Wednesday, 5 August 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 05 AUGUST 2020 TIME –18.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 August 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.००

****

** अयोध्येतलं श्रीराम मंदीर हे शाश्वत आस्था, राष्ट्रीय भावना आणि कोट्यवधी लोकांच्या सामुहिक शक्तीचं प्रतीक - पंतप्रधानांचं प्रतिपादन

** राम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त मराठवाड्यासह सर्वत्र आनंदोत्सव साजरा

** औरंगाबाद इथं ६ तर परभणीत २ कोविडग्रस्तांचा मृत्यू, हिंगोलीचे जिल्हाधिकारी कोविडग्रस्त

आणि

** प्लाझ्मा दानासंबंधी प्रबोधनासाठी भारतीय जैन संघटनेचं ‘प्लाझ्मा दाता - जीवनदाता’ अभियान

****

अयोध्येतलं श्रीराम मंदीर हे शाश्वत आस्थेचं, राष्ट्रीय भावनेचं आणि कोट्यवधी लोकांच्या सामुहिक शक्तीचं प्रतीक असेल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज दुपारी पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येत या मंदिराचं भूमिपूजन झालं, त्यानंतर ते बोलत होते. गेल्या अनेक शतकांची प्रतीक्षा आज संपुष्टात आली, असं सांगतानाच पंतप्रधानांनी हे मंदीर भावी पिढ्यांना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा देईल, असं म्हटलं. या मंदिरामुळे या परिसराचं अर्थतंत्र बदलेल, प्रत्येक क्षेत्रात नवनव्या संधी निर्माण होतील, तसंच उपलब्ध संधींमध्ये वाढ होईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. रामजन्मभूमी मंदीर निर्माण कार्याच्या कोनशीलेचं अनावरणही तसंच यानिमित्तानं जारी करण्यात आलेल्या विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं.

****

राम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त मराठवाड्यासह सर्वत्र आनंदोत्सव साजरा झाला.

औरंगाबाद शहरातल्या मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे लावले, तसंच रांगोळ्या काढल्या होत्या. भूमिपूजन होताच, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. सिल्लोड इथं नागरिकांनी गुढ्या उभारून हा दिवस साजरा केला.

दरम्यान, औरंगाबाद इथं टीव्ही सेंटर चौकात श्री राम प्रतिमेचं पूजन करत असलेले मनसेचे जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं.

****

जालना जिल्ह्यात सुरक्षित अंतराचे नियम पाळत ठिकठिकाणी महाआरती, फटाक्यांची आतषबाजी करत, पेढे वाटून नागरिकांनी हा राममंदिराच्या भूमिपूजनाचा क्षण उत्सवाप्रमाणे साजरा केला. जालना शहरातल्या राजेंद्रप्रसाद रोडवरील श्रीराम मंदिरात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तर जुना जालन्यातल्या आनंदवाडी इथल्या श्रीराम मंदिराच्या आवारात माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती करण्यात आली. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात होता.

****

लातूर शहरात टाळेबंदी लागू असल्यामुळे आज राममंदीर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर सामुदायिक कार्यक्रम झाले नाही, परंतु अयोध्येत भूमिपूजन झाल्यावर शहरात विविध ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. राम गल्ली परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले, घरोघरी आकर्षक रांगोळ्या काढून तसंच तोरण लावून राम प्रतिमांचं पूजन करण्यात आलं.

****

उस्मानाबाद इथं कसबा भागात राम मंदिरासमोर आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रामच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं.

विश्व हिंदू परिषद तसंच बजरंग दलाच्या वतीनं मिठाईचं वाटपही करण्यात आलं. अयोध्येत कार सेवेत सहभागी झालेल्या अनेक कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

****

परभणी जिल्ह्यात विविध मंदिरात राम प्रतिमेचे पूजन करून तसेच गुढी उभारून जल्लोष साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कारसेवकांचा सत्कारही करण्यात आला.

****

चंद्रपूर जिल्ह्यातही ब्रम्हपूरी इथं श्री रामांच्या प्रतिमेची पूजा करून नागरिकांना लाडूच्या प्रसादाचं वाटप करण्यात आलं.

नाशिक शहरातही अनेक ठिकाणी गुढी उभारण्याबरोबरच घंटानाद, दीपोत्सव अशा कार्यक्रमांमधून हा क्षण साजरा करण्यात आला. शहरातल्या प्रसिद्ध काळाराम मंदिराबाहेर माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रामाच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली.

