Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 August 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.००
****
**संसर्गजन्य
आजारांवर उपचारासाठी राज्यात कायमस्वरुपी रुग्णालयाची आवश्यकता मुख्यमंत्र्यांकडून
व्यक्त
**
औरंगाबाद इथं आज तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू
**
हिंगोली जिल्ह्यात ६ ते १९ ऑगस्ट दरम्यान कडक संचारबंदीचा निर्णय
आणि
**
मराठा आरक्षण तसंच अन्य मागण्यांसाठी ६ ऑगस्टपासून राज्यभरात आंदोलनाचा इशारा
****
संसर्गजन्य
आजारांवर उपचारासाठी राज्यात कायमस्वरुपी रुग्णालयाची आवश्यकता असल्याचं, मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत मीरा भाईंदर इथल्या कोविड सुश्रुषा केंद्राचं
लोकार्पण करताना बोलत होते. मुंबईजवळ अशा प्रकारचं कायमस्वरुपी रुग्णालय उभारण्यासाठी
राज्यसरकारला मदत करण्याची मागणी गेल्या २७ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत
दूरदृश्य संवाद प्रणालीमार्फत झालेल्या बैठकीत केली असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
उत्तर
प्रदेशात उद्भवलेल्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अयोध्येत राममंदिराच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहणार नाहीत, असं शिवसेनेचे ज्येष्ठ
नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. या
सोहळ्याला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत, हे अधिक महत्त्वाचं आहे, उद्धव ठाकरे नंतर
कधीही अयोध्येत जाऊ शकतात, असं सांगत राऊत यांनी या भूमिपूजन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.
****
अभिनेता
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांना सहकार्य केलं
जात असल्याचं, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. या तपासकार्यात
कायदेशीर बाबींचं योग्य पालन करण्याच्या सूचना त्यांनी बिहार पोलिसांना केल्या आहेत.
सुशांतसिंह यांचा अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद असून, मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला,
याचा शोध घ्यायचा असल्याचं, परमबीरसिंह म्हणाले. सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी
त्याच्या घरी कोणतीही पार्टी झाली नसल्याचंही सिंग यांनी म्हटलं आहे. आपल्या तपासात
कोणत्याही राजकीय नेत्याचं नाव समोर आलेलं नाही, असंही सिंग यांनी सांगितल्याचं, पीटीआयच्या
वृत्तात म्हटलं आहे.
या
तपासासाठी बिहारहून आलेल्या तपास पथकाच्या प्रमुख अधिकाऱ्याला मुंबई पोलीस आणि मुंबई
महानगरपालिकेनं विलगीकरणात ठेवल्या प्रकरणी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी टीका केली
आहे. या दोन्ही संस्थांची अशी भूमिका असल्यास, या प्रकरणाचा तपास कसा होणार, असा प्रश्न
निरुपम यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान,
या प्रकरणी मुंबई पोलीस योग्य प्रकारे तपास करत असल्याचं, राज्याचे गृहमंत्री अनिल
देशमुख यांनी म्हटलं आहे. मात्र बिहारच्या पोलीस अधिकाऱ्यांना विलगीकरणात ठेवल्याप्रकरणी
त्यांनी काहीही विधान केलं नाही.
****
औरंगाबाद
इथं तीन कोरोना विषाणूबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यात हनुमान नगरातल्या ६५ वर्षीय
आणि शहानुरमिया दर्गा परिसरातल्या श्रीकृष्ण नगर भागातला ४५ वर्षीय पुरुषासह रामनसपुरा
भागातल्या ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात या आजारामुळं आतापर्यंत ३७२ रुग्णांचा
मृत्यू झाला आहे. दरम्यान आज सकाळी जिल्ह्यात ८७ तर दुपारी आणखी ९ कोरोना विषाणू बाधित
रुग्णांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातली बाधितांची एकूण संख्या १४ हजार ६४९ झाली आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतले ४९ तर ग्रामीण भागातल्या ३८ रुग्णांचा समावेश
आहे. दरम्यान आज दहा रुग्णांना घाटी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे येत्या ६ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट याकालावधीत
कडक संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी रूचेश जयंवशी यांनी आज जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अनेक मोबाईल संदेशाद्वारे गैरसमज
पसरत असल्यामुळे त्यावरही स्वयंस्फूर्तीने प्रतिबंध घालावा असं आवाहनही जिल्हाधिकारी
जयवंशी यांनी केलं आहे.
****
अमरावती
जिल्ह्यात आज ३८ व्यक्तीचा कोविड चाचणी अहवाल बाधित आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांची
एकूण संख्या २ हजार ४१२ झाली आहे आतापर्यंत
१ हजार ६६९ रुग्ण उपचारानंतर बरे होवून घरी परतले असून सध्या ६२९ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.आतापर्यंत ६७ रुग्णांचा या संसर्गामुळं मृत्यू झाला आहे.
****
चंद्रपूर
जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५८० वर पोहोचली आहे.आत्तापर्यंत ३४९ रुग्ण उपचारानंतर
बरे झाले असून सध्या २३० बाधितांवर उपचार सुरू आहेत.आतापर्यंत २ रुग्णांचा या संसर्गामुळं
मृत्यू झाला आहे.
