Friday, 19 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.02.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१९ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

****

जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातल्या बडीगाम परिसरात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. शोधमोहिमेदरम्यान काल रात्रीच्या सुमारास ही चकमक झाली. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.

****

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यभरात उत्साहात साजरी होत आहे. किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे. शिवाजी महाराजांचं साहस, शौर्य आणि असाधारण बुद्धीमत्तेची गाथा देशवासियांच्या स्मरणात सदैव राहील, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, शिवजयंतीनिमित्त आज कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षकपदी यश संपादन करून निवड झालेल्या खात्याअंतर्गत १७ कर्मचाऱ्यांचा काल नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. २०१७-२०२१या काळात अभ्यास, प्रशिक्षण करून यशस्वी होण्यासाठी विभागाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात आले.

****

परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातल्या वालूर इथल्या ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या मासिक सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. विरोधकांनी मांडलेले विषय पटलावर न ठेवल्यामुळे विरोधकांनी गदारोळ केला. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्यांनी विरोधकांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याची तक्रार सेलू पोलिस स्थानकात दाखल केली आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीत काल दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. शिवारात ऊस तोडणी यंत्राच्या चाकाखाली दबून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर नऱ्हपूर पाटी इथं दुचाकीवर मागं बसलेली एक महिला तोल जाऊन खाली पडल्यानंतर मागून येणाऱ्या ट्रकच्या धडकेत मृत्यूमुखी पडली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा नगरपंचायतीची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचं प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांनी म्हटलं आहे. लोहारा इथं पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...