरी यांना
दक्षिण दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे. पंजाबमधल्या अमृतसरमधून हरदीप पुरी तर, मध्य प्रदेशच्या इंदूर मतदारसंघातून शंकर
लालवाणी उमेदवार असतील. उत्तर प्रदेशच्या घोशी मतदारंघात हरी नारायण राजभर भाजपाचे
उमेदवार आहेत.
काँग्रेसनही काल लोकसभेसाठी हरियाणातल्या पाच मतदारसंघातले
आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सोनीपतमधून ज्येष्ठ नेते- माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग
हुड्डा, फरीदाबादमधून अवतारसिंग भदाणा यांना उमेदवारी दिली आहे. तर, कुरुक्षेत्र –निर्मलसिंग,
कर्नालमधून कुलदीप शर्मा आणि हिस्सारमधून भाव्या बिष्णोई यांना उमेदवारी जाहीर झाली
आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातल्या २५ लाख मतदारांनी
मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढवावा, असं आवाहन जिल्हा निवडणूक
निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी काल केलं. साताऱ्यात एकूण १८ लाख, ३९ हजार मतदार
असून, त्यासाठी दोन हजार, २९६ मतदान केंद्रं तयार करण्यात आली आहेत.
****
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात, सिंधुदुर्ग
जिल्ह्यात एकूण ९१५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यात एकूण सहा लाख ६६ हजार, ७२०
मतदार निश्चित झाले आहेत. मतदान प्रक्रियेसाठी १२७ विभागीय अधिकारी आणि पाच हजार, तीस
कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकही मतदान केंद्र संवेदनशील नसलं, तरी
सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे.
****
कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघातलाही
प्रचार काल संपला. मंगळवारच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली
असल्याचं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितलं. या दोन्ही मतदारसंघात १२ हजार, ४७४
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात येणार आहे तर चार हजार, चार मतदान केंद्रांवर
हे मतदान घेतलं जाईल. यापैकी ७१ मतदान केंद्र संवेदनक्षम ठरवण्यात आली आहेत, असं ते
म्हणाले. याचबरोबर तेरा मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र असणार आहेत, असं जिल्हाधिकाऱ्यांनी
सांगितलं.
****
बुलडाणा लोकसभा मतदारसंघातल्या डोणगांव इथल्या मतदान
केंद्र क्रमांक १२० वर येत्या २४ एप्रिल रोजी फेरमतदान घेण्यात येणार आहे. या केंद्रावर
१८ एप्रिलला मतदान पथकानं चाचणी मतदान केल्यानंतर ते मतदान काढून टाकलं नाही, काही
मतदान झाल्यानंतर ही बाब लक्षात आली, त्यानंतर हे संपूर्ण मतदान काढण्यात आलं, त्यामुळे
या मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं जिल्हा निवडणूक
निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी सांगितलं.
****
जळगाव
आणि रावेर लोकसभा मतदार संघात उद्या होणाऱ्या मतदानासाठी सर्व तयारी झाली असल्याचं
जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर.अविनाश ढाकणे यांनी सांगितलं. ते काल जळगाव इथं वार्ताहरांशी
बोलत होते. जळगांव लोकसभा मतदार संघात १९ लाख, २५ हजार, ३५२ मतदार आहे तर रावेर लोकसभा
मतदार संघात १७ लाख, ७३ हजार, १०७ मतदार आहे. त्यासाठी जिल्ह्यात तीन हजार ६०७ मतदान
केंद्रं तयार करण्यात आली असल्याची माहितीही डॉक्टर.ढाकणे यांनी यावेळी दिली.
****
औरंगाबाद शहरातल्या मिसारवाडी भागात १३ वर्षीय मुलीची
विक्री करुन, तिचा बालविवाह लावून देणे आणि अमानुष छळ करणे, या प्रकरणी विशेष न्यायालयानं
आरोपी संजय अग्रवाल याला दहा वर्षं सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली
आहे. तसंच, त्याचे साथीदार आशा अग्रवाल, दिपा अग्रवाल, सागर अग्रवाल आणि शरद उर्फ अतुल
अग्रवाल या चार आरोपींना ५ वर्षं सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात
अन्य सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
****
पुणे जिल्ह्यात शिरुर नजिक अहमदनगर -पुणे महामार्गावर
उभ्या असलेल्या कंटेनरला मोटारीनं धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात चार जण ठार तर दोन
जण गंभीर झाले आहेत. अपघातग्रस्त मोटार पुण्याकडे जात असतांना काल पहाटे ही दुर्घटना
झाली. यामध्ये मोटारीमधील नवजात बालकासह एकाच कुटुंबाततले चौघे जण जागीच ठार झाले.
ठार झालेलं कुटुंब नांदेड जिल्ह्यातलं रहिवाशी होतं.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात सोलापूर - हैदराबाद महामार्गावर
काल एका मोटारीचे टायर फुटल्यानं गाडीतल्या सिलेंडरचा स्फोट होऊन दोन जणांचा होरपळून
मृत्यू झाला तर एक जण भाजला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. उमरगा तालुक्यातल्या तलमोडजवळ
ही घटना घडली. हे तिघेजण पुण्याहून तलमोडी इथं यात्रेसाठी आले होते.
****
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे
माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचं काल निधन झालं. ते ८७ वर्षाचे होते. १९४७ साली झालेल्या
रझाकार विरोधी चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे
संचालक, पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या पार्थिवावर
काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
*****
***
No comments:
Post a Comment