Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14
February 2021
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१४ फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
· राष्ट्रीय महामार्गांवर
धावणाऱ्या सर्व वाहनांना आज मध्यरात्रीपासून ‘फास्ट टॅग’ द्वारे पथकर भरणं बंधनकारक.
· रस्ते सुरक्षेसाठी
लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन.
· राज्यातले विद्यापीठ
पदव्युत्तर विभाग तसंच संलग्नित महाविद्यालयातल्या तासिकांना आजपासून सुरुवात; ११वीच्या
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला उद्यापर्यंत मुदतवाढ.
· केंद्र सरकारनं
यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याच्या पायाभूत सुविधांसाठी जास्तीत जास्त निधी दिल्याचा
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दावा.
· मराठवाड्यातल्या
आठही जिल्ह्यांच्या आगामी वित्त वर्षासाठीच्या नियोजन प्रारूप आराखड्याबाबत आज औरंगाबादमध्ये
बैठक.
· राज्यात चार हजार
९२ तर मराठवाड्यात २५४ नव्या कोविड रुग्णांची नोंद.
· जालना जिल्ह्यात
जामवाडीजवळ भरधाव मोटार विहिरीत कोसळून मायलेकीचा मृत्यू; एकाच ठिकाणी आठवड्यातील दुसरी
घटना.
आणि
· इंग्लंडविरुद्धच्या
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात एक बाद ५४ धावा.
****
राष्ट्रीय महामार्गांवर धावणाऱ्या सर्व वाहनांना आज
मध्यरात्रीपासून ‘फास्ट टॅग’ द्वारे पथकर भरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पथकर नाक्यांवरच्या
सर्व मार्गिका आता फास्ट टॅग मार्गिका असतील. फास्ट टॅग नसणाऱ्या किंवा वैध फास्ट टॅग
नसणाऱ्या वाहनांना त्यांच्या श्रेणीत विहीत असलेल्या पथकरापेक्षा दुप्पट पथकर भरावा
लागेल. १ जानेवारी २०२१ पासून मोटार वाहनांना फास्ट टॅग बंधनकारक करण्यात आलं आहे.
कालपर्यंत फास्ट टॅग बसवण्यासाठी वाढीव मुदत देण्यात आली होती. पथकर भरतानाच्या वेळेत
बचत व्हावी, पथकर नाक्यांवरची वाहतुक कोंडी टाळण्यासाठी, डिजिटल पद्धतीनं पथकर भरला
जावा, या हेतुनं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं वाहनांवर फास्ट टॅग लावणं बंधनकारक
केलं आहे.
****
रस्ते सुरक्षेसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा,
असं आवाहन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपूर इथं राष्ट्रीय
रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते काल
झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशात रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये १८ ते
४५ या वयोगटाचं प्रमाण ७० टक्के असून, ही बाब चिंताजनक असल्याचं गडकरी म्हणाले. रस्ते
सुरक्षेसाठी केंद्रीय परिवहन मंत्रालय संसद सदस्य रस्ता सुरक्षा समिती स्थापन केली
असून, या समितीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी सक्रीय सहभाग नोंदवावा, आपल्या शहरातल्या
अपघात प्रवण स्थळांची माहिती संबंधित यंत्रणांना द्यावी आणि ती स्थळं दुरुस्त करण्यासाठी
पाठपुरावा करावा, असं आवाहनही गडकरी यांनी केलं. सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यावेळी
उपस्थित होते. रस्ते सुरक्षा अभियानाच्या प्रचारासाठी आपण विनामूल्य सहकार्य करू असं
आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
****
राज्यातले विद्यापीठ पदव्युत्तर विभाग तसंच संलग्नित
महाविद्यालयातल्या तासिकांना आजपासून सुरुवात होणार आहे. अकरा महिन्यापूर्वी १५ मार्चला
बंद झालेले वर्ग ‘कोविड’च्या अटी शर्ती पाळून सुरु होणार आहेत. प्रवेश क्षमतेच्या ५०
टक्के विद्यार्थ्यांना उपस्थितीची अनुमती देण्यात आली आहे. दोन विद्यार्थ्यांमध्ये
एका विद्यार्थ्याची जागा रिक्त सोडून वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी आळीपाळीनं प्रत्यक्ष
उपस्थित राहून विद्यापीठ अनुदान आयोगानं निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं तंतोतंत
पालन करणं अनिवार्य असणार आहे.
