Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 06 August 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६
ऑगस्ट
२०२० सकाळी ७.१० मि.
****
·
अयोध्येतलं राम मंदिर हे भावी पिढ्यांना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा
देईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास.
·
राम मंदिराच्या भूमीपूजनानंतर मराठवाड्यात सर्वत्र आनंदोत्सव.
·
राज्यात काल आणखी दहा हजार ३०९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, ३३४ जणाचं
उपचारादरम्यान मृत्यू.
·
औरंगाबादमध्ये सात, नांदेड सहा, लातूर चार, उस्मानाबाद दोन तर परभणी आणि जालना
जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचं निधन तसंच बीडमध्ये १०८ तर हिंगोलीत २० नवे रुग्ण.
·
मुंबईत बहुतांशी भागातला पाऊस थांबला, पावसात अडकलेले लोक घराकडे परतू लागले.
आणि
·
माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि माजी मंत्री अनिल राठोड
यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार.
****
अयोध्येतलं राम मंदिर हे भावी पिढ्यांना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा
देईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. अयोध्येत या मंदिराचं
भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. या मंदिरामुळे या परिसराचं अर्थतंत्र बदलेल,
प्रत्येक क्षेत्रात नवनव्या संधी निर्माण होतील, तसंच उपलब्ध संधींमध्ये वाढ होईल,
असं ते म्हणाले. श्रीराम मंदीर हे शाश्वत आस्थेचं, राष्ट्रीय भावनेचं आणि कोट्यवधी
लोकांच्या सामुहिक शक्तीचं प्रतीक असेल, असं सांगून पंतप्रधानांनी, गेल्या अनेक शतकांची
प्रतिक्षा संपुष्टात आली असल्याचं म्हटलं. रामजन्मभूमी मंदीर निर्माण कार्याच्या कोनशिलेचं
अनावरण तसंच यानिमित्तानं जारी करण्यात आलेल्या विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशनही यावेळी
पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं.
या सोहळ्याला उत्तरप्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,
रामजन्मभूमी समितीचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
मोहन भागवत, यांच्यासह देशभरातून निमंत्रित करण्यात आलेले १७५ विशेष पाहुणे उपस्थित
होते. या सोहळ्यासाठी अयोध्येत आल्यानंतर पंतप्रधानांनी सर्वप्रथम हनुमानगढी इथं जाऊन
हनुमानाचं आणि त्यानंतर रामललाचं दर्शन घेतलं. पंतप्रधानांनी या मंदिरात पूजा केल्यानंतर
प्रांगणातच पारिजातकाचं झाड लावलं. त्यानंतर रामजन्मभूमी स्थळी पंतप्रधानांच्या हस्ते
भूमिपूजनाचे धार्मिक विधी करण्यात आले.
****
दरम्यान, राम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त मराठवाड्यासह सर्वत्र आनंदोत्सव साजरा
झाला.
औरंगाबाद शहरातल्या मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा भगवे
झेंडे लावले, तसंच रांगोळ्या काढल्या होत्या. भूमिपूजन होताच, फटाक्यांची आतषबाजी करण्यात
आली. या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली होती.
जालना जिल्ह्यात सुरक्षित अंतराचे नियम पाळत ठिकठिकाणी महाआरती, फटाक्यांची
आतषबाजी करत, पेढे वाटून नागरिकांनी हा राममंदिराच्या भूमिपूजनाचा क्षण उत्सवाप्रमाणे
साजरा केला. जालना शहरातल्या राजेंद्रप्रसाद रोडवरील श्रीराम मंदिरात केंद्रीय राज्यमंत्री
रावसाहेब दानवे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तर जुना जालन्यातल्या आनंदवाडी
इथल्या श्रीराम मंदिराच्या आवारात माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते श्रीरामाच्या
प्रतिमेचे पूजन करून महाआरती करण्यात आली.
लातूर शहरात टाळेबंदी लागू असल्यामुळे काल राममंदीर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर
सामुदायिक कार्यक्रम झाले नाहीत, परंतु अयोध्येत भूमिपूजन झाल्यावर शहरात विविध ठिकाणी
फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
उस्मानाबाद इथं कसबा भागात राम मंदिरासमोर आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील
यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रामच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. विश्व
हिंदू परिषद तसंच बजरंग दलानं मिठाईचं वाटप केलं.
नांदेड शहरातल्या महाराणा प्रताप चौक इथं प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेची पूजा
करून ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आला. तसंच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
परभणी जिल्ह्यात विविध मंदिरात राम प्रतिमेचे पूजन करून तसेच गुढी उभारून जल्लोष
साजरा करण्यात आला.