****
मराठा
आरक्षण तसंच अन्य मागण्यांसाठी येत्या ६ ऑगस्टपासून राज्यभरात विविध प्रकारची आंदोलनं
छेडली जाणार असून, ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनापासून आंदोलनं अधिक तीव्र होतील, असा इशारा
शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे. आज नाशिक इथं मेटे यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत छावा युवा संघटना, छावा श्रमिक सेना, शिव क्रांती
सेना, बळीराजा अशा विविध नऊ संघटनांची मराठा आरक्षणासंदर्भात बैठक झाली, त्यानंतर मेटे
वार्ताहरांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाच्या बाजूने भूमिका मांडण्यासाठी
सक्षम वकील नियुक्त करावा, मराठा आरक्षणाची न्यायालयातील सुनावणी कुठल्याही परिस्थितीत
दूरदृश्य प्रणालीद्वारे होऊ नये, विधानसभा किंवा विधान परिषदेचे तातडीने अधिवेशन घेऊन
शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, अशा मागण्या या बैठकीत करण्यात
आल्याचं आमदार मेटे यांनी सांगितलं. या आंदोलनासाठी एकत्रित समन्वय समिती गठीत करण्याचा
निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
लातूरच्या
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत सलग दुसऱ्यांदा उदगीर येथील युवकांनी
प्लाझ्मा दान केले आहे. दात्यास कसलाही धोका
नसल्यानं उत्स्फूर्तपणे प्लाझ्मा दान करा आणि प्लाझ्मा योद्धा बना असे आवाहन विलासराव
देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे नव्याने रुजू झालेले अधिष्ठाता डॉ मोहन डोईबळे
यांनी केलं आहे.
****
नांदेड
दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी आज पी पी ई किट परिधान करून
जिल्हा शासकीय रुग्णालयात जावून कोविडवर उपचार घेत असलेल्या महिलांना राखी पौर्णिमेच्या
शुभेच्छा दिल्या. या आजारातून बरे होण्याचा दिलासा देत, त्यांनी स्वत: कोविड वर कशी
मात केली याचा अनुभव यावेळी सांगितला.
****
नाशिक
शहरात महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात कोविड बाधितांना राख्या बांधून परिचारिकांनी
रक्षाबंधन साजरे केले. स्वच्छता कर्मचारी किंवा घंटागाडी कामगार हेदेखील कोविड योद्धे आहेत याची जाणीव ठेवून शहरातील मुंबईनाका परिसरातील
सोसायटी धारकांनी घंटागाडी कर्मचाऱ्यांना राख्या बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन
साजरे केले.
****
अहमदनगर
जिल्हा रुग्णालयातल्या कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेची क्षमता आता प्रतिदिन एक हजार
चाचण्या एवढी करण्यात आली आहे. यामुळे चाचण्यांचा वेग वाढणार आहे. बाधित रुग्णाच्या
निकट संपर्कातल्या किंवा अन्य गंभीर आजारांनी त्रस्त असतील व्यक्तींनी या प्रयोगशाळेत
तपासणी करून घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
क्रांतिसिंह
नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.
अपर जिल्हाधिकारी शरद पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह अधिकारी
आणि कर्मचारी उपस्थित होते.
****
अहमदनगर
जिल्ह्यातल्या राहुरी पीपल्स बँकेच्या माजी अध्यक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
डॉ. सुनिला शांताराम कुलकर्णी यांचं आज राहुरी इथं निधन झालं, त्या ८८ वर्षांच्या होत्या.
गेली पन्नास दशकं त्या राहुरी इथं वैद्यकीय, सामाजिक तसंच सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत
होत्या
****
कोरोना
विषाणू प्रार्दूभावाच्या काळातही महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सेवा बजावत आहेत.
या विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेत देशसेवा करावी, असं आवाहन
धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केलं आहे. आज महसूल दिनानिमित्त धुळे
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या
हस्ते गुणवंत अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
****
नांदेड
जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी
प्रति शिधापत्रिका एक किलो साखर नियतन मंजूर केले आहे. सदर महिन्यात जिल्ह्यासाठी २
हजार १९२ क्विंटल साखर शासनाकडून प्राप्त झाली असून संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत
वितरण करण्यात येणार आहे.
****
बुलडाणा
जिल्ह्यातल्या खडकपूर्णा प्रकल्पातून सुरू असलेल्या पाणी विसर्गात कपात करण्यात आली
आहे. सध्या या प्रकल्पातून ३ हजार ८०८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पूर्णा नदीपात्रात पाणी
सोडलं जात आहे. प्रकल्पात होणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्यानं १४ दरवाजे बंद करण्यात
आले असून, आता फक्त पाच दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
अमरावती
जिल्ह्यातील वलगाव परिसरात पेढी नदीला आलेल्या पुरात काल चार जण वाहून गेले. रात्री
अकरा वाजता ही घटना घडली.
****
No comments:
Post a Comment