****

औरंगाबाद जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये फुलंब्री तालुक्यातल्या वडोद बाजार इथला ५३ वर्षीय पुरुष, साजापूर इथला ७१ वर्षीय पुरुष, सिल्लोडच्या जामा मशीद परिसरातली ६१ वर्षीय महिला तर अंभई इथला ७३ वर्षीय पुरुष, औरंगाबाद शहरात छावणी इथल्या ६७ वर्षीय पुरुष तसंच एन सहा संभाजी कॉलनीतल्या ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात या आजारामुळे मृतांची संख्या ४९९ झाली आहे. दरम्यान, दुपारच्या सत्रात तीन जणांचा अहवाल कोरोना विषाणू बाधित आला. त्यामुळे जिल्ह्यातली बाधित रुग्णांची संख्या १५ हजार २११ इतकी झाली आहे. यापैकी ११ हजार ३६८ रुग्ण बरे झाले आहेत तर सध्या ३ हजार ३४४ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात आज दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात परभणी शहरातला ७१ वर्षीय पुरुष तर सेलू तालूक्यातल्या राजेवाडी इथल्या ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे

****

हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे. त्यामुळे सर्व विभागाचे प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना अलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारीही कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं आहे. जिल्ह्यात सध्या १९ तारखेपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात आज १६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर २१५ जणांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यातली बाधित रुग्णांची संख्या आता ६ हजार ८२४ इतकी झाली असून सध्या २ हजार १६० रुग्ण उपचार घेत आहेत.

****

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव जोडणं हे राजकीय कटकारस्थान असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्यात शिवसेना प्रणित सरकार असल्याची बाब विरोधकांच्या अजूनही पचनी पडलेली नाही, जे लोक आदित्य ठाकरेंचं नाव या प्रकरणाशी जोडत आहेत, त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असंही राऊत म्हणाल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.

****

भारतीय जैन संघटनेच्या वतीनं राज्यात प्लाझ्मा दानासंबंधी चळवळ उभी करण्यात आली आहे. ‘प्लाझ्मा दाता - जीवनदाता’ अभियानाच्या माध्यमातून कोरोना मुक्त झालेल्या पाच हजार व्यक्तींना प्रोत्साहीत करून येत्या १४ ऑगस्ट पर्यंत त्यांचे संमतीपत्र मिळवून शासनाला सुपूर्द करण्यात येणार आहे. भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प समन्वयक प्रवीण पारख यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.यावेळी कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेले पत्रकार तुषार वखरे यांनी प्लाझ्मा दानाचे संमतीपत्र भरुन या अभियानाची सुरुवात केली.

दरम्यान, कोरोना विषाणू बाधितांचं लवकर निदान होण्यासाठी आणि मृत्यूदर शू्न्यवरती नेण्यासाठी भारतीय जैन संघटना आणि औरंगाबाद महापालिकेच्या वतीनं शहरात 'मिशन झिरो' अभियान राबवण्यात येत आहे. त्यानुसार शहरातल्या १८ ठिकाणी सुरु असलेल्या तपासणी शिबिरांच्या माध्यमातून १७ हजार ९४२ अँटीजन चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील ५२० जण कोरोना बाधित आढळले असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

धुळे शहरातल्या खाजगी रुग्णालयातल्या २५ टक्के खाटा वैद्यकीय सोयी सुविधांसह कोरोना विषाणू बाधित रुग्णांकरिता आरक्षित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजिज शेख यांनी दिले आहेत. दरम्यान, काल दिवसभरात धुळे जिल्ह्यात ११५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले असून जिल्ह्यातली संख्या ३ हजार ६८९ एवढी झाली.

****

परभणी जिल्ह्यातल्या मातंग समाज आणि तत्सम बारा पोटजातीतील विद्यार्थ्यांनी तसंच २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ६० टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी १० तारखेपर्यंत अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केलं आहे.

****

जालना शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या घाणेवाडी इथल्या संत गाडगेबाबा जलायशात १९ फुटांपर्यंत पाणी आले आहे. जलाशय पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहत आहे.

****

औरंगाबाद शहरालगत असलेला हर्सुल तलाव आज पूर्ण भरला असून त्याच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. महापालिकेचे कर्मचारी इथं लक्ष ठेवून असून हिलाल कॉलनी, जलाल कॉलनी, बिस्मीला कॉलनी, आरेफ कॉलनी याभागातल्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. चौदा वर्षानंतर हा तलाव पूर्ण क्षमतेनं भरला आहे.

****

ठाणे जिल्ह्यातल्या ३३ माध्यमिक शाळा बेकायदा असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यानं ही माहिती दिली. यापैकी १८ शाळा इंग्रजी माध्यमाचा, ३ हिंदी माध्यमाच्या तर उर्वरित शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. या सर्व शाळांना नोटीस बजावून संस्थेचं कामकाज बंद करण्यास सांगण्यात आलं आहे.

****

सोन्याचे भाव आज प्रतितोळा ५६ हजाराचा टप्पा पार केला. दिल्लीत सोन्याच्या दरात प्रतितोळा एक हजार ३६५ रुपयांनी वाढ झाल्यानं, सोन्याचा दर ५६ हजार १८१ रुपयांवर पोहोचला. चांदीच्या दरात आज किलोमागे ५ हजार ९७२ रुपये वाढ झाल्यानं, चांदीचा भाव प्रतिकिलो ७२ हजार ७२६ रुपये झाला आहे.

**** 

 


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...