****
इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला शिक्षण
विभागानं उद्या मंगळवारपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य
कारणास्तव अद्याप प्रवेश घेता आलेला नाही, त्यांना प्रवेश निश्चित करता यावेत यासाठी
हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अर्ज करणं आणि नियत वितरण घेण्यासाठी १६ फेब्रुवारी,
म्हणजे येत्या मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत मुदत दिली आहे. नियत वितरण मिळालेल्या
विद्यार्थ्यांना त्याच दिवशी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आपला प्रवेश
संबंधित महाविद्यालयात निश्चित करता येईल. सर्व विद्यार्थ्यांनी मिळालेल्या वाढीव वेळेत
आपला प्रवेश घ्यावा, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी ही शेवटची संधी असेल, असं शिक्षण
विभागाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.
****
राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात २०२२ पर्यंत फिरती
पशुवैद्यकीय रुग्णालयं सुरु करणार असल्याचं पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय विकास मंत्री
सुनील केदार यांनी सांगितलं आहे. या उपक्रमांतर्गंत नागपूर जिल्हा परिषद प्रांगणात
१५ फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयांना केदार यांच्या हस्ते काल हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ
करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पशुधनाला शेतकऱ्यांच्या बांधावर नाममात्र शुल्कात
वेळेत उपचार मिळावेत, यासाठी ही सुविधा राबवली जात असल्याचं, केदार यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या
पायाभूत सुविधांसाठी जास्तीत जास्त निधी दिला असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब
दानवे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं बोलत होते. केंद्राच्या सर्व तरतुदी राज्यांने
विनाविलंब पूर्ण केल्या तर आणखी निधीचं वाटपं केलं जाणार असल्याचं ते म्हणाले. शिवजयंती
साजरी करण्यासाठी निर्बंध नसावेत असं मत खासदार दानवे यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आज औरंगाबाद
दौऱ्यावर येत आहेत. मराठवाड्यातल्या नांदेड. उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, परभणी, बीड,
जालना आणि औरंगाबाद या आठही जिल्ह्यांच्या आगामी वित्त वर्षासाठी नियोजनाच्या प्रारूप
आराखड्याबाबत ते बैठक घेणार आहेत. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातल्या सभागृहात
सकाळी ११ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत या बैठका होणार आहेत. सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री
तसंच जिल्हाधिकारी या बैठकांना उपस्थित असतील. दरम्यान, फुलंब्री तालुक्यात पाल इथं
हनमंतराव सदाशिव जाधव क्रिकेट संकुलाचं उद्घाटनही पवार यांच्या हस्ते आज सकाळी होणार
आहे.
****
देशभरात कोविड च्या लसीचा दुसरा डोस आजपासून देण्यात
येणार आहे. गेल्या १६ तारखेला देशभरातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याच्या मोहिमेला
प्रारंभ झाला. ही लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी या लसीचा दुसरा डोस घ्यावा लागतो. ज्या
कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली आहे, अशा सर्वांना या लसीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया
सुरु होत आहे. कोरोनाची लस घेणं ऐच्छिक असल्यानं अनेक आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी
ही लस अद्याप घेतलेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागा कडून देशभरात कोरोना लसीकरणासाठी
जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.
****
राज्यात काल चार हजार ९२ नव्या कोविड रुग्णांची नोंद
झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ६४ हजार २७८ झाली
आहे. काल एक हजार ३५५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ७५
हजार ६०३ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ७ दशांश
टक्के इतका झाला आहे. काल ४० रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने
दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ४९१ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ५
दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ३५ हजार ९५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल २५४ नव्या कोरोना बाधित रुग्णांची
नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात काल ५८ नवे रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात ४३, लातूरमध्ये
५१, नांदेड ३५, बीड तसंच परभणी जिल्ह्यात २६, उस्मानाबाद १०, तर हिंगोली जिल्ह्यात
काल पाच नवे रुग्ण आढळून आले.
****
२० वा आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन आज पाळण्यात
येत आहे. या अनुषंगानं इंडियन मेडिकल असोसिएशन आणि औरंगाबाद इथल्या मिशन पिंक हेल्थ
संस्थेच्या वतीनं काल विशेष चर्चासत्र घेण्यात आलं. भारतामध्ये दर दहा लाख बालकांमागे
दीडशे ते दोनशे नवीन रुग्ण दरवर्षी आढळत असल्याची
माहिती रेडिओथेरपी तज्ज्ञ डॉ अमोल उबाळे यांनी यावेळी दिली. बाल कर्करोग हा पूर्णपणे
बरा होणारा आजार असला तरी, आपल्या देशामध्ये जागरुकतेच्या अभावामुळे अनेक निरागस बालकांचा
मृत्यू होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
वीज महावितरण कंपनीच्या महाकृषी ऊर्जा अभियानास औरंगाबाद
परिमंडळातल्या शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभियानाच्या पहिल्या पंधरवड्यातच
एक हजार ७०२ कृषीपंप ग्राहकांनी एक कोटी १२ लाख रुपये थकबाकीचा भरणा करून जवळपास ७०
टक्के सवलत मिळवली आहे. औरंगाबाद परिमंडळात एकूण ३ लाख ५५ हजार ४२७ कृषीपंप ग्राहकांकडे
४ हजार ४६० कोटी ९७ लाख रुपयांचं वीजबिल थकीत आहे. यापैकी निर्लेखन, व्याज तसंच विलंब
आकाराचे एकूण १ हजार ८१७ कोटी ८९ लाख रुपये महावितरणकडून माफ करण्यात आलं आहे. या कृषी
ग्राहकांनी मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित
५० टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे.
