Tuesday, 23 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.04.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 April 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ एप्रिल २०१९ सायंकाळी ६.००

****

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे ४६ टक्के मतदान झाल. औरंगाबाद आणि रायगड इथं प्रत्येकी ४८ टक्के, जळगाव ४२ टक्के, जालना ५० टक्के,  पुणे ३६ टक्के, सातारा आणि बारामती ४५ टक्के, रावेर अणि अहमदनगर ४६ टक्के, माढा ४४ टक्के, सांगली  अणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग ४७ टक्के, कोल्हापूर ५४ टक्के, तर हातकणंगले इथं ५२ टक्के मतदानाची नोंद झाली.

****

राज्यातल्या चौदा मतदारसंघांत अनेक राजकीय नेत्यांनी आणि उमेदवारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला.

जालना लोकसभा मतदारसंघातले भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालन्यात मतदान केलं.



राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी बारामतीतल्या काटेवाडी इथं तर बारामती मतदारसंघातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे तसंच त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या कांचन कुल यांनीही मतदानाचा हक्क बजावला.



केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी चौंडी इथं तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अहमदनगर जिल्ह्यात राळेगण सिद्धी इथं मतदान केलं



सातारा मतदार संघातले काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी तसंच त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांनी मतदान केलं.



राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघातल्या साखराळे इथं तर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मरळनाथ पूर इथं मतदानाचा हक्क बजावला.

रायगड मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी सुतारवाडी इथं मतदान केलं.



माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर इथं, आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. रावेरमधल्या भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उल्हास पाटील, यांनी मतदानाचा हक्क बजावला. माजी मंत्री सुरेश जैन आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव इथं, सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.

           

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी इथं, तर शिवसेना आमदार राजन साळवी यांनी लांजा इथं मतदान केलं.

औरंगाबाद मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी कुटुंबियासोबत मतदानाचा हक्क बजावला.

****

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची हाताळणी ही चिंतेची बाब असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. मतदान यंत्र त्यातील प्रणालीमध्ये त्रुटींची शक्यता लक्षात घेता, मतदान यंत्राद्वारे मतदान घेणं, असुरक्षित असल्याचा आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री तेलगु देशम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी केला.

****

भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना हे चारही पक्ष केवळ लोकांना दाखवण्यासाठी वेगवेगळे लढत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते आज धुळे लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहमद यांच्या प्रचार सभेत बोलत होते. प्रस्थापित पक्षांनी लोकशाहीची कुटुंबशाही केली त्यामुळे समाजातील वंचित, उपेक्षित, बहुजन, अल्पसंख्यांक समाज आणि त्याचे असंख्य कार्यकर्ते सत्तेपासून दूर गेल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी नमूद केलं.

****

जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील खेडकेश्वर इथं एका मतदारानं मतदान करतांना, आपल्या मोबाईलवर मतदान यंत्राचा फोटो घेतला. ही कृती, लोकप्रतिनिधी कायद्याचं उल्लंघन ठरत असल्यामुळे, अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

अहमदनगर लोकसभा मतदार संघात आज मतदान यंत्र फोडण्याचा प्रयत्न एका मतदाराने केला. बाबुर्डी बेंद इथं ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

मराठा क्रांती मोर्चा बाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशित केल्याप्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद न्यायालयानं, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यासह व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्याविरोधात वॉरंट बजावलं आहे. मराठा क्रांती मोर्चा दरम्यान, सामना वृत्तपत्रात हे आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशित झालं होतं.

****

लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वीरभद्रअप्पा शीलवंत यांचं आज सकाळी निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. प्रशासनाच्या वतीनं शीलवंत यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करून, श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

****



No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...