****
राज्यात काल आणखी दहा हजार ३०९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे
राज्यातली एकूण रुग्णसंख्या चार लाख ६८ हजार २६५ झाली आहे. काल ३३४ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत १६ हजार ४७६ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे.
दरम्यान, राज्यात या विषाणू संसर्गातून मुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येनं
तीन लाखाचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात सहा हजार १६५ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत
तीन लाख पाच हजार ५२१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. राज्यात सध्या एक लाख ४५
हजार ९६१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल सात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात
या आजारानं आतापर्यंत ५०० जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल आणखी ३४१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
झाली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या १५ हजार ४९१ झाली आहे. तर काल १५३ जण
बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार
५२१ रुग्ण बरे झाले असून, सध्या तीन हजार ४७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात
या विषाणू संसर्गानं आतापर्यंत १०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी १९६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार ६९२ झाली आहे. त्यापैकी एक हजार १३२
रुग्ण बरे झाले असून, सध्या १४४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात
या आजारानं आतापर्यंत १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी १३८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार ८३३ झाली आहे. त्यापैकी एक हजार ६३१
रुग्ण बरे झाले असून, सध्या एक हजार ६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात
या विषाणू संसर्गानं झालेल्या एकूण मृतांची संख्या आता ६१ झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी ९६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे
जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या एक हजार ७०९ झाली आहे. त्यापैकी ६२० रुग्ण बरे झाले असून,
सध्या एक हजार २३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
परभणी जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात
या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी ४२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे
जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ७७९ झाली आहे. तर काल सहा रुग्ण बरे झाल्यानं त्यांना
घरी सोडण्यात आलं. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत ४०५ रुग्ण बरे झाले असून, सध्या ३३१ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
दरम्यान, परभणी जिल्हा परिषदेतले एक सभापती कोरोना विषाणू बाधित आढळले आहेत.
यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून
जिल्हा परिषदेचं मुख्य कार्यालयातले काही विभाग सात ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
घेतला आहे.
****
जालना जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात
या आजारानं आतापर्यंत ७६ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी ७४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे
जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार ५१९ झाली आहे. तर काल २४ रुग्ण बरे झाल्यानं
त्यांना घरी सोडण्यात आलं. जालना जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ६२१ रुग्ण बरे झाले असून,
सध्या ८२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
बीड जिल्ह्यात काल आणखी १०८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली
एकूण रुग्णसंख्या एक हजार १३८ झाली आहे. त्यापैकी ४५० रुग्ण बरे झाले असून, ३५ जणांचा
मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ५५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी २० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली
एकूण रुग्णसंख्या ७३८ झाली आहे. तर काल ११ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात
आलं. जिल्ह्यात आतापर्यंत ५५० रुग्ण बरे झाले असून, सध्या १८० रुग्णांवर उपचार सुरु
आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे. त्यामुळे
सर्व विभागाचे प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना
विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातले अधिकारीही कोरोना विषाणू
बाधित असल्याचं आढळून आलं आहे. जिल्ह्यात सध्या १९ तारखेपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात
आली आहे.
****
मुंबईत काल आणखी एक हजार १२५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ४२ जणांचा
मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात दोन हजार २३१ नवे रुग्ण आणि ४६ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक
जिल्ह्यात ६३६ नवे रुग्ण आढळले, तर दोन जणांचा मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यात ४७०,
रायगड ४२६, जळगाव ३६५, नवी मुंबई आणि सांगली जिल्ह्यात प्रत्येकी २७८, नागपूर २६९,
सातारा १९६, अमरावती ७४ तर गडचिरोली जिल्ह्यात काल आणखी २३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाली.
****
मुंबईत बहुतांश ठिकाणी पाऊस थांबला असून कालच्या पावसानं साठलेलं पाणी आता ओसरत
असून, रात्रभर अडकून पडलेले नागरिक घराकडे परतत आहेत. दक्षिण मुंबईत वादळी वाऱ्यामुळे
अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असल्यानं काही ठिकाणी ते कापून रस्ते मोकळे करण्यात
येत आहेत.
कोकण, मध्य महाराष्ट्रात काल मुसळधार पाऊस झाला. मुंबईत काल १२ तासात हंगामातल्या
आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण
झालेल्या परिस्थितीचा काल आढावा घेतला. नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक
कारणांसाठीच घराबाहेर पडावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. नागरिकांना जिथे
गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने
कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
रायगड जिल्ह्यातली पूरस्थिती काल सलग तिसऱ्या दिवशी कायम होती. जोरदार वादळी
वारे आणि कोसळणारा पाऊस यामुळे आंबा, कुंडलिका आणि सावित्री या नद्यांनी धोक्याची पातळी
ओलांडली आहे. श्रीवर्धन - माणगाव मार्गावरील घोणसे घाटात दरड कोसळल्याने हा रस्ताही
बंद पडला आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात कालही पाऊस सुरुच होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख
नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने
सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं जिल्ह्यातल्या
नद्या मात्र धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.
