Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23
April 2019
Time 20.00
to 20.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ एप्रिल २०१९ - २०.००
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज काही किरकोळ अपवाद वगळता, शांततेत
मतदान झालं. सायंकाळी पाच वाजे पर्यंत पश्चिम बंगालमध्ये ७९ टक्के, कर्नाटकात ६२, गुजराथ
५७, आसाम ७१, छत्तीसगड ६४ उत्तरप्रदेशात ६६ टक्के तर बिहारमध्ये ५५ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. महाराष्ट्रातल्या चौदा
मतदारसंघांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी सत्तावन्न टक्के मतदान झालं.
कोल्हापूर मतदार संघात सर्वाधिक सुमारे ६६ टक्के, हातकणंगले मतदार संघात त्याखालोखाल
सुमारे ६५ टक्के तर पुणे मतदार संघात सर्वात कमी ४३ टक्के मतदान नोंदवलं गेलं.
जळगाव मतदार संघात ५२ टक्के, रावेर ५७ टक्के, बारामती ५६, अहमदनगर ५८, माढा
५६, सांगली एकोणसाठ, सातारा ५५, रायगड ५६, तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात सायंकाळी
पाचवाजेपर्यंत ५७ टक्के मतदान झालं.
औरंगाबाद मतदार संघात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ६१ पूर्णांक ८७ शतांश टक्के
मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. या मतदार संघातल्या १८ गावांनी
मतदानावर बहिष्कार टाकला होता, त्यापैकी १७ गावातल्या ग्रामस्थांशी प्रशासनानं चर्चा
केल्यानंतर, या गावांनी बहिष्कार मागे घेतला. मात्र गंगापूर तालुक्यातल्या शरीफपूरवाडी
इथल्या ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी पुकारलेला बहिष्कार, कायम राहिल्याचं, जिल्हाधिकाऱ्यांनी
सांगितलं.
एका अज्ञात मतदाराने मतदान कक्षामध्ये मोबाईलद्वारे चित्रीकरण
करुन ते टिकटॉक या मोबाईल ॲप्लीकेशनच्या आधारे सोशल मीडीयावर व्हायरल केल्याचा प्रकार,
औरंगाबाद इथे निदर्शनास आला. या प्रकरणी सायबर पोलीस विभागाने अज्ञात व्यक्तीविरोधात
गुन्हा दाखल केला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील खेडकेश्वर इथं एका
मतदारानं मतदान करतांना, आपल्या मोबाईलवर मतदान यंत्राचा फोटो घेतला. ही कृती, लोकप्रतिनिधी
कायद्याचं उल्लंघन ठरत असल्यामुळे, अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मतदार संघातल्या मतदानाबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे
वार्ताहर
जालना लोकसभा मतदारसंघात
सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला शांततेत सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत
मतदार संघात एकोणसाठ पाईंट चौंसष्ट इतकी मतदानाची टक्केवारी नोंदवली गेली. जिल्ह्यात
शांततेत मतदान पार पडले. आकाशवाणी बातम्यांसाठी,
बाबासाहेब म्हस्के, जालना.
****
अहमदनगर लोकसभा मतदार संघात
आज मतदान यंत्र फोडण्याचा प्रयत्न एका मतदाराने केला. बाबुर्डी बेंद इथं ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी
त्याला ताब्यात घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड लोकसभा मतदार संघातल्या भाजप शिवसेना रिपाई महायुतीच्या उमेदवार प्रीतम
मुंडे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांना
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी नोटीस बजावली आहे. वृत्तपत्रं
आणि प्रसारमाध्यमांद्वारे केलेल्या प्रचारादरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे
उल्लंघन केल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात डोणगाव
इथल्या एका मतदान केंद्रावर उद्या २४ एप्रिलला फेरमतदान होत आहे. या केंद्रावर निवडणुकीच्या
दुसऱ्या टप्प्यात अठरा एप्रिलला मतदान घेण्यात आलं होतं. मात्र, मतदान यंत्रात नोंदवलेलं
मतदान केंद्रावरच्या अधिकाऱ्यांनी डिलीट केल्यामुळे, हे फेरमतदान घ्यावं लागत आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी त्या
मतदार केंद्रावर असलेल्या चार कर्मचाऱ्यांना आज निलंबित करुन, त्यांच्या विभागीय चौकशीचे
आदेश दिले आहेत.
****
रायगड मतदार संघात रोहा इथं,
एका पोलिंग एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी
डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले. या मतदान केंद्रावर पोलिंग एजंट मतदारांच्या बोटाला
शाई लावत असल्याची तक्रार आली होती, या केंद्रावरचे सर्व कर्मचारी तत्काळ बदलण्यात आले. मतदान
केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्याविरोधात हलगर्जीपणा दाखवल्याप्रकरणी कारवाई
प्रस्तावित करण्यात आली आहे.
****
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची हाताळणी ही चिंतेची बाब असल्याचं राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत काँग्रेस, राष्ट्रवादी
काँग्रेस महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रत्येक मतदार संघातल्या
किमान पन्नास टक्के, व्ही व्ही पॅट यंत्रातल्या मतदानाच्या पावत्या, पडताळून पाहण्याची
मागणी आपण पुन्हा करणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री तसंचं
तेलगु देशम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू या पत्रकार परिषदेला उपस्थित होते,
मतदान यंत्रातल्या त्रुटींची शक्यता लक्षात घेता, मतदान यंत्राद्वारे मतदान घेणं, असुरक्षित
असल्याचा आरोप त्यांनी केला.
****
भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना हे चारही पक्ष केवळ लोकांना
दाखवण्यासाठी वेगवेगळे लढत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते विधिज्ञ प्रकाश
आंबेडकर यांनी केला आहे. धुळे मतदार संघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहमद
यांच्या प्रचार सभेत ते आज बोलत होते. प्रस्थापित पक्षांनी लोकशाहीची कुटुंबशाही केली
त्यामुळे समाजातले वंचित घटक सत्तेपासून दूर गेल्याचं आंबेडकर यांनी यावेळी नमूद केलं.
****
No comments:
Post a Comment