****
जालना जिल्ह्यात भरधाव मोटार विहिरीत कोसळून मायलेकीचा
मृत्यू झाला. देऊळगाव राजा रस्त्यावर जामवाडी शिवारात काल सकाळी ही दुर्घटना घडली.
अपघात होत असल्याचं लक्षात येताच, मोटारीमधल्या महिलेने दीड वर्षाच्या आपल्या मुलीला
खिडकीतून बाहेर टाकल्यानं ती मुलगी बचावली, इतर दोघे विहिरीतून पोहत बाहेर आले, मात्र
मोटारीमधल्या मायलेकीचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वीच याच विहिरीत, एक मोटार अशाच
पध्दतीनं पडल्यानं बीड इथल्या दोघांचा मृत्यू झाला होता. काल अपघात झाल्यानंतर जामवाडी
ग्रामस्थांनी रस्ता बांधकाम कंत्राटदारावर कारवाईच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन
केलं. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
****
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आज पंधरा तारखेपासून उमेदवारी अर्जांची विक्री
तसंच अर्ज स्वीकारण्याला सुरुवात होत असून, २३ फेब्रुवारीला अर्जांची छाननी होणार आहे.
२४ फेब्रुवारीपासून १० मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. २१ तारखेला
मतदान तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची
भरपाई देण्यात होत असलेल्या चालढकलीचा निषेध करण्यासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
साखळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत
शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारने केलेली
मदत अत्यल्प आहे. अनेक शेतकऱ्यांकडे ॲन्ड्राईड मोबाईल नसल्यामुळे त्यांना नुकसान भरपाईची
ऑनलाईन तक्रार करता आलेली नाही. याबाबत वेळोवेळी शासनास कळवूनही याची दखल सरकारने घेतली
नाही, त्यामुळे हे आंदोलन करत असल्याचं सांगण्यात आलं.
****
क्रिकेट
भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई इथं सुरू असलेल्या
दुसऱ्या कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात एक बाद ५४ धावा
झाल्या आहेत. त्यापूर्वी काल सकाळी भारताचा पहिला डाव ३२९ धावांवर तर इंग्लंडचा पहिला
डाव १३४ धावांवर संपुष्टात आला. रविचंद्रन अश्विननं ४३ धावा देत, इंग्लंडचे पाच गडी
बाद केले. इशांत शर्मा आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराजनं एक बळी घेतला.
कालच्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा शुभमन गील १४ धावांवर बाद झाला होता, तर रोहित
शर्मा २५ आणि चेतेश्वर पुजारा सात धावांवर खेळत होते. सामन्यात सध्या भारतीय संघानं
२४९ धावांची आघाडी घेतली आहे. मालिकेत पहिला कसोटी सामना जिंकून इंग्लंड संघ एक शून्यने
आघाडीवर आहे.
****
बीड शहरासह जिल्ह्याचा विकास थांबला असून याला सर्वस्वी
क्षीरसागर काका -पुतणे जबाबदार असल्याचा आरोप शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक
मेटे यांनी केला आहे. आमदार निधीतून होत असलेल्या बीड शहरातल्या ५० लाख रुपयांच्या
विविध विकास कामाच्या भूमीपूजन प्रसंगी काल ते बोलत होते. आपल्या शहर विकास निधीतून
५० लाख रुपयांची विकास कामं करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात भाजी मंडई, नाळवंडी
नाका, बार्शी नाका, बालेपीर या ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ते, नाल्याचे कामं करणार
असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
परभणी तालुक्यातील बोरवंड बुद्रुक इथं काल माझा गाव-सुंदर
गाव हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी लोकसहभागातून गावातल्या रस्त्यांची स्वच्छता,
नाल्यांची स्वच्छता, वृक्षारोपण, प्लास्टिक कचरा संकलन आदी उपक्रम राबवण्यात आले. गावातील
पशु पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्यात आले आहेत.
****
No comments:
Post a Comment