सांगली जिल्ह्यातल्या चांदोली परिसरात काल मुसळधार पाऊस झाला. वारणा धरणाची
पाणी पातळी ३२ तासात चार मीटरनं वाढली. कोल्हापूर जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाल्यानं
पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यात कोयना
धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्याच्या विविध भागात काल मुसळधार झाला. पाटण तालुक्यातल्या
अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड शहरातही काल मुसळधार पाऊस झाला. पैठण तालुक्यातल्या
पाचोड इथल्या गल्हाटी नदीला पूर आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन
सपंर्क साधून मुंबईसह राज्यातल्या इतर भागात सुरु असलेल्या पावसाचा आढावा घेतला. केंद्राकडून
राज्याला सर्व प्रकारची मदत दिली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
दरम्यान, मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान
विभागानं वर्तवली आहे. आपत्तीत मदत करण्यासाठी राज्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या
१५ तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. यापैकी मुंबई आणि साताऱ्यात प्रत्येकी पाच, कोल्हापूरमध्ये
चार, सांगलीत दोन, तर ठाणे पालघर आणि नागपूर इथं प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात
येणार आहे.
****
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग -
सीबीआयकडे सोपवण्याबाबतची अधिसूचना केंद्र सरकारनं काल जारी केली. या प्रकरणाचा तपास
सीबीआयकडे सोपवण्याची मागणी बिहार सरकारनं केली होती.
या प्रकरणी काल सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान, सुशांतचा मृत्यू
हा चिंतेचा विषय असल्यानं, आतापर्यंत सत्य समोर यायला हवं होतं, असं न्यायालयानं म्हटलं
आहे. हे प्रकरण बिहार पोलिसांच्या कार्यकक्षेत येत नसल्यानं, या प्रकरणी त्यांना प्राथमिक
माहिती अहवाल दाखल करण्याचा किंवा तपास करण्याचा अधिकार नाही, असं महाराष्ट्र सरकारकडून
यावेळी सांगण्यात आलं.
****
राज्य सरकारनं काल अमृत आहार योजनेतील सहा लाख ५१ हजार मुलांना आणि एक लाख २१
हजार गरोदर, स्तनदा मातांना दूध भुकटी मोफत देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही योजना
एक वर्ष राबवण्यात येणार आहे.
टाळेबंदी दरम्यान एप्रिल ते जुलै या कालवधीत ५ कोटी ९४ लाख ७३ हजार ६०६ लिटर
दुध शेतकऱ्यांकडून घेतलं आहे. त्यापैकी चार हजार ९२८ मेट्रिक टन दूध भुकटीचं तर दोन
हजार ५७५ मेट्रीक टन बटरचं उत्पादन करण्यात आलं आहे. सध्या ही उत्पादने वखार महामंडळाच्या
शीतगृहात ठेवण्यात आली आहेत.
****
भारतीय जैन संघटनेच्या वतीनं राज्यात प्लाझ्मा दानासंबंधी चळवळ उभी करण्यात
आली आहे. ‘प्लाझ्मा दाता – जीवनदाता’ अभियानाच्या माध्यमातून कोरोना मुक्त झालेल्या
पाच हजार व्यक्तींना प्रोत्साहीत करून येत्या १४ ऑगस्टपर्यंत त्यांचे संमतीपत्र मिळवून
शासनाला सुपूर्द करण्यात येणार आहे. भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प समन्वयक प्रवीण पारख
यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. यावेळी कोरोना विषाणू संसर्गातून
मुक्त झालेले पत्रकार तुषार वखरे यांनी प्लाझ्मा दानाचे संमतीपत्र भरुन या अभियानाची
सुरुवात केली.
****
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पार्थिव देहावर काल निलंगा
इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल दुपारी त्यांचं पार्थिव निलंग्यात
आणण्यात आलं. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे नागरिकांनी गर्दी न करण्याचं आवाहन केलं
असतानाही अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी
जी श्रीकांत यांनी पुष्पचक्र वाहून निलंगेकर यांना अभिवादन केल. शिवाजीराव पाटील निलंगेकर
यांचं काल पहाटे पुण्यात निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते.
****
अहमदनगरचे माजी मंत्री, शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या पार्थिव देहावर काल
अंत्यसंस्कार करण्यात आले. काल पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं.
त्यांना कोरोना विषाणू संसर्गाची लागण झाल्यानं रुग्णालयात उपचार सुरु होते.
****
No comments:
Post a Comment