Friday, 19 February 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 February 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 February 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०

****

** पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक ऊर्जेचा वापर वाढवणं आवश्यक - केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांचं प्रतिपादन

** राज्य आणि केंद्र सरकारने परस्पर समन्वयातून इंधन करकपात करण्याचं माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचं आवाहन

** कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळत छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वत्र अभिवादन

आणि

** औरंगाबाद जिल्ह्यात चार तर जालना जिल्ह्यात एका कोविड बाधित रुग्णाचा मृत्यू

****

पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून पुढच्या १० वर्षात इलेक्ट्रिक ऊर्जेचा वापर वाढवणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी केलं आहे. कोविड-19 वर पतंजलीच्या औषधाची घोषणा आज दिल्लीत करण्यात आली. त्यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी पतंजलीचे बाबा रामदेव, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. देशात इलेट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी अधिक प्रयत्न होण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली. पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पादनांच्या अनुषंगानं बोलताना, संपूर्ण विश्वाला दिशा देण्याची ताकद भारतीय आयुर्वेदात असल्याचं गडकरी यांनी नमूद केलं.

****

जनतेला पेट्रोल दरवाढीच्या संकटातून सोडवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने परस्पर समन्वयातून करकपात करण्याचं आवाहन, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पेट्रोलियम पदार्थ जीएसटी अंतर्गत येत नसल्यामुळे त्यावर विविध करांची आकारणी केली जाते. केंद्र आणि राज्य दोन्हीचे कर असल्यामुळे पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहे. यातून दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नरत असून त्या अनुषंगाने विचार करत असल्याचं प्रभू यांनी सांगितलं. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलियम पदार्थांवर मोठ्या प्रमाणात कर आकारणी केली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

****

पेट्रोल पंपावरुन डिझेल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला औरंगाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. कन्नड तालुक्यात एका टोलनाक्यावर गुजरातकडून वाळू भरुन येणाऱ्या गाड्यांची तपासणी करत असतांना चार ट्रक, त्यांचे चालक आणि क्लिनर अशा एकूण १४ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ही टोळी वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी डिझेलच्या टाकीतून प्लास्टीकच्या हातपंपाच्या साहयाने डिझेल चोरी करत होती. नंतर त्यांच्या जवळील वाळू वाहतुकीच्या ट्रकमध्ये कॅन लपवून ओळखीच्या इतर ट्रक चालक आणि मालकांना स्वस्त दरात डिझेल विक्री करत होती. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्यात या टोळीनं ५६ पेक्षा जास्त ठिकाणी डिझेल चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला उत्कृष्ट कामगिरीसाठी ३५ हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

*****

कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळून आज छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे.

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंतीचा मुख्य कार्यक्रम शहरातल्या क्रांतीचौक इथं झाला. शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला यावेळी विविध पक्ष संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. बजाज कामगार संघटनेनं शिवनेरीवरुन आणलेल्या शिव ज्योतीचं पूजन यावेळी करण्यात आलं. जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवर, मराठा समाजाचे नेते विनोद पाटील यांच्या आर आर पाटील फांऊडेशनच्या वतीनं हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद कार्यालयांवरही हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करून कोरोना योद्ध्यांना मानवंदना देण्यात आली. कोविड प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरात शिवजयंती मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी प्र-कुलगुरु श्याम शिरसाट यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  

****

शिवराय ही महाराष्ट्राची सुरक्षित ठेव असून प्रत्येकाने महाराजांचा हा उज्ज्वल इतिहास समर्थपणे पुढे नेण्याचे काम करावं, असं आवाहन प्रख्यात इतिहासतज्ज्ञ आणि शिवचरित्राचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ इस्माईल पठाण यांनी केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं डॉ पठाण यांचं 'शिवरायांची राजनीती, रणनीती आणि धर्मनीती' या विषयावर आज ऑनलाईन व्याख्यान झालं, त्यावेळी ते बोलत होते. जगाच्या इतिहासात मध्ययुगीन कालखंड हा अंधारयुग म्हणून ओळखले जात असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचं राज्य स्थापन केलं, असं डॉ पठाण यांनी नमूद केलं.

*****

नांदेड इथं छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहरातल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास विविध पक्ष, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

लोहा तालुक्यात आष्टूर इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास सरपंच बाबासाहेब बाबर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीत शिवजयंती निमित्त घेतलेल्या कार्यक्रमात अपंग कल्याण निधीतून ५ टक्के आरक्षित रक्कम ७५ अपंगांना वाटप करण्यात आली. या सर्वांना प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण दीड लाख रुपये वाटप करण्यात आलं.

कळमनुरी इथं वकील संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं.

परभणी शहरासह जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना, संस्था, मंडळं तसंच नागरिकांच्या वतीने छोट्या छोट्या उपक्रमाद्वारे शिवरायांना अभिवादन करण्यात आलं.

उस्मानाबाद इथं शिवजयंतीनिमित्त श्री साई परिवाराच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं.

****

 

औरंगाबाद जिल्ह्यातल्या चार कोरोना विषाणू बाधितांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. यामध्ये तीन पुरुष आणि एका महिला रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज १७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ४८ हजार १५२ झाली आहे. ४६ हजार २८७ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली असून एक हजार २५० जण दगावले आहेत.

****

जालना जिल्ह्यात आज एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या एकूण मृतांची संख्या आता ३७७ झाली आहे. दरम्यान, आज  दिवसभरात ६१ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १४ हजार ३६२ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या १६ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले १३ हजार ६४४ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ३४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

****

बीड जिल्हयात काल मध्यरात्रीपासून गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठं नुकसान झालं असून, फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे. गुरुवारी मध्यरात्री जिल्हयात सर्वत्र वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. आंबा, डाळिंब, पपई, तसंच द्राक्षबागांचं आणि ज्वारी, हरभरा, गहू या रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेल पीक आडवं झालं आहे. हरभरा, ज्वारी आणि गहू पिकाचं मोठं नुकसार झालं आहे.  हवेतल्या गारठ्यामुळे पिकांवर रोगराईची भीती वर्तवली जात आहे.

परभणी जिल्ह्यात अनेक भागात आजही पाऊस झाला. पाथरी तालुक्यात लिंबा तसंच परभणी तालुक्यात सिंगणापूर भागात गारांच्या पावसाने तडाखा दिला. आंबा, गहू तसंच अन्य पिकांचं यामुळे नुकसान झालं आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ज्वारी, हरभरा तसंच आंबा मोसंबी पपई या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबागांचे तातडीने पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.

****

लातूर जिल्ह्यात रेणा सहकारी साखर कारखाना इथं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसंच ग्रंथालयाचं लोकार्पण दिलीपराव देशमुख यांच्याहस्ते करण्यात आलं. शेतकरी सभासदांच्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून केलं जाईल, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली.

//*************//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...